शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (19:28 IST)

म्यानमार लष्कर उठाव : रस्त्यांवर लष्कराची सशस्त्र वाहनं आणि इंटरनेट सेवाही बंद

The country's internet service has also been shut down since 1pm local time.
म्यानमारमधील अनेक शहरांच्या रस्त्यांवर लष्कराची सशस्त्र वाहनं उतरली आहेत. स्थानिक वेळेनुसार रात्री 1 वाजल्यापासून देशातील इंटरनेट सेवाही बंद आहे.
 
1 फेब्रुवारीच्या लष्करी उठावानंतर देशांतर्गत झालेला टोकाचा विरोध संपवण्याच्यादृष्टीने हा एक संकेत असल्याचं मानलं जात आहे.
 
देशाच्या उत्तर भागातील काचिन प्रांतात सलग नऊ दिवसांपासून लष्करी राजवटीविरोधात आंदोलन सुरू आहे. याठिकाणी सुरक्षा दलांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याच्याही बातम्या समोर येत आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकाऱ्याने म्यानमार लष्करावर गंभीर आरोप केलेत. लष्कराने आपल्याच लोकांविरोधात युद्ध पुकारलं असल्याचा त्यांचा आरोप आहे.
 
म्यानमारसाठीचे संयुक्त राष्ट्रांचे विशेष सहकारी टॉम अँड्र्यूज यांनी सांगितलं, सैन्याचे जनरल "निराशेचे संकेत देत आहेत" आणि म्हणूनच त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल.
त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं, "लष्कराने म्यानमारमधील लोकांच्या विरोधात युद्धाची घोषणा केली आहे असं वाटतं. मध्यरात्री धाड टाकली जाते, लोकांना ताब्यात घेतलं जात आहे, त्यांचे अधिकार काढून घेतले जात आहेत, इंटरनेट सेवा पुन्हा बंद केली आहे. लष्कराचे लोक निवासी भागांमध्ये घुसखोरी करत आहेत. सैन्याचे जनरल हताश झाले आहेत असं वाटतं."
युरोपीय संघ, अमेरिका आणि ब्रिटन यांनी एक निवेदन जारी केलं आहे. "आम्ही सुरक्षा दलांना आवाहन करतो की प्रजासत्ताक सरकारच्या सत्तांतरानंतर विरोध करत असलेल्या आंदोलकांविरोधात हिंसा करू नये."
 
म्यानमारच्या लष्कराने याच महिन्यात आँग सान सू ची यांच्या नेतृत्त्वाखाली निवडून आलेल्या सरकारला बरखास्त केलं.
 
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सू ची यांच्या पक्षाला निवडणुकीत घवघवीत यश मिळालं आणि बहुमताने त्यांचं सरकार आलं. पण लष्करानं निकालांमध्ये फेरफार आणि फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे.
 
सू ची या अजूनही लष्कराच्या नजरकैदेत आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे नेते, विरोधी पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्तेही नजरकैदेत आहेत.
 
विरोध संपवण्याचे संकेत?
लष्करी राजवटीविरोधात सलग नवव्या दिवशीही हजारो लोक म्यानमारमधील रस्त्यांवर उतरले आहेत. काचिन प्रांतातील मितकिना शहरात सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाल्याची माहिती समोर येत आहे.
 
सुरक्ष दलांनी याठिकाणी गोळीबार केल्याचीही बातमी आहे. यावेळी त्यांनी लाईव्ह बुलेट्स वापरल्या की रबराच्या गोळ्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
 
पाच पत्रकारांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. 14 फेब्रुवारीपासून देशातील इंटरनेट सेवा पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री 1 ते सकाळी 9 पर्यंत इंटरनेट ठप्प राहणार आहे.
 
नेपिटोच्या एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनी बीबीसीला सांगितलं, की लष्कर मध्यरात्री घरांवर धाडी टाकत आहे.
 
ते सांगतात, "संध्याकाळी आठ ते पहाटे चार वाजेपर्यंत घरातून बाहेर पडण्यावर कर्फ्यू लागू केला आहे. पण यादरम्याने पोलीस आणि सुरक्षा दल आम्हाला अटक करू शकतात. एक दिवस आधी ते घरांमध्ये घुसले. कुंपण कापून त्यांनी प्रवेश केला. लोकांना बेकायदेशीरपणे अटक केली जात होती. यामुळे मला काळजी वाटते." (सुरक्षेसाठी डॉक्टरांनी आपली ओळख गुप्त ठेवण्यास सांगितली आहे.)
 
रंगूनमधल्या अमेरिकेच्या दूतावासने देशात राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना कर्फ्यू लागू असताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.