Widgets Magazine
Widgets Magazine

समाजमनाचे ज्वलंत विषय मांडणारे: यशोशिखर

book review
‘व्यक्तिमत्व विकासावर’ आधारित लेखक मंगेश विठ्ठल कोळी यांचा ‘यशोशिखर’ लेख संग्रहातील लेख समाजमनाचे ज्वलंत विषय मांडणारे आहेत. लेखक मंगेश कोळी व्यवसायाने ‘मानसशास्रीय सल्लागार’ असल्यामुळे, तरूणांना भेडसावणा-या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी या लेखसंग्रहात दिलेली आहेत. या लेखसंग्रहाचे प्रकाशन जयसिंगपूर येथील नामांकित ‘कवितासागर प्रकाशन’ संस्थाने केले आहे.
‘यशोशिखर’ लेखसंग्रहात एकूण २० लेख, व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारे, प्रेरणादायी आहेत. अपेक्षित ध्येय, गाठण्यासाठी मनाची तयारी, दृढता, आत्मविश्वास, जिद्द आदि गुणांची आवश्यकता असते. तरूणाईला आज योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मानवी मुल्यांची त्यांना जाण असणेही तितकेच जरूरीचे आहे. समाजिक समस्यांवर लेखन आजच्या काळाची खरी गरज आहे आणि ही जाण लेखकाला आहे असे या संग्रहातील लेख वाचताना जाणवते.
‘यशोशिखर’ या लेखसंग्रहास आबासाहेब मारूती सूर्यवंशी (माजी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर) यांची संग्रहातील सर्वच लेखांवर दृष्टीक्षेप टाकणारी विस्तृत, सुंदर प्रस्तावना लाभली आहे. प्रस्तावनेत लेखक मंगेश विठ्ठल कोळी यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना ते प्रस्तावनेत म्हणतात -

‘माझ्या आयुष्यात, समाजासाठी धडपडणारी, समाजासाठी काहीतरी करणारी अनेक माणसे आली पण मंगेश विठ्ठल कोळी नावाची ही व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी जाणवली. व्यवसायाने मानसशास्रीय सल्लागार असलेने अनेक तरूणांची मने, स्वभाव, त्यांचे छंद इत्यादी बाबत खोलवर विचार करणारे ते एक तरूण व्यक्तिमत्व आहे’

मनोगतात लेखक मंगेश विठ्ठल कोळी यांनी ‘यशोशिखर’ शब्दांचा अर्थ सुंदर उदाहरणासह सांगितला आहे. ऑफीसचे काम आटोपून, डोंगराच्या शिखरावरील कुलदैवतेच्या दर्शनाला निघालेला तरूण डोंगर पायथ्याशी पोहचतो तोवर सायंकाळचे सात वाजतात, तो तसाच डोंगर चढतो. चढता-चढता अंधार पसरतो. काळोख होतो. परिणामी तो घाबरतो आणि तिथेच मध्यंतरी थांबतो. तितक्यात तिथे साठीतला व्यक्ती येतो. त्यांच्याकड अंधुकसा दिवा असतो. तो तरूणाला विचारतो, का थांबलास? तो अंधाराचे कारण सांगतो. तो साठीतला व्यक्ती म्हणतो, चला मी ही तिकडेच चाललो आहे. तरूण म्हणतो, या तुमच्या दिव्याचा प्रकाश पाच - सहा पावलांपर्यतच जातोय. पुढे काळोख आहे. त्यावर साठीतल्या व्यक्ती ते, पाच - सहा पावले का असेना? दिसत तर आहे असे म्हणत दोघेही हळूहळू पुढे चालू लागतात. सूर्योदयापूर्वीच ते दोघे शिखरावर पोहचतात, दर्शन घेतात. तेव्हा त्या तरूणाला समजतं की, छोट्या पावलांनी, अंधुक प्रकाशातसुद्धा मार्ग काढत त्यांनी शिखर गाठले. तसेच स्वत:चे जीवन, व्यक्तिमत्व विकास घडवायचा असेल तर छोट्या - छोट्या गोष्टी एकत्र करून शिखर गाठता येते. अश्या सुंदर उदाहरणाने लेखकाने ‘यशोशिखर’ गाठण्याचे सुत्रच सांगितले आहे.

‘यशोशिखर’ या व्यक्तिमत्व विकास मूल्यांवर भर देणा-या लेखसंग्रहात लेखक मंगेश कोळी यांनी ध्येयपूर्तीसाठी आत्मविश्वास गरजेचा असतो हे सांगितले आहे.

