गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जून 2022 (14:24 IST)

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...' व्हायरल क्लिपमधील शहाजी पाटील कोण आहेत?

'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... एकदम ओक्केमधी हाय..'मागील दोन दिवसापासून सोशल मीडियावर, व्हाट्सअप ग्रुपवर एका व्हायरल कॉल रेकॉर्डिंगची जोरदार चर्चा आहे.
 
ते कॉल रेकॉर्डिंग आहे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचं. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे बंडखोरी करून आसाम मधील गुवाहाटी मध्ये तळ ठोकून आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शहाजीबापू पाटील देखील आसाम मध्ये आहेत.
 
शहाजी पाटील हे सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. आसाममधून आपल्या एका कार्यकर्त्याला केलेला त्यांचा कॉल राज्यभर प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या बोलण्यावरून मिम्सचा धुमाकूळ सुरू आहे.
 
शहाजी पाटील यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत
 
विद्यार्थी चळवळीतून राजकारणात
सध्या शिवसेनेतून आमदार असलेल्या शहाजी पाटील यांचा राजकारणाची सुरुवात काँग्रेसच्या एनएसयुआय पासून झाली. या काळात ते शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी आंदोलनात सक्रिय होते.
एनएसयुआयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ते युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असा प्रवास करत त्यांनी आपल्या सक्रिय राजकारणाला सुरुवात केली.
 
1990 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना युवक काँग्रेसच्या कोट्यातून सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारी मिळाली. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
 
कॉलेज जीवनापासून वक्तृत्वावर पकड
"शहाजीबापू यांच्या डोक्यात कोणत्या गावात, कोणत्या भाषेत, काय बोलायचं स्क्रिप्ट तयार असते. याचा अनुभव त्यांच्या या ठरवून व्हायरल केलेल्या कॉलमध्ये येतो आहे," असे मत सोलापूर लोकमतचे निवासी संपादक सचिन जवळकोटे व्यक्त करतात.
 
ते म्हणतात, "शहाजीबापू पाटील यांची कॉलेज जीवनापासून वक्तृत्वावर पकड आहे. आजपर्यंत ते फक्त दोनच निवडणुका जिंकले आहेत. पण त्यांच्या सभांना मात्र कायम गर्दी होत आली आहे. आपल्या भाषणात गावरान भाषेत किस्से सांगत, अनेक दाखले देत ते श्रोत्यांचा टाळ्या-शिट्या मिळवत असतात."
 
गणपतराव देशमुख यांचा पराभव करून विधानसभेत
सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि गणपतराव देशमुख हे समीकरण संपूर्ण राज्याने पहिले आहे. 1962 पासून गणपतराव देशमुख सलग या मतदारसंघातून निवडून येत होते. पण शहाजी पाटील यांनी 1995 साली गणपतराव देशमुख यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला. फक्त 192 मतांनी ते निवडून आले होते.
 
1995 सालचा एक विजय सोडला तर शहाजी पाटील यांना सलग पराभवाला सामोरं जावं लागलं. 1995 नंतर 1999, 2004, 2009 असे सलग पराभव त्यांनी स्वीकारले.
 
काँग्रेस ते शिवसेना व्हाया राष्ट्रवादी
आपल्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधूला करणारे शहाजी पाटील यांनी राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला पण विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी 1999 ची विधानसभा अपक्ष म्हणून लढवली. याही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
 
त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2004 ची विधानसभा काँग्रेसच्या तिकिटावर लढवली.
 
सलग चार पराभव
अखेर 2014 च्या विधानसभेपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण तरीही त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यांनतर शहाजी पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीकीमुळे भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा असताना युतीच्या वाटपात जागा
 
शिवसेनेला सुटल्यामुळे 2019 विधानसभा ते शिवसेनेच्या चिन्हावर लढले.
 
2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी गणपतराव देशमुख यांनी माघार घेतल्यामुळे गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांच्याशी त्यांची लढत झाली त्यात ते विजयी झाले.
 
सलग चार पराभव पचवल्यानंतर 2019 मध्ये ते फक्त 674 मतांनी विजयी झाले. 1990 पासून आजपर्यंत तब्ब्ल सात निवडणुका लढवून शहाजी पाटील यांना फक्त दोनदा विजय मिळवता आला आहे आणि त्यांचे दोन्ही विजय निसटते आहेत.
 
1995 मध्ये फक्त 192 तर 2019 मध्ये फक्त 674 मतांनी त्यांना विजय मिळवता आला आहे. "त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तरुण वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला होता." असे मत सचिन जवळकोटे व्यक्त करतात.