शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 6 जून 2021 (19:41 IST)

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकाच मुलाखतीत केली 5 वेळा टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'लोकसत्ता'ला दिलेल्या मुलाखतीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता अनेकदा टीका केली आहे.
 
या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याची सुरू असलेली चर्चा, सरकारवर कोरोना काळात होणारे आरोप, मराठा आरक्षण आणि इतर अनेक मुद्द्यांवर मतं मांडली.
 
विरोधकांनी कोरोनाच्या या कठीण काळात राजकारण न करता नागरिकांना कशापद्धतीनं सुविधा दिल्या जातील याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
 
तर आमच्या अजेंड्यावर सरकार पाडणे नसून कोव्हिडचा लढा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत यापूर्वी स्पष्ट केलंय.
 
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता जवळपास 5 वेळा टीका केल्याचं दिसून येतं. ते नेमकं काय म्हणाले ते आधी पाहूया...
 
1. 'लोकांचे जीव चाललेत आणि तुम्हाला खुर्च्या दिसताहेत'
महाविकास आघाडीचं सरकार काही दिवसात कोसळेल असं भाकित भाजप नेते वारंवार व्यक्त करत आले आहेत.
 
या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता म्हटलं, "कोरोनाच्या काळात काय केलं पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजे राजकारण थांबवा, जनतेच्या जीवाचा विचार करा. अर्थव्यवस्था कशी मजबूत करता येईल याचा विचार करा. हा काळ ओसरल्यानंतर आहे ना राजकारण.
 
"पण आता सरकार पाडापाडीचे धंदे कुठे चालू असतील, निवडणुका घेतल्यानंतर कोरोना फोफावला का, अरे थांबा ना थोडं. लोकांचे जीव चाललेत आणि तुम्हाला खुर्च्या दिसताहेत. लोकांचे जीव महत्वाचे आहेत, खुर्ची असेल किंवा नसेल. पण ती खुर्ची देणारेच जगणार नसतील, तर तुम्ही त्या खुर्चीवर बसून करणार तरी काय?"
 
2. 'कृपा करून राजकारण थांबवा'
कोरोना काळात विरोधक निव्वळ राजकारण करत असल्याची टीका सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी वेळोवेळी केली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुकही केलं आहे.
 
उद्धव ठाकरे लोकसत्ताच्या मुलाखतीत म्हणाले, "कृपा करून राजकारण थांबवा. माझा पिंड काही राजकारणाचा नाही, हे मी उघडपणाने सांगतो आणि त्यात मला काही कमीपणा वाटत नाही. पण जी जबाबदारी खांद्यावर येईल ती पूर्णपणे पार पाडायचा माझा प्रयत्न असतो आणि तशी मी ती पार पाडत आलो आहे. कर्मधर्मसंयोगानं कोरोना माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आलाय. तुम्ही मदत करणार नसाल, तर निदान राजकारण करू नका."
 
3. 'भाजपसोबतची युती का तुटली ते सांगा'
शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात , अशी चर्चा होत असते. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात का, याच्याआधी हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे की एकत्र होते तर वेगळे का झाले?
 
"भविष्याचा वेध घेताना आधी भूतकाळात डोकावलं पाहिजे. 25 ते 30 वर्ष युती म्हणून आम्ही वाईट काळात एकत्र राहिलो. मग वाईट काळ ओसरल्यानंतर आम्ही वेगळे का झालो?"
 
4. 'त्यांच्या हातात वाघनखं असतील तर काय?'
जे कुणी खुर्ची खेचण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा नाही करत आहेत. त्यांनीच तुम्हाला जर खुर्चीवर बसण्यासाठी त्यांच्या मदतीचा हात तुमच्याकडे केला, तर तुम्ही तो देणार का, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, "हात हातात घेताना हातामध्ये वाघनखं नाहीत ना, ज्या वाघनखानानं अफझलखानाचा कोथळा काढला होता, ती वाघनखं असतील तर माझा हात फाडून घेतील. असं काही करायचं असेल 25 ते 30 वर्षांपासून एकत्र असताना का तुटलो, एकमेकांपासून कुणी कुणाला ढकललं, हे आधी पाहिले पाहिजे."
 
5. 'सत्तेसाठी वखवखलेपणा नको'
कोरोना संकटाचा सामना करत असताना सत्तेसाठी वखवखलेपणा करू नये, अशीही टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता केली आहे.
 
ते म्हणाले, "पक्षीय राजकारणापेक्षा आता लोकांसमोर जगावं कसं हा प्रश्न आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. नवीन नोकऱ्या कधी मिळतील हे सांगता येत नाहीये. कोरोना किती काळ राहिल हे सांगता येत नाही. मला सत्ता कशासाठी पाहिजे हा विचार माझ्या डोक्यात स्पष्ट नसेल तर सत्ता देणारी माणसं विरोधात जातील.
 
"कुणीही केवळ वखवखल्याप्रमाणे सत्ता मिळवली, पाडापाडी करून मिळवली तर आपला देश अराजकतेकडे चालला आहे. कोरोना ही धोक्यांची घंटा आहे, ती सगळ्या राजकीय नेत्यांच्या डोक्यात वाजली पाहिजे. पण जर ती वाजली नाही आणि कोरोना काळातही आपण राजकारण करत बसलो तर देशात अराजक होईल.
 
भाजप काय म्हणतं?
आमच्या अजेंड्यावर सरकार पाडणे नसून कोव्हिडचा लढा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत यापूर्वी स्पष्ट केलं आहे.
 
ते म्हणाले, "मी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता आहे. मी वारंवार सांगितलंय की आमच्या अजेंड्यावर कोव्हिड आहे. आमच्या अजेंड्यावर सरकार पाडणे आता नाही. आणि ज्याप्रकारे मी हे सांगितलंय तसं ते घडतंय. पहिल्या दिवसापासून मी म्हणत होतो की आपल्या अंतर्विरोधानं हे सरकार पडेल त्यावेळेस लोकांना खरं वाटत नव्हतं.
 
"पण आता अंतर्विरोधाचा बोजा हा लोकांना जाणवायला लागला आहे. पॉलिसी पॅरालिसीस लोकांना जाणवायला लागलं आहे. आमच्यात भरपूर संयम आहे, आम्ही विरोधी पक्षाचं काम अचूक करत आहोत. विरोधी पक्ष म्हणून जनतेची गाऱ्हाणी मांडतोय. मला विश्वास आहे की आम्हाला काहीही करायची गरज नाही, हे सरकार आपोआप आपल्या वजनानं पडेल."
 
भाजपावर टीका करणे सोपे आहे. कारण, ती ऐकून घेतली जाते, असंही फडणवीसांनी म्हटलंय.
 
ते म्हणाले, "माध्यमं आणि समाजमाध्यमांमध्ये तु्म्ही भाजपवर कितीही टीका करू शकता, त्यात कुठलीही अडचण नाहीये. पण समाजमाध्यमांमध्ये शिवसेना किंवा सरकार किंवा मुख्यमंत्र्यांविरोधात एक पोस्ट टाकली तरी कारवाई होते. सरकारवर टीका करणार्‍या 10,000 भाजपा कार्यकर्त्यांवर कारवाई झाली."