‘रिजल्ट’ लेखात लेखकांनी आजच्या प्रत्येक व्यक्ती ‘रिजल्ट ओरियनटेड’ झाल्याचं सांगितलं आहे. यशस्वी होण्याचा मूलमंत्र सांगताना निर्धाराचे महत्व लेखकाने पटवून दिले आहे. आजच्या काळात नोकरी, व्यवसाय, शिक्षण या क्षेत्रात रिजल्टचे महत्व सांगितले आहे. त्याकरिता लागणारा निर्धार अतिशय महत्वाचा असल्याचं लेखक या लेखात सांगतात.
‘आत्मविश्वास’ लेखात लेखकांनी जीवनात आत्मविश्वासाचे अनन्यसाधारण महत्व याबाबत पटवून दिले आहे. आत्मविश्वास स्वभावात, बोलण्यात जाणवतो. नकारात्मक विचारामुळे सगळी अंगीभुत कौशल्य असूनही काही व्यक्ती अपयशाचे बळी ठरतात. मनातली अविश्वासाची भीती त्यांच्या जीवनावर विपरीत प्रभाव पाडत असते. यातून कोणत्याही गोष्टीची भीती न बाळगता, सकारात्मक दृष्टीकोनातून विचार केला तर, मनात आत्मविश्वास निर्माण होवून, यश मिळविता येते असा उपदेशात्मक विचारही लेखकांने या लेखात मांडला आहे.
‘ध्येय कशासाठी?’ या लेखात ध्येयप्राप्तीसाठी ध्यास, जिद्द, संकल्पाचे महत्व प्रकट केलेले आहे.मनाचा दृढ निश्चय ध्येयाकडे वाटचाल करण्यास मदत करतो असही त्यांनी या लेखात सांगितले आहे.

‘काय हवं, काय नको’ या लेखात लेखकांनी आजच्या पारंपारिक शिक्षणप्रणालीवर भाष्य केले आहे. शैक्षणिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक कुवत पाहून प्रत्येकाने करियर क्षेत्र निवडले पाहिजे असा संदेशही त्यांनी दिला आहे. गरजा ओळखून खर्चाचे गणित आणि मिळणारे उत्पन्न यांची योग्य सांगड जीवन आनंदी बनवते असं ते सांगतात. अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्लाही त्यांनी या लेखात दिला आहे. स्वत:ला काय हवं, काय नको हे उमगलं तर जीवन आनंदी, सुंदर, तणावमुक्त होईल असं लेखक या लेखात सांगतात.

‘नावात काय असतं’ या थोर विचारवंत शेक्सपियर यांच्या वाक्याचा उल्लेख करताना लेखक म्हणतात, ‘एखाद्याची ओळख त्यांच्या नावातून न होता, त्यांच्या कार्यामधून होते.’ राज्यातील अध्यापक विद्यालयाची गंभीर अवस्था, डी. एड. अभ्यासक्रमाची दुर्दशा याकडे लेखकाने विशेष लक्ष वेधले आहे.

‘स्वत:चा शोध’ लेखात लेखकाने स्वत:मधील सुप्त कलांगुणांना वेळीच ओळखून, त्यादिशेने मार्गक्रमण करणे जरूरी असल्याचे सांगितले आहे. अपयश पचवून आत्मपरिक्षणातून योग्य मार्ग निवडला तर यश नक्कीच मिळू शकते असे लेखक या लेखात सांगतात.
‘टँलेंटेड टिचर्स’ लेखात लेखकाने, चांगल्या शिक्षकांचा शोध घेण्याबाबतच्या योजना सुरू करण्याचे सुचविले आहे.

‘मँनेजमेंट गुरू’ या लेखात लोकांशी संवाद, आर्थिक कौशल्य, योग्य नियोजनाचे महत्व लेखकाने पटवून दिले आहे. व्यवसाय सेल्स आणि मार्केटिंगचे व्यवसायातील महत्व या लेखात लेखकाने सांगितले आहे.

करियर आणि नोकरी, सहकार्य, आत्मविश्वास वाढविण्याचे मूलमंत्र, संवाद, शंभर टक्के, स्वप्न साकारण्याचे सुत्र, यश -अपयश, निर्णायक वेळ, प्रत्येक क्षण सार्थकी लावा, करियर प्रेम, जीवन एक प्रवास, मानव की यंत्र यांसारखे इतरही सुंदर, प्रेरणादायी, जीवनमुल्ये शिकविणारे, व्यक्तिमत्व विकासात बदल घडविणारे मार्गदर्शनपर लेख आहेत. यात लेखक मंगेश विठ्ठल कोळी यांनी अतिशय सरळ साध्या, सर्वांना समजेल अशा ओघवत्या भाषेत विविध लेखाद्वारे अनमोल मार्गदर्शन केलेले आहे.

‘यशोशिखर’ लेखसंग्रहातील लेख व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारे, मार्गदर्शनपर, मनाचा विश्वास वाढविणारे असे आहेत. तेव्हा वाचकमित्र या प्रेरणादायी, जीवनमूल्ये शिकविणा-या लेखसंग्रहाचं स्वागत करतील याबाबत शंका नाही.

लेखक मंगेश विठ्ठल कोळी यांचा हा लेखसंग्रह
‘यशोशिखर’ नक्कीच वाचकांच्या मनात जागा करेल याची खात्री वाटते. त्यांच्या यापुढील प्रेरणात्मक, व्यक्तिमत्व विकासावर आधारित लेखन प्रवासास खूप - खूप शुभेच्छा!

लेखसंग्रह - यशोशिखर
पृष्ठ - ५२
संग्रह मूल्य - ६५/- रू.

लेखन: मंगेश विठ्ठल कोळी,
रूपा निवास, पुष्पक चित्रमंदिराच्या मागे, गणेशनगर, शिरोळ - ४१६१०३, तालुका- शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर


यावर अधिक वाचा :