गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (15:26 IST)

प्रियंका गांधी यांना काँग्रेस उत्तरप्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित का करत नाही?

- सुशीला सिंह
उत्तर प्रदेशच्या प्रभारी असलेल्या प्रियंका गांधी निवडणुकांमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा विविध राजकीय पक्षांनी निषेध केला. राजकीय नेते घटनास्थळी पोहचण्याचा प्रयत्न करतायत परंतु सरकारकडून त्यांना रोखलं जात आहे.
 
घटनास्थळी जात असताना सीतापूरजवळ काँग्रेसच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
प्रियंका गांधी यांनी ट्वीटरवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या म्हणतात, "शेतकऱ्यांना ज्यापद्धतीने चिरडलं गेलं त्याबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आपल्यासोबत होत असलेल्या अन्यायाचा विरोध शेतकरी अनेक दिवसांपासून करत आहेत. पण त्यांचं ऐकायला सरकार तयार नाही. शेतकऱ्यांना चिरडण्याचे आणि संपवण्याचे राजकारण सरकार करत आहे."
 
या व्हीडिओमध्ये त्या पुढे सांगतात, "हा देश शेतकऱ्यांचा आहे आणि भाजपच्या विचारधारेला बांधील नाही. शेतकऱ्यांनी देश बनवला आणि उभा केला. बळ वापरण्याचा नैतिक अधिकार पोलिसांनी गमवला आहे. मी गुन्हा करण्यासाठी घरातून बाहेर पडले नाही. मी केवळ पीडित कुटुंबांची भेट घेण्यासाठी चालले आहे. त्यांचे अश्रू पुसण्यासाठी जात आहे. मी काय चुकीचं करतेय?"
 
"मी चुकीचं करत असते तर तुमच्याकडे ऑर्डर असायला हवा होती. वॉरंट असायला हवे होते. तुम्ही गाडी थांबवत आहात. मला थांबवत आहात. मला कशासाठी थांबवलं जात आहे? मी सीओंना बोलवत आहे, मात्र ते लपतायत. जर तुम्ही योग्य काम करत आहात तर लपत का आहात?"
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनीही एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात प्रियंका गांधी आणि हरियाणा काँग्रेसचे नेते दीपेंद्र हुड्डा पोलीसांसोबत बाचाबाची करताना दिसत आहेत. यात प्रियंका चिडलेल्या दिसतात.
 
"मला तुम्ही आधार सांगा, ऑर्डर दाखवा, वॉरंट दाखवा आणि तुमच्याकडे यापैकी काहीच नसेल तर मला थांबवण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. आम्ही चार जण आहोत. तुम्ही काय समजता? लोकांना मारु शकता, शेतकऱ्यांना चिरडू शकता, तुम्हाला वाटतं तुम्ही आम्हालाही रोखू शकाल."
 
खरं तर ही पहिलीच वेळ नाही जेव्हा प्रियंका गांधी सरकारविरुद्ध एवढ्या आक्रमक झाल्याचं पहायला मिळाल्या.
 
प्रियंका गांधींचा आक्रमकपणा
तुम्हाला आठवतंय का? प्रियंका गांधी जेव्हा माजी आयपीएस अधिकारी एसआर दारापुरी यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात होत्या तेव्हा त्यांचा पोलिसांशी वाद झाल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.
 
तेव्हाही त्या थांबल्या नाहीत. एका कार्यकर्त्याच्या स्कूटरवर त्या एसआर दारापुरी यांच्या घरी गेल्या. दारापुरी नागरिक संशोधन कायद्याविरोधात (CAA) आंदोलन करत होते.
 
सोनभद्र येथील जमिनीच्या वादात आदिवासींच्या हत्येचं प्रकरण असो वा हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण किंवा मग कोरोना काळात कामगारांच्या प्रवासाचा प्रश्न असो, प्रियंका गांधी अशा प्रत्येक मुद्यावर सक्रिया दिसल्या. उत्तर प्रदेशातील पीडित जनतेपर्यंतच पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसल्या.
 
राजकारणात सक्रिय
यूपीतील लोकसभा मतदारसंघ अमेठी आणि रायबरेली यांच्याशी त्यांचं जुनं नातं आहे. वडील राजीव गांधी यांच्याव्यतिरिक्त आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांच्यासाठीही त्यांनी इथे प्रचार केला आहे. परंतु उत्तर प्रदेशाच्या राजकारणात त्यांचा प्रवेश तेव्हाच निश्चित मानला जाऊ लागला जेव्हा त्या या राज्याच्या सरचिटणीस बनल्या.
 
