गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 8 जून 2022 (15:11 IST)

‘तारक मेहता का’मालिकेमध्ये दया परतणार

dayaben
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’या अतिशय लोकप्रिय मालिकेच्या लाखो चाहत्यांसाठी खुषखबर आहे. या मालिकेतील अतिशय लोकप्रिय पात्र दया बेन हिचे पुनरागमन होणार आहे. या मालिकेच्या निर्मात्यांनी त्याचा प्रोमो प्रसिद्ध केला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दया बेन परतणार याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. अखेर आता दया परतणार आहे. विशेष म्हणजे, मालिकेतील पात्र जेठालालच्या नव्या दुकानाच्या शुभारंभप्रसंगी दया ची भेट प्रेक्षकांना होणार आहे.
 
मालिकेतील तारक मेहताची भूमिका करणारे कलाकार शैलेश लोढा यांनी मालिका सोडली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा झटका बसला. आणि आता ‘तारक मेहता’च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. शोमधील प्रसिद्ध पात्र दया बेन पुनरागमन करीत आहे. बऱ्याच दिवसांपासून दया बेन च्या पुनरागमनाबद्दल अनेक अंदाज बांधले जात होते. मात्र चाहत्यांना पुन्हा निराश व्हावे लागले होते. ‘तारक मेहता’मध्ये जेठालाल आणि दया यांची जुगलबंदी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
 
असित मोदी यांनी सांगितले की, कोणत्याही चांगल्या वेळी दया बेनला प्रेक्षकांसमोर आणले जाईल. ‘आमच्याकडे दया बेनचे पात्र परत न आणण्याचे कोणतेही कारण नाही. मागील काही काळ आपल्या सर्वांसाठी कठीण गेले आहेत. आता परिस्थिती थोडी चांगली झाली आहे. सन 2022 मध्ये कोणत्याही चांगल्या वेळी आम्ही दया बेनचे पात्र परत आणणार आहोत. जेठालाल आणि दया भाभी यांचे मनोरंजन प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. आणि आता दया बेन परतणार असल्याचा प्रोमो प्रसारीत करण्यात आला आहे.
 
या मालिकेतील दया बेन चे पात्र अभिनेत्री दिशा वाकाणी या साकारत होत्या. दिशा वाकाणी हिने मॅटर्निटी लिव्ह घेतली होती. तीला आता दोन मुले आहेत. दुसऱ्या अपत्याला तिने काही दिवसांपूर्वीच जन्म दिला आहे. त्यामुळे दया चे पात्र साकारण्यासाठी दिशा वाकाणी परतण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. परिणामी, हे अतिशय लोकप्रिय पात्र दुसरीच अभिनेत्री साकारणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचा खुलासा मालिकेत आता लवकरच होणार आहे.