1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (07:20 IST)

रजनीकांत : योगी आदित्यनाथांच्या पाया पडले, ‘राजाभैय्यांना भेटले’ वाद झाल्यावर म्हणतात...

rajanikanth
ANI
गेल्या आठवड्यात सुपरस्टार रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती.
त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगींना नमस्कार केला आणि नंतर त्यांच्या पाया पडले.
 
रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांना फुलांचा गुच्छ भेट दिला आणि त्यानंतर दोघांनीही फोटोसाठी पोज दिली.
 
मुख्यमंत्री कार्यालयाने हे फोटो प्रसिद्ध केल्यानंतर रजनीकांत यांच्यावर सोशल मीडियावर बरीच टीका होऊ लागली.
 
रजनीकांत हे योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. पण तरीही ते त्यांच्या पायांना स्पर्श करत असल्याचे लोक म्हणाले. आता रजनीकांत यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
 
रजनीकांत सोमवारी (21 ऑगस्ट) रात्री चेन्नईला परतले. तेव्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या पायांना स्पर्श केल्याच्या वादावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
 
याला प्रत्युत्तर देताना रजनीकांत म्हणाले की, "संन्यासी आणि योगींचे पाय स्पर्श करणे ही त्यांची सवय आहे, मग त्यावेळी आपण समोरच्या व्यक्तीच्या वयाचा विचार करत नाही."
 
"संन्यासी असो की योगी, माझ्यापेक्षा व
 
 
याने लहान असले तरी त्यांच्या चरणांना स्पर्श करण्याची माझी सवय आहे. मी तेच केले," असं रजनीकांत म्हणाले.
 
रजनीकांत यांच्यावर जोरदार टीका का झाली?
रजनीकांत गेल्या आठवड्यात त्यांच्या 'जेलर' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी उत्तर प्रदेशात पोहोचले होते.
 
त्यांना हा चित्रपट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत पाहायचा होता. पण मुख्यमंत्री व्यग्र असल्याने तसं घडलं नाही.
 
लखनऊमध्ये त्यांनी शनिवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
 
गाडीतून खाली उतरताच रजनीकांत यांनी हात जोडून नमस्ते म्हटले आणि नंतर योगी आदित्यनाथ यांच्या पायाला स्पर्श केला.
 
या व्हीडिओवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले की, "वय आणि उंची या दोन्ही बाबतीत योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा मोठे असलेले रजनीकांत त्यांच्या (योगी) पायाला स्पर्श करत आहेत. रजनीकांत 72 वर्षांचे आहेत आणि योगी 51 वर्षांचे आहेत. एक सुपरस्टार नेत्याच्या पाया का पडत आहे? आज त्यांनी माझा मनातील आदर गमावला आहे.”
 
दरम्यान रजनीकांत हे भाजपच्या नेत्यांशी जवळीक केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात येण्याची ही पहिलीच वेळ नाही.
 
2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले तेव्हा त्यांनी अमित शहा यांचे कौतुक केलं होतं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची तुलना कृष्ण-अर्जुनशी केली होती.
 
2021 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी रजनीकांत म्हणाले होते की ते 'आध्यात्मिक राजकारण' करणार आहेत.
 
यानंतर रजनीकांत यांच्या भाजपशी जवळीक असल्याची चर्चा जोर धरू लागली.
 
आता त्यांची भाजप नेते आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबतची भेट ही पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही पाहिली जात आहे.
 
पण यासंबंधीच्या प्रश्नावर रजनीकांत यांनी राजकारणावर बोलण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं आहे.
 
रजनीकांत यांनी रविवारी अयोध्येला भेट दिली. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी लताही होत्या. दोघेही हनुमानगढी मंदिरात गेले.
 
तिथून बाहेर पडताना रजनीकांत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “अयोध्येत येण्याचं माझं जुनं स्वप्न आज पूर्ण झाले आहे.”
 
राम मंदिर बांधल्यावर ते 'भव्य' दिसेल असंही रजनीकांत म्हणाले.
 