प्रियंका गांधीना उत्तर प्रदेशात काँग्रेसचा चेहरा म्हणून पाहिलं पाहिजे का?अशी चर्चा आता सुरू झालीय. यासंदर्भात काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनीही संकेत दिलेत.
प्रियंका गांधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टक्कर देऊ शकतात का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, "निवडणुकीत विजय कोणाचा होणार हे येणारा काळच सांगेल. प्रियंका गांधी यांचा चेहरा त्यांच्या (आदित्यनाथ) चेहऱ्यापेक्षा उत्तम आहे आणि हेच सत्य आहे."
 
लखनौमध्ये निवडणुकीच्या जाहीरनाम्यासंदर्भात नुकतीच काँग्रेसची एक बैठक पार पडली. यावेळी सलमान खुर्शीद यांनी प्रियंका गांधी लोकांना भेट असून पारदर्शी पद्धतीने काम केलं जाईल असं आश्वासन देत आहेत अशी माहिती दिली.
 
'प्रियंका गांधी यांच्यात क्षमता आणि कौशल्य'
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय झा बीबीसीशी बोलताना सांगतात, "प्रियंका गांधी यांची भूमिका केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर देशभरात महत्त्वाच्या आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. आम्हाला माहिती आहे की दिल्लीचा मार्ग लखनौहून जातो. परंतु अनेक वर्षांपासून काँग्रेस राज्यात इतर पक्षांवर अवलंबून आहे. पक्षाची स्थिती कमकुवत आहे. तेव्हा ही परिस्थिती अचनाक बदलणार का हे वेळच सांगू शकेल."
 
ते पुढे सांगतात, "सध्याचं वातावरण पाहता आणि भाजप अनेक बाबतीत अपयशी दिसत असताना प्रियंका गांधी यांच्यासाठी ही संधी आहे. लोकशाही धोक्यात आहे. कोरोना, अर्थव्यवस्थेचं संकट, बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढला आहे. अशा परिस्थितीत प्रियंका गांधी यांच्याकडे अध्यक्ष पदावर नियुक्त होण्याची संधी आहे आणि काँग्रेसला नव्हे तर देशाला एक नवी दिशा देण्याची संधी आहे."
 
यासंदर्भात बोलताना ज्येष्ट पत्रकार रशीद किडवई सांगतात, 2012 मध्ये अशाच पद्धतीने राहुल गांधी यांच्या नावाची उत्तर प्रदेशाच चर्चा होती. पण ते यासाठी तयार झाले नाहीत. त्यानंतर काँग्रेसची परिस्थिती आणखी बिकट झाली.
 
किडवई सांगतात,"सलमान खुर्शीद यांनी जे सांगितलं ते एका गटाचं म्हणणं आहे. दुसरा गट असं म्हणू शकतो की, त्यांनी अध्यक्ष बनावं, सरचीटणिस बनावं किंवा पक्षात येणाऱ्या समस्या सोडवाव्या."
 
संजय झा सांगतात, "प्रियंका गांधी यांच्याकडे दृष्टिकोन आहे. त्या लोकांना प्रेरणा देतात. त्यांच्यात कौशल्य आणि क्षमता आहे. त्या संघर्ष करण्यासाठीही तयार आहेत. त्या योग्य मुद्दे मांडतात. लोकांशी त्यांचा व्यवहार आणि संबंध चांगले आहेत. त्या चांगला प्रचार करतात. निवडणुकीच्या माध्यमातून त्या पक्षाच्या अध्यक्ष बनल्या पाहिजेत. त्या पक्षासाठी एक ट्रंप कार्ड सिद्ध होऊ शकतात."
 
ते पुढे सांगतात, "प्रियंका गांधी पुढे आल्या तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. काँग्रेसचे सर्व सदस्य, तरुण, ज्येष्ठ नेते, जी-23 सर्वजण त्यांच्यासोबत उभे राहू."
 
पत्रकार स्मिता गुप्ता अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचं वृत्तांकन करतात. त्या सांगतात, एखादी मोठी घटना झाल्यानंतर प्रियंका गांधी पूर्ण ताकदीनीशी राजकारणात सक्रिय होताना दिसतात, मुद्दे मांडतात पण हाथरस किंवा लखीमपूरसारथख्या घटना दररोज होत नाहीत.
 
'राजकारणात केवळ वक्तव्य करणं पुरेसं नाही'
प्रियंका गांधी यांच्या नेतृत्त्वात उत्तर प्रदेशच्या निवडणुका पार पडतील असं सांगितलं जात आहे. स्मिता गुप्ता सांगतात, "पक्षाला दूरगामी फायदा मिळवून द्यायचा असेल तर प्रियंका गांधी आणि राहुल गांधी दोघांनीही टॅलेंट दाखवलं नाही. कारण अशा घटना केवळ एका दिवसापुरत्या असतात, भाषणं आणि वक्तव्यांची चर्चा तेवढ्यापुरती होते. त्यांचं भाषण राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रभावी आहे. परंतु केवळ याने काम होणार नाही."
 
