गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

ऑरी : ज्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोक 20 ते 30 लाख देतात तो सोशल मीडिया स्टार कोण आहे?

Auri
दिग्दर्शक राजामौली यांचा बाहुबली हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सगळीकडे एकाच गोष्टीची चर्चा होती- कटप्पाने बाहुबलीला का मारलं?
 
आता याच धर्तीवर सोशल मीडियावर एकच प्रश्न विचारला जातोय- अनेक सेलिब्रिटींसोबत वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये दिसणारा ऑरी उर्फ ओरहान अवात्रामणि कोण आहे?
 
बॉलिवूड स्टार्सच्या पार्टीमधले फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात. पापाराझींचे कॅमेरे कायम या स्टार्सचे फोटो टिपायला उत्सुक असतात. सध्या त्यांच्या कॅमेऱ्यात वारंवार कैद होणारा चेहरा म्हणजे ऑरी...एकवेळ ते पार्टीतल्या सेलिब्रिटीला विसरतील, पण ऑरीला विसरणार नाहीत.
 
ऑरीचं मूळ नाव आहे ओरहान अवतरामणी आहे. व्यावसायिक सूरज अवतरामणी आणि शहनाझ अवतरामणी यांचा हा मुलगा आहे.
 
त्याने न्यूयॉर्कच्या पार्सन्स स्कूल ऑफ डिझाईनमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय. लहानपणापासूनच तो अनेक बड्या उद्योगपतींच्या मुलांसोबत तसंच बॉलिवुडमधल्या स्टारकिड्सबरोबर राहिलाय.
 
त्याच्या LinkedIn प्रोफाईलवर तो स्वतःला सोशल अ‍ॅक्टिविस्ट म्हणतो. तसंच तो स्वत:ला गीतकार, गायक, क्रिएटिव्ह डायरेक्टर, फॅशन स्टाइलिस्ट असल्याचंही सांगतो.
 
स्टार किड्ससोबत मैत्री
न्यासा देवगण, सारा अली खानपासून जाह्नवी कपूरपर्यंत अनेक स्टार किड्स ऑरीला आपला चांगला मित्र मानतात. तो या सगळ्यांसोबत अनेकदा पार्ट्यांमध्येही असतो.
 
खुशी कपूर, अनन्या पांडे, तारा सुतारिया या ऑरीसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात.
 
शाहरुखची मुलगी सुहानासोबतही ऑरीची खूप चांगली मैत्री आहे.
 
ऑरीची मैत्री केवळ बॉलिवूड स्टार्सपुरती मर्यादित नाहीये. अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका मर्चंटसोबतही ऑरी दिसला आहे.
 
'कॉफी विथ करण'च्या आठव्या सीझनमध्ये होस्ट करण जोहरने सारा अली खान आणि अनन्या पांडेला याबद्दल प्रश्न विचारले.
 
'कॉफी विथ करण'मध्ये झालेल्या या उल्लेखानंतर ऑरी उर्फ ओरहान अवतरमणि 'बिग बॉस'च्या घरात पोहोचला.
 
'बिग बॉस'मध्ये आल्यानंतर सलमान खाननेही त्यांना विचारलं की, तू नेमकं काम काय करतोस? त्यावर त्याने उत्तर दिलं की, मी स्वतःवर काम करतो.
 
याशिवाय ऑरी हा मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये विशेष प्रकल्प व्यवस्थापक म्हणूनही काम करतो.
 
ऑरीचा ‘तो’ फोटो व्हायरल झाला तेव्हा
ऑरी न्यूयॉर्कमध्ये राहत असतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्या चित्रात ऑरीच्या सोबत काईली जेनर होती.
 
काईली ही एक अमेरिकन मॉडेल आणि बिझनेसवुमन आहे. ऑरी तिला भेटायला तिच्या घरी गेला होती.
 
त्या फोटोनंतर ऑरीला एक ओळख मिळाली.
 
काइली जेनरसोबतच्या फोटोतला हा तरुण कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी लोकांना उत्सुकता लागली आणि नंतर हा ट्रेंड चालू राहिला.
 
भारतात पापाराझींनी पहिल्यांदा ऑरीला जान्हवी कपूरसोबत पाहिले होते. त्यानंतर जान्हवी कपूरच्या चाहत्यांना वाटले की, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.
 
पण नंतर अनेकांनी त्याला न्यासा देवगण म्हणजेच काजोल आणि अजय देवगणच्या मुलीसोबत पाहिले.
 
त्यानंतर त्याचे अनेक फोटो वेगवेगळ्या स्टार किड्ससोबत आले. मेट गाला कार्यक्रमादरम्यान मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीसोबत पोज दिल्याने ऑरीची लोकप्रियता आणखी वाढली.
 
तिथून फोटोंचा ट्रेंड सुरू झाला आणि आता ऑरी हे नाव सर्वांनाच माहिती झाले आहे.
 
अंबानी कुटुंबाशी ओळख
​​ऑरी हा टॉम फोर्ड आणि प्राडासारख्या मोठ्या ब्रँडसोबत काम करतो. ऑरीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये विशेष उत्पादन व्यवस्थापक आहे.
 
हे देखील एक कारण आहे की त्याचे अंबानी कुटुंबाशी संबंध आहेत. एवढेच नाही तर ऑरीचे वडीलही व्यावसायिक आहेत.
 
ऑरीचे वडील मद्य, हॉटेल आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात.
 
ऑरीचे बालपण मोठ्या आनंदात गेले. त्याने त्याचे बालपणीचे शिक्षण एका मोठ्या शाळेत केले जेथे कियारा अडवाणी सारख्या अनेक स्टार्सने शिक्षण घेतले आहे.
 
ऑरीने न्यूयॉर्क पार्सन्स स्कूल ऑफ डिझाइनमधून ललित कला आणि कम्युनिकेशन डिझाइनमध्ये पदवी घेतली आहे.
 
तिथे तो बॉलिवूड स्टार्स आणि बिझनेसमनच्या मुलांना भेटला. हे सर्वजण ऑरीच्या वयोगटातील होते आणि त्यांनी एकत्र अभ्यासही केला होता.
 
'मी स्वतःवर काम करतो'
जेव्हा ऑरीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला तेव्हा बॉलीवूड अभिनेता सलमान खानने ऑरीला विचारले की तो काय काम करतो? यावर त्याने उत्तर दिले, 'मी खूप मेहनत करतो.'
 
जेव्हा सलमानने पुन्हा विचारले की, हे साधारण 9 ते 5 काम आहे का?
 
यावर त्यानं उत्तर दिलं की, तो स्वतःवर खूप मेहनत करतो.
 
"मी स्वतःवर काम करतो. मी जिमला जातो, मी स्वतःला सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतो, कधी कधी मी योगा करतो, मसाज करायला जातो, मी वर्कआउट करतो, पण मी स्वतःवर काम करतो."
 
सोबत फोटो काढण्यासाठी 20 ते 30 लाख मिळतात
आपण पैसे कसे कमवतो याविषयी ऑरीने एकदा सलमान खानला सांगितलं. त्याने सेलिब्रिटी पार्ट्यांना जाण्यामागचं कारणही सांगितलं.
 
तो म्हणाला, "मला पार्ट्यांमध्ये जाण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. उलट लोक म्हणतात की, माझ्या लग्नाला ये आणि माझ्यासोबत अशी पोज दे, माझ्या कुटुंबासोबत अमुक पोज दे आणि मग फोटो सोशल मीडियावर टाक."
 
त्यासाठी मला एका भेटीत 20 ते 30 लाख रुपये मिळतात.
 
ऑरीच्या मते लोक त्याला भेटायला आतूर असतात आणि त्यांच्या मते ऑरीच्या भेटीने त्यांना आणखी तरुण वाटतं.
 
“मी स्पर्श केल्यावर त्यांना वय कमी झाल्यासारखं वाटतं. म्हणजे 28 वर्षांचे असतील तर 22 वर्षांचे असल्यासारखं वाटतं आणि 38 असेल तर 32," ऑरी सांगतो.
 
आपल्यासोबतच्या भेटीने अनेकांच्या आरोग्याच्या समस्या कमी झाल्याचं लोकांनी सांगितल्याचंही ऑरी म्हणतो.
 
ऑरी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे लाखो चाहते आहेत. ऑरी हे त्याच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखला जातो. तो स्वत:ला गायक, गीतकार आणि फॅशन डिझायनर म्हणवतो.