उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील: विधानसभा निवडणुकीबरोबर होणारी सातारा लोकसभा पोटनिवडणूक उदयनराजेंसाठी किती आव्हानात्मक?

udayan raje bhosale
Last Modified शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019 (13:39 IST)
राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच सातारा मतदारसंघात मात्र विधानसभेसोबतच लोकसभेचीही पोटनिवडणूक होत आहे.
उदयनराजे भोसलेंनी लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून त्यांना लगेचच उमेदवारीही दिली गेली आणि महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंच्या प्रचाराचा नारळही फोडला.

दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उदयनराजेंविरोधात कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याविषयी बऱ्याच चर्चा रंगल्या. सुरूवातीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत होते. पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची शक्यता लक्षात घेऊन उदयनराजे भोसले यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
"मी माझी फाईल घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे फाईल घेऊन गेलो की ती डस्टबिनमध्ये जायची. मी निवडणूक जिंकलो असली तरी नैतिकदृष्ट्या हरलो आहे. मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाणही होते आणि देवेंद्र फडणवीसही आहेत. पद तेच आहे. पण तेव्हा काम झाली नाहीत," असं म्हणत उदयनराजेंनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली.

अर्थात, काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचं नाव मागे पडलं. कारण काँग्रेसनं कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी जाहीर केली. शिवाय आघाडीमध्ये सातारा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता.
राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार, ही चर्चा श्रीनिवास पाटील यांच्या नावापाशी येऊन थांबली. श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. दोन वेळा ते खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले आहेत. ते सिक्कीमचे राज्यपालही होते.

श्रीनिवास पाटलांबद्दल आदर, पण...
श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली. "त्यांच्याबद्दल आपल्याला आदरच आहे. पण लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून लोक तुम्हाला काय काम केलं हा प्रश्न विचारतील तेव्हा काय उत्तर देणार? या प्रश्नाला मलाही सामोरं जावं लागेल. पण माझ्याकडे कामांची यादीच आहे."
तर दुसरीकडे वाई येथील सभेमध्ये बोलताना श्रीनिवास पाटील यांनी ज्या राजांनी प्रजा सोडली आहे, अशांबरोबर लढायला काय हरकत आहे, असं म्हणत उदयनराजेंना आव्हान दिलं.

श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना आव्हान दिलं असलं तरी त्यांच्या उमेदवारीमुळे खरंच साताऱा लोकसभेची पोटनिवडणूक रंगतदार झाली आहे का? मोदी लाटेतही सलग दोन वेळा साताऱ्यातून निवडून आलेल्या उदयनराजेंना भाजप प्रवेशानंतर मात्र विजयासाठी झगडावं लागू शकतं का?
श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीमुळं उदयनराजे भोसले यांच्यासमोर निश्चितच मोठं आव्हान उभं राहिलं आहे, असं मत दैनिक प्रभातच्या सातारा आवृत्तीचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांनी व्यक्त केलं.

"यावेळी उदयनराजेंविषयी मतदारसंघात फार अनुकूल वातावरण नाहीये. जिल्ह्यातील रखडलेली विकासकामं हे त्याचं प्रमुख कारण आहे. साताऱ्याचा औद्योगिक विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. सातारा MIDC मधील अनेक मोठ्या उद्योगांनी आपलं उत्पादन बंद केलं आहे. त्याचा परिणाम आपसूकच साताऱ्यातील लहान उद्योगांवरही झाला आहे. त्यामुळे इथं रोजगाराच्या संधी कमी आहेत. शिक्षणसंस्थांचाही पुरेसा विकास झालेला नाही. त्यामुळे इथले तरुण शिक्षण आणि रोजगाराच्या संधींसाठी बाहेर पडत आहेत."
16 व्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांची लोकसभेतील उपस्थिती अवघी 27 टक्के होती. त्यांनी प्रश्नही उपस्थित केले नाहीत, कोणते खाजगी विधेयक मांडले नाही की चर्चेत भागही घेतला नाही.

हेच मुद्दे अधोरेखित करत श्रीकांत कात्रे यांनी म्हटलं, की उदयनराजे भोसले हे लोकप्रिय आहेत. पण त्याची कारणं वेगळी आहेत. राजकारणाबाबत ते गंभीर असल्याचं कधी दिसलं नाही.
श्रीनिवास पाटलांना प्रतिमेचा फायदा?
"श्रीनिवास पाटील यांची प्रतिमा स्वच्छ आहे. कराडमधून ते दोन वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते सनदी अधिकारी होते. त्यामुळे निधी मिळविणं, सरकारी योजना राबविणं याचा नोकरशहा आणि राजकारणी असा दुहेरी अनुभव त्यांच्याकडे आहे. तो वापरून त्यांनी आपल्या मतदारसंघात केलेलं काम लोकांना माहीत आहे," असंही श्रीकांत कात्रे यांनी म्हटलं.
श्रीकांत कात्रे यांनी मतदारसंघातील समीकरणांबद्दल बोलताना म्हटलं, की साताऱ्यामधील कराड आणि पाटण तालुक्यांमध्ये उदयनराजेंना अंतर्गत विरोध आहे. या दोन तालुक्यांमध्ये कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण या तीन विधानसभा मतदारसंघांचा अंतर्भाव होतो.

