मोबाइल प्रेक्षकांसाठी प्रियांकाचा नवा शो
क्वॉन्टिको आणि बाजीराव मस्तानीसारख्या कलाकृतींमधून प्रेक्षकांची वाहवा मिळवल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका वेगळ्या स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘इटस् माय सिटी’या पहिल्या वहिल्या मोबाइल सीटकॉमच्या माध्यमातून पीसी अभिनेत्री आणि निर्मातीच्या भूमिकेत दिसणार आहे.
मुंबईत एका फ्लॅटमध्ये राहणार्या चार तरुणींवर हा सीटकॉम अर्थात सिच्युएशनल कॉमेडी शो आधारित आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या ‘फ्रेण्डस्’ किंवा ‘झी मराठी’वर गाजलेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’सारख्या मालिकेचं स्वरुप या शोला असेल. विशेष म्हणजे फक्त ‘नेक्स्टजीटीव्ही’या डिजिटल व्हिडिओ मोबाइल अँपसाठी हा शो तयार करण्यात येत आहे. 14 भागांची ही मालिका आठवडय़ातून दोन वेळा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रियांका यात घरमालकिणीच्या भूमिकेत असून मुंबईत स्थिरस्थावर होताना आपण ज्याप्रकारे खस्ता खाल्ल्या, तो माझा प्रवास यातून दिसेल, अशी माहिती प्रियांकानेच दिली. प्रेक्षक या कथेशी रिलेट करु शकतील, असा विश्वास तिला वाटतो. प्रियांकाचं ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ही प्रोडक्शन कंपनी या शोची सहनिर्माती आहे. हिंदी आणि प्रादेशिक भारतीय चित्रपटातून नव्या टॅलेंटला वाव देण्यासाठी या कंपनीची स्थापना प्रियांकाने केली. सोबतच मराठी, भोजपुरी, पंजाबी चित्रपटांची नजीकच्या काळात निर्मिती करण्याचा प्रियांकाचा मानस आहे.