बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (13:54 IST)

कंगना राणावतला मुंबई हायकोर्टाचा झटका, जावेद अख्तरांबद्दल केलेली विधानं भोवणार...

अभिनेत्री कंगना राणावतला मुंबई हायकोर्टानं झटका दिला आहे. कंगनाविरुद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर एका न्यायालयानं केलेल्या कारवाईला स्थगिती द्यायला हायकोर्टानं नकार दिलाय.
 
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार जस्टिस रेवती मोहित डेरे यांनी कंगनाची याचिका फेटाळून लावली आहे. हायकोर्टानं आपला निर्णय 1 सप्टेंबरपर्यंत सुरक्षित ठेवला होता.
 
जावेद अख्तर यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंगनाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पत्रकार अर्णब गोस्वामींना दिलेल्या एका टीव्ही इंटरव्ह्यूमध्ये कंगनाने आपल्याविरोधात निराधार आणि चुकीची वक्तव्यं केली. त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं.
 
जून 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये उपस्थित असलेल्या एका विशिष्ट 'गटा'चा हवाला देत कंगनाने एका मुलाखतीत आपल्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचा दावा जावेद अख्तर यांनी आपल्या तक्रारीत केला होता.
 
या तक्रारीनंतर गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात न्यायालयाने जुहू पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आणि कंगनाविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई सुरू करण्याची सूचनाही केली.
 
याप्रकरणी काय काय घडलं होतं?
गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीवरून मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 1 मार्च 2021 ला अभिनेत्री कंगना राणावतविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केलं.
 
अंधेरीच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 1 फेब्रुवारी रोजी कंगनाला समन्स बजावून 1 मार्चला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण कंगना त्यादिवशीही न्यायालयात हजर झाली नाही.
 
याप्रकरणी मॅजिस्ट्रेट आर. आर. आर. खान यांनी कंगनाविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केलं.
 
कंगनाला बजावण्यात आलेलं समन्स कायद्यानुसार घालून दिलेल्या प्रक्रियेचे पालन न करता बाजवण्यात आला होता असा युक्तिवाद कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला होता.
 
दंडाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करू, असं सिद्दीकी यांनी म्हटलं होतं.
 
या प्रक्रियेला आव्हान दिलं जात असलं तरी उच्च न्यायालयाने समन्सला स्थगिती न दिल्यास कंगनाला निर्देशानुसार न्यायालयात हजर राहावं लागेल असा युक्तिवाद जावेद अख्तर यांचे वकील वृंदा ग्रोव्हर यांनी केला होता.