श्रीनिवास पाटील हे मूळचे पाटणचे आहेत आणि सध्या कराडमध्ये राहतात. त्यामुळे इथल्या अनेकांचा पाठिंबा पाटील यांना आहे. साताऱ्यातील ग्रामीण भागात आजही राष्ट्रवादी काँग्रेसचं केडर हे खूप मजबूत आहे. त्याचा फायदा उदयनराजेंनाही झाला होता आणि आता तो श्रीनिवास पाटील यांनाही होऊ शकतो, असं कात्रे सांगतात.
मराठा समाज कोणाच्या बाजूने जाणार?
भाजपसाठी शिवाजी महाराजांच्या वंशातील व्यक्ती आपल्यासोबत आहे, हे महाजनादेश यात्रेच्या सभेमधून देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केलं. महाराष्ट्रात मराठा समाज जवळपास 31 टक्के आहे.

मराठा समाज कायमच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिशी उभा राहिला होता. हेच लक्षात घेत गेल्या काही दिवसांत भाजपनं राष्ट्रवादी-काँग्रेसमधून पक्षात स्थान दिलेल्या नेत्यांमध्ये महत्त्वाच्या मराठा नेत्यांचा समावेश होता. उदयनराजेंच्या निमित्ताने छत्रपतींचे वंशज आमच्या पक्षात आहेत, हे सांगून मराठा समाजाला भावनिक आवाहनही आता भाजप करू शकतं.
उदयनराजेंसाठी प्रतिष्ठेची लढत
ही लढत श्रीनिवास पाटलांपेक्षाही उदयनराजे भोसलेंसाठी प्रतिष्ठेची आहे, असं मत महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे यांनी व्यक्त केलं.

"सातारा लोकसभा मतदारसंघ हा उदयनराजेंपेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळेच 2009, 2014 आणि अगदी 2019 च्या निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली होती. आता त्यांना राष्ट्रवादीशिवायही या मतदारसंघात आपण बहुमतानं निवडून येऊ शकतो, हे सिद्ध करावं लागणार आहे," असं चोरमारे यांनी म्हटलं.
shard panwar shrinivas patil
सातारा मतदारसंघातील विधानसभा निहाय समीकरणं पाहिली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा दिसून येत असल्याचंही विजय चोरमारे यांनी म्हटलं.
"सातारा-जावळी मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले एकत्र झाल्यामुळे त्यांना फायदा होईल. पण कोरेगाव, वाई, कराड दक्षिण, कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी वरचढ ठरू शकते. पाटण मतदारसंघात शंभूराजे देसाई हे शिवसेनेचे असले तरी इथूनही राष्ट्रवादीला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या मोठी आहे."

यशवंतराव चव्हाणांनंतर साताऱ्यातील लोकांनी शरद पवारांना तसाच पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर विधानसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये अकरापैकी दहा मतदासंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला होता. श्रीनिवास पाटील यांच्या पाठीशी राष्ट्रवादीची ही ताकद आहे, असं चोरमारे यांनी म्हटलं.
उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साताऱ्यात झालेल्या महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारकरांसाठी अनेक घोषणा केल्या होत्या. रस्त्यांसाठी पन्नास कोटींचा निधी, हद्दवाढीला मंजुरी अशा अनेक घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. भाजप आणि मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याचा, या आश्वासनांचा उदयनराजेंना फायदा होऊ शकतो का, या प्रश्नाला उत्तर देताना चोरमारे यांनी नकारात्मक उत्तर दिलं.
"निवडणुकीत आश्वासनं दिलीच जातात. त्यांचं पुढं काय होतं, हे लोकांना चांगलंच माहिती असतं. दुसरं म्हणजे उदयनराजेंनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशावर फारशा सकारात्मक प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. सहा महिन्यांतच आपण पक्षाचा राजीनामा का दिला, या प्रश्नावर त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे उदयनराजेंसाठी ही निवडणूक निश्चितच आव्हानात्मक आहे."

सातारा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय परिस्थिती
सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या 18 लाख 23 हजार 476 इतकी आहे. यापैकी पुरूष मतदारांची संख्या 9 लाख 35 हजार 878 आहे. तर महिला मतदारांची संख्या ही 9 लाख 3 हजार 92 इतकी आहे. त्याचबरोबर 16 तृतीयपंथी मतदारांची नोंदही झाली होती.
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उदयनराजे यांना 5 लाख 79 हजार 26 मतं पडली होती. त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मतं पडली होती.

यावर अधिक वाचा :

अयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे काय बदल होईल?

अयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे काय बदल होईल?
अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने 9 नोव्हेंबरला ...

प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, ...

प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, व्हिडियो प्रचंड व्हायरल
प्रसिद्ध गायिका आणि नाशिकच्या रहिवासी गीता माळी या प्रवास करत असलेली कार गॅस टँकरला ...

Tik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ...

Tik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
पूर्वी एकदा कोर्टाने बंदी घातलेल्या Tik-Tok विरोधात आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात ...

राजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर

राजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर
मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्चित झाले आहे. ...

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत ...

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नाही
महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद ...