शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 11 एप्रिल 2023 (21:06 IST)

पुष्पा-2: अल्लू अर्जुनच्या नव्या 'लुक'चे रहस्य काय, कांताराचा प्रभाव की आणखी काही

पुष्पा नाम सुनकर फ्लावर समझे क्या?… फायर है मैं, फायर !2021 मध्ये आलेल्या 'पुष्पा द राईज' अर्थात पुष्पा पार्ट 1 मधलं हे वाक्य ऐकलं नाही अशी व्यक्ती सापडणं दुर्मीळ आहे. सोशल मीडियावर तर हे वाक्य तुम्ही हजार वेळा ऐकलं असेल.त्याची क्रेझ संपते न संपते तोच पुष्पा 2 म्हणजेच 'पुष्प द रुल'चा टीझर प्रदर्शित झाला.
 
'पुष्पा द राईज' मधला पुष्पाचा तो लूक आणि त्या पात्रांची स्टाईल लोकांच्या पसंतीस पडली होती. त्यानंतर आता पुढच्या पार्टमध्ये काय असेल याची उत्सुकता शिगेला असताना पुष्पा-2चा टीझर आला.
 
दोन दिवसांपूर्वी पुष्पाची एक झलक दाखवणारा टीझर प्रदर्शित झाला. टीझरची सुरूवात अल्लू अर्जुनचा शोध घेण्यापासून होते.
 
जंगलात, शहरात, शेतात, गल्ली-बोळात पोलीस पुष्पाचा शोध घेत असतात. पुष्पा गायब असल्याची सर्वत्र चर्चा सुरू असते.
 
लोकांसाठी देवदूत असलेला पुष्पा पोलिसांसाठी चोर आहे आणि पोलीस त्याचा तपास करत आहेत. पुष्पा पोलीस कोठडीत नसल्याने लोक काळजी करू लागतात आणि त्यासाठी पोलिसांविरोधात आंदोलन करतात. पोलीस या लोकांवर लाठी हल्ला करतात.
यात पुष्पा दिसतो, मात्र अगदी काही सेकंदांसाठीच...
खरा पुष्पा उलगडला तो अल्लू अर्जुनने शेअर केलेल्या पोस्टरमधून. पोस्टरमध्ये दिसत असलेल्या पुष्पाच्या गळ्यात लिंबू- मिरचीच्या माळा दिसत आहेत. तसेच त्याच्या गळ्यात फुलांचा माळा, भरपूर दागिने दिसत आहेत.
 
बोटात अंगठ्या, हातात बांगड्या, निळी साडी आणि ब्रोकेड ब्लाऊज नाकात नाथ आणि निळे रंगाचे शरीर आणि चेहरा असा अल्लू अर्जुनाचा लूक आहे.
 
अल्लू अर्जुनचा हा लूक पाहून लोकांना ‘कांतारा’ची आठवण झाली. त्यातही रिषभ शेट्टीचा असाच लूक पाहायला मिळाला होता.
 
त्यामुळे सोशल मीडियावर अल्लू अर्जुनच्या या लूकचं कनेक्शन एका धार्मिक परंपरेशी असल्याचं बोललं जातंय. काही नेटकऱ्यांनी हा लूक ‘गंगम्मा यात्रे’पासून प्रेरित असल्याचा दावा केलाय.
 
गंगाम्मा यात्रा आणि पुष्पाचं कनेक्शन ...
तर आधी ही गंगाम्मा यात्रा नेमकी काय आहे ते समजून घेऊ. कर्नाटक आणि आंध्रप्रदेशच्या काही भागांमध्ये एक लोककला उत्सव साजरा केला जातो.
 
जवळपास सात दिवस चालणारी ही गंगाम्मा यात्रा मे महिन्यात आयोजित केली जाते. या यात्रेत खूप मोठी पूजा असते. काही भागांमधील लोक देवीला मांसाहारी स्वरूपाचा नैवेद्य अर्पण करतात. आता या सात दिवसांमधील मधले जे दोन दिवस असतात त्या दिवशी ही यात्रा आयोजित केली जाते.
 
या यात्रेमध्ये पुरुष आपला वेश बदलून येतात. अल्लू अर्जुनने ज्याप्रमाणे हातात बांगड्या, गळ्यात दागिने, ब्लाउज, साडी, लिपस्टिक आणि नेलपॉलिश लावली आहे त्याप्रमाणे या यात्रेत पुरुष सहभागी होतात. आणि केवळ पुरुषच नाही तर मुलेही वेगवेगळ्या पोशाखात दिसतात.
 
