शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मार्च 2022 (08:44 IST)

यशवंत जाधव: 'मातोश्री'च्या 2 कोटी 50 लाखांच्या भेटीवरून चर्चेत असलेले यशवंत जाधव कोण आहेत?

मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांची प्राप्तीकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान दोन कोटी 50 लाख रुपयांच्या भेटवस्तू 'मातोश्री'ला दिल्याची नोंद यशवंत जाधव यांच्या डायरीत असल्याचं वृत्त आहे.
 
उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नाव 'मातोश्री' आहे. त्यामुळे या डायरीत असलेला उल्लेख उद्धव ठाकरेंबाबतचा आहे का अशी चर्चा सुरू आहे.
 
या चर्चेत थेट ठाकरेंचं नाव आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पण यशवंत जाधव यांनी 'मातोश्री' म्हणजे माझी आई असाही खुलासा केल्याचं समजतय. पण यावर आता राजकारण सुरू झाले आहे.
 
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यशवंत जाधव यांच्या ईडी चौकशीची मागणी केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया देताना, 'अनेकजण आपल्या आईचा उल्लेख मातोश्री असा करतात' असं म्हटलंय. 'मातोश्री' च्या उल्लेखामुळे चर्चेत आलेले यशवंत जाधव कोण आहेत?
 
यशवंत जाधव यांची राजकीय कारकीर्द
यशवंत कमलाकर जाधव हे शिवसेनेचे उपनेते आहेत. 1978 पासून ते शिवसैनिक आहेत. 1997 साली पहिल्यांदा माझगावमधून मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. 1997 ते 2002 पर्यंत जाधव हे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य राहिले. 2001 ते 2002 ते प्रभाग समितीचे अध्यक्ष झाले.
2002 मध्ये नगरसेवक पदाची त्यांची संधी हुकली. त्यादरम्यान संघटनेसाठी शिवसेना पक्षाने उपविभाग प्रमुखाचं पद दिलं. त्यानंतर 2007 साली ते पुन्हा नगरसेवक झाले.
 
2008 ते 2009 ते बाजार आणि उद्यान समितीचे अध्यक्ष होते. 2011 मध्ये जाधव यांना शिवसेनेचं उपनेते पद देण्यात आले. 2012 ला झालेल्या निवडणुकीत यशवंत जाधव यांचा पराभव झाला. पण त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या निवडून आल्या.
 
2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ते तिसर्‍यांदा नगरसेवक झाले. 2017-2018 त्यांनी सभागृह नेत्याची जबाबदारी पार पाडली. 2018 ला त्यांना मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष करण्यात आले.
 
2018 ते मार्च 2022 पर्यंत ते स्थायी समिती अध्यक्ष राहिले. जाधव यांनी भायखळ्यामधून विधानसभेची निवडणूकही लढवली पण त्यांचा पराभव झाला.
 
130 कोटींची संपत्ती 300 कोटींवर?
विधानसभेत मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यशवंत जाधव यांच्यावर खळबळजनक आरोप केला.
 
ते म्हणाले, "स्थायी समिती अध्यक्षांकडे सुरुवातीला 138 कोटींची संपत्ती होती. आता ती 300 कोटींच्या घरात पोहोचली आहे. 24 महिन्यात 38 संपत्ती खरेदी केल्या आहेत. हे 24 महिने कोरोनाच्या काळातील असल्यामुळे जंबो कोव्हिड सेंटरमध्ये मोठा घोटाळा झाला आहे हे स्पष्ट आहे."

यशवंत जाधव यांच्यावर 25 फेब्रुवारीला 2022 ला आयकर विभागाने छापा मारला. त्यातून निर्माण झालेल्या संशयावरून जाधव यांच्याशी संबंधित असलेल्या स्वीय सहायक, कंत्राटदार असे 25 ठिकाणी यांच्यावरही छापे मारण्यात आले. यशवंत जाधव यांची विविध तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.
 
पत्नीमुळे आले अडचणीत?
यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी यशवंत जाधव या शिवसेनेच्या आमदार आहे. एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांचा पराभव करत 2019 ला यामिनी जाधव या विधानसभेवर निवडून गेल्या.
 
यामिनी जाधव या मुंबई महापालिकेच्या नगरसेविका राहील्या आहेत. शिक्षण समितीच्या सदस्य आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य म्हणून त्यांनी काम पाहीलं आहे.
यामिनी जाधव यांनी 2019 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोलकत्ता येथील प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबतच या व्यवहाराचा उल्लेख केला आहे.
 
या कंपनीने त्यांना 15 कोटी रुपये दिलेत आणि त्यातून जाधव कुटुंबाने भायखळ्यातील एका इमारतीत गुंतवणूक केल्याचा उल्लेख आहे त्यानंतर काही कालावधीनंतर जाधव कुटुंबीयांनी हे पैसे या कंपनीला परत केले मग पुन्हा या कंपनीने हे पैसे न्यूजहॉक मल्टी मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिले. ही मल्टीमिडीया कंपनी विमल अग्रवाल नावाच्या व्यक्तीची आहे.
 
ही व्यक्ती काही गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याची माहिती आहे. या विमल अग्रवालला 30 कोटींची कंत्राटं मिळवून देण्यासाठी यशवंत जाधव यांनी मदत केल्याचा संशय आयकर विभागाला आहे.