शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जून 2020 (16:09 IST)

कोरोनामुक्त जाहीर केलेल्या न्यूझीलंडमध्ये आढळले दोन नवीन रुग्ण

न्यूझीलंडमध्ये जवळपास महिनाभरानंतर कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला आहे. दोघांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
 
या दोन्ही व्यक्ती नुकत्याच ब्रिटनहून परतल्या होत्या आणि दोघंही एकमेकांशी संबंधित आहेत. स्थानिक प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या दोघांनाही नातेवाईकाच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ब्रिटनहून येण्याची परवानगी देण्यात आली होती.
 
न्यूझीलंडने गेल्याच आठवड्यात देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा करत सर्व निर्बंध काढले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर अजूनही बंदी आहे. यात केवळ परदेशात अडकलेले न्यूझीलंडचे नागरिक आणि अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाच मायदेशात परण्याची मुभा देण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी देश कोरोनामुक्त होणं, मोठी आणि महत्त्वाची घटना असल्याचं म्हटलं होतं. मात्र, कोव्हिड-19 च्या आणखी केसेस उघड होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला होता. सातत्याने उचललेल्या पावलांमुळे आपण हे यश गाठू शकल्याचं त्या म्हणाल्या होत्या.
 
न्यूझीलंडमध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पूर्णपणे बंद करून लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. कोरोना विषाणूची साथ पसरू नये यासाठी न्यूझीलंडने केलेल्या उपाय योजनांचं जगभर कौतुक झालं होतं.
 
 दोन नवीन रुग्ण आढळल्यानंतर न्यूझीलंडमध्ये एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1,506 झाली आहे, तर कोव्हिड-19 आजारामुळे तिथे आतापर्यंत 22 लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जगभरातल्या जवळपास 200 देशांमध्ये लॉकडाऊन वेगवेगळ्या स्वरुपात अजूनही लागू असताना न्यूझीलंडने मात्र सर्व प्रकारचे निर्बंध उठवले होते. देशात कोव्हिड-19 आजाराचा एकही रुग्ण न आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.
 
न्यूझीलंडमध्ये यापुढे सोशल डिस्टंसिंग पाळण्याची गरज नाही. तसंच सार्वजनिक कार्यक्रमांनाही पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे. परदेशी नागरिकांसाठी देशाच्या सीमा मात्र अजूनही बंद असतील.
 
न्यूझीलंडमध्ये गेल्या दोन आठवड्यात एकही कोव्हिड पॉझिटिव्ह केस आढळलेली नसल्यामुळे हा निर्णय घेतला गेला.
 
देशात कोव्हिड-19 चा एकही अॅक्टिव्ह रुग्ण नसल्याची बातमी कळली तेव्हा मी आनंदाने नाचले, असं न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन म्हणाल्या.
 
त्या म्हणाल्या, "आपण सुरक्षित आणि मजबूत स्थितीत असलो तरी कोव्हिडपूर्व आयुष्याकडे परतण्याचा मार्ग सोपा नाही. मात्र, ज्या दृढनिश्चयाने आपण आरोग्य संकटाचा सामना केला आता तोच दृढनिश्चय आपल्याला आर्थिक पुर्नबांधणीसाठी करावा लागणार आहे."
 
त्या पुढे म्हणाल्या, "आपलं काम पूर्ण झालं नसलं तरी हा एक मैलाचा दगड आहे, हे नाकारता येत नाही."
 
'सातत्यपूर्ण प्रयत्न'
कोरोना विषाणूची लागण होण्याचं प्रमाण वाढू लागण्यानंतर न्यूझीलंडने त्याचा सामना करण्यासाठी एक नवी चार स्तरीय अलर्ट यंत्रणा म्हणजेच सतर्कतेचा इशारा देणारी यंत्रणा स्थापन केली.
 
परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता वेगवेगळ्या टप्प्याचे अलर्ट जारी करण्यात आले. न्यूझीलंडमध्ये 25 मार्चपासून लॉकडाऊन जारी करण्यात आला. त्यावेळी परिस्थिती अतिशय चिंताजनक असल्याने चौथ्या टप्प्याचा अलर्ट घोषित करण्यात आला होता. यात बहुतांश सर्व उद्योग-व्यवसाय, शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आणि नागरिकांनी घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
 
यानंतर जवळपास पाच आठवड्यांनंतर एप्रिल महिन्यात परिस्थिती थोडी अवाक्यात आल्यानंतर तिसऱ्या टप्प्याचा अलर्ट घोषित करण्यात आला. यात टेक-अवे फूडची दुकानं खुली करण्यात आली. अत्यावश्यक नसणारी काही दुकानंही उघडण्याची परवानगी देण्यात आली.
 
त्यानंतर जसजशी कोव्हिड-19 रुग्णांची संख्या कमी होऊ लागली न्यूझीलंडने आणखी एक पातळी खाली येत मे महिन्याच्या मध्यात दुसऱ्या टप्प्यातील अलर्ट घोषित केला.
 
यानंतर परिस्थितीचा अंदाज घेत 22 जून रोजी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची सूचना देणारा पहिल्या टप्प्याचा अलर्ट घोषित करण्याचा सरकारचा विचार होता. मात्र, तब्बल 17 दिवस एकही नवीन कोरोनाग्रस्त न आढळल्याने सरकारने नियोजित तारखेच्या आधीच पहिल्या टप्प्याचा अलर्ट घोषित केला.
 
नव्या नियमांनुसार सर्व शाळा आणि कार्यालयं आता उघडता येतील. लग्नसोहळे, अंत्यसंस्कार आणि सार्वजनिक वाहतूक याठिकाणी कुठलेही निर्बंध नसतील. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं बंधन नसणार. मात्र, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ते पाळावं, अशी अपेक्षा आहे.
 
देशाच्या सीमा मात्र परदेशी प्रवाशांसाठी अजूनही खुल्या करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, परदेशातू मायदेशात येऊ इच्छिणाऱ्या न्यूझीलंडच्या नागरिकांना देशात परतण्याची मुभा असेल. मायदेशात परतल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन राहण्याची अट मात्र पाळावी लागणार आहे.
 
न्यूझिलंडने सर्व निर्बंध उठवले असले तरी याचा अर्थ न्यूझीलंडमधून कोव्हिड-19 चं पूर्णपणे निर्मुलन झालं असा होत नाही आणि कोरोनाच्या केसेस यापुढे येतील. तेव्हा त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असेल, असंही पंतप्रधान ऑर्डन यांनी म्हटलं आहे.
 
न्यूझीलंडमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत देशात 1154 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर 22 जणांचा कोव्हिड-19 ने मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या साथीविरोधात न्यूझीलंडने केलेल्या प्रयत्नांचं जगभरात कौतुक झालं आहे.
 
पंतप्रधानांच्या घोषणेनंतर संपूर्ण न्यूझीलंडमध्ये आनंदाचं वातावरण होतं. ऑकलँडमध्ये ट्रक ड्रायव्हर असलेले पॅट्रिक वेस्टन बीबीसीशी बोलताना म्हणाले, "प्रत्येकाला आनंद झाला आहे. अखेर आम्ही या संकटातून बाहेर पडलो. असं असलं तरीही साशंकता कायम आहे."
 
"मला वाटतं यावेळी सर्वांना सर्वाधिक काळजी अर्थव्यवस्थेची आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत आणि आता एवढ्या मोठ्या संख्येने लोक कामाच्या शोधात आहेत."
 
"(मंगळवारी) सर्व निर्बंध उठवण्यात आले आणि आता आम्ही पूर्वीसारखं नॉर्मल आयुष्य जगू शकतो. कुठल्याही निर्बंधांशिवाय संगिताचे कार्यक्रम होऊ शकतील, क्रीडा स्पर्धा होऊ शकतील. लोकांनी स्वतःहून सोशल डिस्टन्सिंग पाळावं, अशी अपेक्षा बाळगली जात आहे आणि मला वाटतं एवढा समंजसपणा लोक दाखवतील."
 
"आम्ही खूप आनंदी आहोत. मात्र, भविष्याची काळजीही आहे."