राहुल किंवा प्रियंका गांधी निवडणुकीत चेहरा बनले तर काँग्रेसला फायदा होईल, कार्यकर्ते सुद्धा उत्साहात काम करतील परंतु यामुळे विजय मिळेल असं सांगणं कठीण आहे.
 
2019 मध्ये प्रियंका गांधी यांना यूपीसाठी सरचिटणीस बनवण्यात आलं आणि आता काही महिन्यांनंतर राज्यात निवडणूक होणार आहे.
प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवण्याविषयी आणि पक्षाचा अध्यक्ष नियुक्त करण्याविषयी त्या सांगतात, "त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नाहीत. तुम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना कधीही विचारलं की राहुल गांधी की प्रियंका गांधी तर ते राहुल असं उत्तर देतील. कारण त्या उद्धट किंवा अभिमानी आहेत. व्यासपीठावर त्यांची आक्रमकता, प्रत्युत्तर देण्याची योग्यता चांगली वाटते आणि राहुलमध्ये ती दिसत नाही. परंतु कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांची प्रतिमा खास चांगली नसल्याचं तुम्हाला दिसेल."
 
स्मिता गुप्ता सांगतात, "प्रियंका, इंदिरा गांधी नाहीत ज्या निवडणुका जिंकल्या आहेत. जर त्या निवडणूक जिंकत नाहीत मग त्यांचा अभिमान कोणी का सहन करेल? 2014 आणि 2019 मध्ये निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तुमच्याकडे कोणी का येईल? जे जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनाही सन्मानाची अपेक्षा आहे."
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अखिलेश प्रताप सिंह यांचं मात्र वेगळं मत आहे. त्यांच्यानुसार, जनता प्रियंका गांधींना गंभीरतेने घेते. ते सांगतात, "जनतेच्या मुद्यांसाठी रस्त्यावर येणाऱ्या त्या एकमेव नेत्या आहेत. त्यांचा आवाज बनल्या आहेत. सहा वेळा त्यांना ताब्यात घेतलं गेलं. शेकडोवेळा त्यांना पकडलं. अनेकदा धक्काबुक्की केली गेली. मिर्झापूर येथील शेतकऱ्यांचं प्रकरण असो वा इलाहाबादमध्ये मासेमाऱ्यांचा प्रश्न त्या कायम जनतेसोबत दिसल्या."
 
त्यांच्यानुसार, "सरचिटणीस पदाचं काम त्या योग्य पद्धतीने सांभाळत आहे. हे पद सुद्धा मोठं आहे. पक्षात कोणाची भूमिका काय असेल याचा निर्णय केवळ हाय कमांडकडून घेतला जातो."
 
'संकट मोचक' प्रतिमा
रशीद किडवई सांगतात, प्रियंका गांधी आता पक्षात एखाद्या संकट मोचक किंवा फायर फायटरच्या भूमिकेत दिसतात. अहमद पटेल यांची जागा भरुन काढण्याचा प्रयत्न करतानाही दिसतात.
 
ते म्हणाले, "उत्तर प्रदेशच्या राजकीय घडामोडींकडे त्यांचं लक्ष असतं. तसंच नाराज असलेल्यांचं ऐकून घेण्याचं कामही करताना दिसतात. पंजाब, छत्तीसगड आणि राजस्थानच्या प्रकरणात दिसून आलं. काँग्रेसमध्ये जे नाराज आहेत ते सर्व त्यांच्याकडेच जाताना दिसतात."
 
मात्र प्रियंका गांधी यूपीत मुख्यमंत्री पदाचा काँग्रेसचा चेहरा का नसू शकतात याविषयी ते सांगतात, यासाठी आपल्याला 2004 सालचं उदाहरण पहावं लागेल. त्यावेळी राहुल गांधी आपली इंग्लंडमधील नोकरी सोडून सक्रिय राजकारणा आले. त्यावेळी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना वाटलं की त्यांनी आपलं करिअर सोडून राजकारणात येऊन मोठा त्याग केला आहे."
 
"प्रियंका गांधी राजकारणात 2019 साली राहुल गांधी यांची मदत करण्यासाठी आल्या. त्यांची जागा घेण्यासाठी नाही. सोनिया आणि प्रियंका गांधी यांचा केवळ एकमेव उद्देश आहे तो म्हणजे राहुल गांधी राजकारणात आणि पक्षात क्रमांक एकचे नेते राहतील. ही पार्श्वभूमी पाहिल्यानंतर लक्षात येते की प्रियंका गांधी कधीही स्वत:ला दावेदार बनवणार नाहीत,"