शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 11 जून 2022 (18:12 IST)

नुपूर शर्मांविरोधात मुस्लीम समाज रस्त्यावर, हिंसाचारात रांचीत दोघांचा मृत्यू

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली.
 
झारखंडची राजधानी रांचीमध्ये शुक्रवारी झालेल्या निदर्शनाला हिंसक वळण लागलं. या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला आहे.
 
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार दिलेल्या वृत्तानुसार, रांचीमधील रिम्स रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
 
शुक्रवारच्या नमाजानंतर देशभरात अनेक शहरांमध्ये निदर्शने झाली. या निदर्शनांना अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं.
 
रांचीमध्ये ही दगडफेकीच्या घटना घडल्या. बऱ्याच वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. या हिंसाचारादरम्यान अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
 
या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात आणता यावी म्हणून जिल्हा प्रशासनाने तत्काळ कारवाई केली. तसेच रांचीच्या हिंसाचारग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात आली.
 
रांचीमध्ये शुक्रवारी संध्याकाळी 7 ते शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.
 
रांचीचे डीआयजी अनिश गुप्ता यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, "थोडा तणाव" असला तरीही आता "परिस्थिती नियंत्रणात" आहे.
 
पश्चिम बंगालमध्ये जाळपोळ, भाजप कार्यालयाला आग लावली.
प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याविरोधात पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यात शुक्रवारी अनेक ठिकाणी निदर्शने आणि जाळपोळ सुरूच आहे.
 
भाजप नेत्यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या लोकांनी डोमजुड पोलिस ठाण्यावरही हल्ला केला ज्यात काही पोलिस जखमी झाले. जिल्ह्यातील पाचला ग्रामीण भागातील भाजप कार्यालयाशिवाय काही वाहनेही जाळण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.
 
तत्पूर्वी गुरुवारीही याच मुद्द्यावरून शेकडो लोकांनी महामार्गावरील वाहनांची वाहतूक रोखून धरली होती. शेवटी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आवाहनानंतर सुमारे 10 तासांनंतर धरणे संपुष्टात आले.
 
शुक्रवारची नमाज आटोपल्यानंतर शेकडो लोक पुन्हा रस्त्यावर उतरले आणि घोषणाबाजी करू लागले. हे लोक नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत होते.
 
हावडा जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जमावाने उलुबेडिया भागातील भाजपचे कार्यालयही जाळले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवरील वाहनांची वाहतूकही ठप्प झाली होती. काही ठिकाणी जाळपोळीच्याही तुरळक घटना घडल्या आहेत.
 
हावडा जिल्ह्यातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता 13 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यादरम्यान व्हॉईस कॉल आणि एसएमएसवर कोणतेही बंधन राहणार नाही.
 
चेंगाईल भागात रेल्वे रुळांवर धरणे आंदोलन सुरू असल्यामुळे हावडा-खड़गपूर विभागातील रेल्वेसेवा सुमारे सात तास ठप्प झाली होती. यामुळे सात स्थानिक रेल्वे रद्द कराव्या लागल्याचे पूर्व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
दरम्यान, राज्यपाल जगदीप धनखड यांनी मुख्य सचिवांकडून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अहवाल मागवला आहे.
 
उत्तर प्रदेशातही जाळपोळ
उत्तर प्रदेशातील विविध शहरांमध्ये देखील शेकडो लोकांनी निदर्शने केली आणि प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. अनेक ठिकाणांहून जाळपोळ आणि दगडफेकीच्या बातम्याही येत आहेत.
 
उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये शेकडो लोकांनी घोषणाबाजी केली. लोकांना हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.
 
त्याचवेळी, कानपूरमध्ये 3 जून रोजी झालेल्या जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिस ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवत आहेत. सुरक्षा दलांनी परिसरात फ्लॅग मार्च काढला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पीएसी कंपन्यांनाही तैनात करण्यात आले आहे.
 
शुक्रवारच्या नमाजानंतर कानपूरमधील बेकनगंज पोलीस स्टेशन हद्दीतील नई रोड परिसरात जातीय हिंसाचार पाहायला मिळाला.
 
प्रयागराजमध्ये आंदोलनानंतर दगडफेक झाली आहे. दगडफेक करणाऱ्यांनी पोलिसांच्या वाहनालाही लक्ष्य केले आहे.
 
