मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

पुणे दुर्घटना: 'माझा मुलगा, सून आणि नातवंडं सारं काही मी गमावलं'

पुण्यातील कोंढवा येथे भिंत कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतले पीडित हे बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील आहेत. कटिहार जिल्ह्यातील बाइसबीघी गावावर सध्या शोककळा पसरली आहे. पीडितांचे नातेवाईक सतत रडत आहेत.
 
स्थानिक पत्रकार नीरज झा यांनी या गावाला भेट दिली आणि कुटुंबीयांची भेट घेतली. मृतांमध्ये भीमा दास या व्यक्तीचा समावेश आहे. भीमा दासच्या वडिलांनी सांगितलं की माझ्या घरातले चार जण या घटनेत गेले.
 
भीमा दास यांचे वडील सांगतात, माझा मुलगा, माझी सून आणि दोन नातवंडं या दुर्घटनेत गेली आहेत असं त्यांनी सांगितलं.
 
या दुर्घटनेत मृत्युमुखी झालेले मोहन शर्मा यांच्या कुटुंबीयांच्या नातेवाईंकांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वीच मोहन शर्मा गावी येऊन गेले. गेल्या मंगळवारीच ते पुण्याला परतले आणि आता ही बातमी आली. मोहन शर्मा यांच्या पाठीमागे पत्नी आणि दीड वर्षांचं मुलगा असा परिवार आहे.
 
गावातले लोक आपल्या नातेवाईकांचे मृतदेह येण्याची वाट पाहत आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर यांनी सांगितलं की पीडितांचे मृतदेह हे विमानाने त्यांच्या गावी पाठवले जाणार आहेत.
 
कटिहारच्या जिल्हाधिकारी पूनम कुमारी यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुण्याच्या प्रशासनाच्या आपण संपर्कात असल्याचं त्यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं. पीडितांचे मृतदेह हे एअर अॅंबुलन्सने आणण्याची व्यवस्था केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं.
 
पुण्यात झालेल्या घटनेची चौकशी व्हावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
 
"कोंढव्यात घडलेल्या घटनेमुळे मला तीव्र दु:ख झालं आहे. मी पीडितांच्या दु:खात सहभागी आहे. जे लोक जखमी झालेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत", असं ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलं आहे.