आता चित्रपटात चित्तूर आणि तिरुपती अशा ज्या दोन ठिकाणांचा उल्लेख केलाय त्याच ठिकाणी ही यात्रा भरते.
या गंगाम्मा यात्रेयीविषयी चित्तूर आणि तिरुपती मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मान्यता आहेत. असं म्हटलं जातं की खूप वर्षांपूर्वी चित्तूरमध्ये एक भयानक साथरोग पसरला होता.
 
या साथीत कित्येक लोक दगावले, नेमकं काय करायचं कोणालाच काई समजत नव्हतं. अशावेळी गावच्या सरपंचाने एक उपाय सुचवला आणि त्याप्रमाणे संपूर्ण गावात हळद आणि कडुनिंबांनी तयार केलेलं पाणी शिंपडण्यात आलं. अशा प्रकारे चित्तूरमध्ये गंगाम्मा यात्रा सुरु झाली.
 
पण तिरुपतीमधील गंगाम्मा यात्रा अगदीच वेगळी आहे...
तिरुपतीमध्ये गंगम्माची सात मंदिरे आहेत. गंगम्माचा जन्म अविला इथे झाला होता. ताथैयगुंटा जवळील गंगाम्माला चिंचा गंगाम्मा म्हणून देखील ओळखलं जातं. याच ठिकाणी ही यात्रा भरते.
 
गंगम्मा ही कलियुगातील श्रीनिवास यांची धाकटी बहीण आहे. त्यामुळे दरवर्षी भरणाऱ्या यात्रेसाठी डोंगरावरील श्रीवेंकटेश्वराच्या मंदिरातून भेटवस्तू आणण्याची परंपरा आहे.
 
शेकडो वर्षांपूर्वी तिरुपती आणि आजूबाजूच्या गावांवर पालेगलांचे राज्य होतं. त्यांच्या राज्यात महिलांचा छळ व्हायचा, बलात्कार व्हायचे. तिरुपतीवर राज्य करणारा पालेगा तर त्याहूनही क्रूर होता.
 
त्याचं नाव 'पलेगोंडालू' असं होतं. एकदम दुष्ट, लबाड असलेला हा व्यक्ती महिलांवर अत्याचार करायचा, त्यांच्याशी गैरवर्तन करायचा. याच दरम्यान 'गंगम्मा'ने अवतार घेतला. ही देवी तरुण वयात आल्यानंतर सुंदर दिसू लागली.
 
पलेगोंडालूची नजर तिच्यावर पडली. त्याने तिच्यासोबतही गैरवर्तन करायला सुरुवात केली. याचा राग येऊन देवीने त्याच्यावर हल्ला केला. पण तो तिथून निसटला आणि एका अज्ञातस्थळी जाऊन लपला. तो बाहेर यावा यासाठी देवीने वेगवेगळी शहरं गाठली. पलेगोंडालू बाहेर यावा म्हणून तिने त्याला शिव्या द्यायला, चिथावणी द्यायला सुरुवात केली.
 
देवीने पुढे तिरुपतीमध्ये यात्रेचं आयोजन केलं. या यात्रेत तिरुपती भागातील लोक विचित्र पोशाख घालून बाहेर पडू लागले. गंगम्माने या यात्रेत पलेगोंडालूला शिव्याशाप द्यायला सुरुवात केली. यात्रेच्या सातव्या दिवशी पलेगोंडालू बाहेर पडला. आणि तो दिसताक्षणी गंगाम्मा देवीने त्याचा वध केला, अशी आख्यायिका असल्याची माहिती द हिंदूच्या वेबसाइटवर आहे.
 
ती परंपरा आजही कायम आहे. एप्रिल आणि मे महिन्यात भरणाऱ्या या यात्रेवर दिग्दर्शक सुकुमार 'पुष्पा 2' मध्ये काही दृश्ये दाखवणार असल्याची चर्चा आहे.
 
त्यामुळे जर पुष्पा 2 मधील पुष्पराज या यात्रेत सहभागी झाला, तर त्याच्या शत्रूला मारण्यासाठीच त्याने देवीचं रूप घेतलं असण्याची दाट शक्यता आहे.
Published By- Priya Dixit