गर्दी हटवण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्सला अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. लोकांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक रिक्षा पेटवून दिल्या आहेत.
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
महाराष्ट्रातही आंदोलन
 
महाराष्ट्रातही काल नवी मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, जालना, परभणी इत्यादी भागात मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला.
 
पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्लीसह देशभरात इतर ठिकाणीही मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला. महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील यातील काही मोर्चांनं हिंसक वळणही लागल्याचं दिसून आलं.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्मियांचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या विवाहासंबंधी आक्षेपार्ह विधान केलं आणि त्याचे पडसाद आता जगभरात उमटतायत. ईशनिंदा केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांचं भाजपमधून निलंबन झालं असलं तरी हा वाद आता पेटलाय.
पैगंबरांचा विवाह आणि इस्लाम धर्मातल्या काही मान्यतांबाबत हे वक्तव्य आहे.
टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून बोलताना शर्मा यांनी अत्यंत आक्रमकपणे पैगंबरांविषयी हे उद्गार काढले होते. त्यांच्या विधानांची री भाजपचे दिल्लीतले नवीन जिंदाल यांनी ओढली आणि हा वाद वाढला.
 
जगभरातून भारतावर टीका
या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोदी सरकारवर जगभरातून टीका होतेय. कतार, कुवेत, इराण या देशांसह इस्लामिक कोऑपरेशन या आंतरराष्ट्रीय संघटनेनं यावर जोरदार आक्षेप घेतलाय.
 
या देशांनी 5 जूनला त्यांच्या देशातील भारतीय राजदूतांना बोलावून घेतलं आणि आपला निषेध व्यक्त केलाय.
 
पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर कतारनं नाराजी व्यक्त केली होती, त्यावर दोह्यामधील भारतीय दूतावासाकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
केवळ कतार आणि कुवेतच नाही तर नुपूर शर्मा यांच्या विधानानंतर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननेही (OEC) आक्षेप घेतला आहे आणि भारतातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तिनं केलेल्या वादग्रस्त विधानावर कठोर शब्दांत टीका केली आहे.
 
एकापाठोपाठ केलेल्या ट्वीट्समध्ये OECने म्हटलं की, भारतात मुस्लिमांविरोधात सुनियोजित पद्धतीने हिंसाचार वाढत आहे. त्यावर बंधनं लादली जात आहेत. OECने आपल्या ट्वीटमध्ये हिजाब बॅन आणि मुसलमानांच्या मालमत्तेच्या नुकसानासंबंधीच्या बातम्यांचाही उल्लेख केला.
 
OECने म्हटलं की, पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वक्तव्यं करणाऱ्या आणि मुस्लिमांविरोधात हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जावी.
मात्र, हे मत भारत सरकारचं अधिकृत मत नसून देशातल्या असामाजिक तत्त्वांचं हे मत आहे. याचा भारत सरकार पुरस्कार करत नाही.
 
नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर भाजपची कारवाई
भारतीय जनता पक्षाने रविवारी, 5 जून रोजी या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
 
भाजपच्या दोन प्रवक्त्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. यावर भाजप सर्व धर्मांचा आदर करीत असून कोणत्याही धार्मिक महापुरुषाचा अपमान हा निषेधार्ह असल्याचं भाजपने म्हटलं आहे.
 
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग म्हणाले की, त्यांचा पक्ष कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अपमान करणाऱ्या कोणत्याही विचारसरणीच्या विरोधात आहे.
 
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, अरुण सिंह म्हणाले, "भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात अनेक धर्म उदयास आले. भारतीय जनता पक्ष प्रत्येक धर्माचा आदर करतो. भारतीय संविधानाने नागरिकांना कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. सर्वांचा आदर आणि सन्मान करण्याचा अधिकारही दिला आहे."
 
नुपूर शर्मांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाचा थेट उल्लेख भाजपने केला नसला तरी वृत्तसंस्था पीटीआय आणि एएनआयने दिलेल्या बातमीनुसार पक्षाने नुपूर शर्मा यांचं प्राथमिक सदस्यत्व रद्द केलं आहे. तर नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
 
नुपूर शर्मा कोण आहेत?
नुपूर शर्मा या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना निवडणूकीत यश मिळालं नाही. मोठ्या फरकानं त्यांचा पराभव झाला. नुपूर दिल्ली भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्याही आहेत.नुपूर शर्मा या भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्य होत्या.