एक कार्टून शेअर करत काँग्रेस नेते उदितराज यांनी एक्सवर लिहिलंय, "असं दिसतंय की चित्रपट स्टार रजनीकांत यांना वाऱ्याची दिशा समजली आहे की पुढचे पंतप्रधान योगी असतील. तेव्हाच त्यांनी त्यांच्या पायाला स्पर्श केला, मोदीजींच्या नाही."
 
ANIने रजनीकांत यांनी दिलेल्या उत्तरावर उदितराज यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "योगी यांना भविष्यात पंतप्रधान म्हणून पाहिले जाऊ शकते अशी एक चर्चा आहे. रजनीकांत यांनी पंतप्रधान यांच्यासोबत असा शिष्टाचार दाखवला नाही.”
 
योगी आदित्यनाथ यांच्या पायाला स्पर्श करणाऱ्या रजनीकांत यांची तुलना काही लोकांनी शाहरुख खानशी केली आहे.
 
कारण शाहरुख खानने एका कार्यक्रमात मंचावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला स्पर्श केला होता.
 
दोन्ही प्रसंगांचे फोटो शेअर करत एका यूजरने एक्सवर लिहिलं की, "एक हिंदू म्हणून रजनीकांत यांना पीठाचे महंत योगी आदित्यनाथ यांच्या पायांना स्पर्श केल्याने काहींना अडचण वाटतेय. पण अभिनेता शाहरुख खानने ममता बॅनर्जी यांच्या पायांना स्पर्श केला तेव्हा त्यांना अडचण जाणवली नाही का?"
 
याशिवाय काही लोक रजनीकांत यांचा बचावही करत आहेत.
 
"त्याने (रजनीकांत) यूपीच्या मुख्यमंत्र्यांच्या पायांना स्पर्श केला नाही, त्यांनी गोरखनाथ मठाच्या महंताच्या पायाला स्पर्श केला. यामुळे ते इतर सी-ग्रेड कलाकारांपेक्षा वेगळे आहेत. जे हिंदू परंपरा आणि चालीरीतींची खिल्ली उडवतात,” असं एका एक्स युजरने म्हटलं आहे.
 
आणखी एका युजरने लिहिले की, "आंध्र प्रदेशचे मंत्री जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या पायाला स्पर्श करतात तेव्हा कोणालाही काळजी वाटत नाही. आता रजनीकांत योगी आदित्यनाथ यांच्या पायाला स्पर्श करतात तेव्हा एवढी चिंता का?"
 
रजनीकांत यूपीमध्ये आणखी कोणाला भेटले?
रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल झाला होता. या चित्रपटाला अनेक सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत.
 
लखनौच्या दौऱ्यात या अभिनेत्याने पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेतली.
 
यूपीच्या मुख्यमंत्र्यांशिवाय रजनीकांत आणि कुंडाचे आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ ​​राजा भैया यांच्या भेटीचीही चर्चा आहे.
 
राजा भैय्या यांनी रजनीकांतसोबतच्या त्यांच्या भेटीचा फोटो शेअर केला आणि लिहिले , "भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टारचा पाहुणचार करणं आमच्यासाठी खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. रजनीकांत एक अष्टपैलू अभिनेता तसंच एक उमदा माणूस आहे."
 
पण या भेटीनंतरही सुपरससासुपरस्टारवर टीका झाली
 
"रजनीकांतचे काय झाले? योगीनंतर आता रघुराज प्रताप सिंहला (अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी) ते भेटले," अशी पोस्ट एका एक्स युजरने केली असून, मीटिंगचा फोटो शेअर केला आहे.
 
दुसर्‍या युजरने लिहिले, "तुम्हाला वाटते का रघुराज प्रताप सिंह उर्फ ​​राजा भैया कोण आहे हे रजनीकांतला माहित नाही?"
 
रजनीकांत यांनी उत्तर प्रदेश दौऱ्यात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचीही भेट घेतली.
 
दोघांचा फोटो शेअर करत अखिलेश यादव यांनी सांगितले की, "दोघांची पहिली भेट 9 वर्षांपूर्वी झाली होती आणि तेव्हापासून ते दोघेही मित्र आहेत, पण म्हैसूरमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यापासून मी रजनीकांतचा चाहता आहे."
 






Published By- Priya Dixit