मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019 (10:25 IST)

कोकणातून समुद्राला मिळणारे पाणी मराठवाड्यात वळवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
 
तसंच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम विदर्भाला देऊन दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त बोलताना त्यांनी हे सांगितलं.
 
राज्य शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्याला जलपरिपूर्ण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षांत केला असं सांगताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, गेल्या तीन चार वर्षांत कमी पावसामुळे काही भागात दुष्काळाचे संकट अनुभवले आहे. त्यावर मात करण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल.
 
तसंच वैनगंगा नदीचे तेलंगणात जाणारं पाणी वैनगंगा- नळगंगा योजनेत ४८० किमीचा बोगदा तयार करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणण्याचा प्रयत्न आहे.