शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: बुधवार, 27 जुलै 2016 (10:40 IST)

पुस्तक परिचय: कवितासंग्रह ‘भरारी’

आमचे स्नेही प्रा. एस. जी. केंद्रे (बीड) हे भौतिकशात्राचे प्राध्यापक होते व आता ते सेवानिवृत  झाले आहेत.  हिंदी, मराठी इंग्रजी इत्यादि साहित्याच्या अभ्यासकाने कविता लिहिल्या तर नवल नाही. परंतु भौतिकशास्त्रासारख्या क्लिष्ट विषय शिकवणा-या व्यक्तीने कविता लिहिणे हे कौतुकास्पद आहे.  सदर कवितासंग्रह ‘भरारी’ हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह आहे. एखादी विशाल नदी ज्याप्रमाणे जलवैपुल्याने भरभरून पण संथपणे वाहत असते आणि वाहताना तीरावरील वृक्षवल्लींचे  पोषण करत परिसरातील ओढे, नाले देखील पचवीत पुढे जात असते  त्याप्रमाणे समाज वास्तवाचे विविध रंग, विविध प्रवाह संथ गतीने उलगडत जाणारा जाणीव प्रवाह कवितेत आहे.
 
त्यांच्या कविता संग्रहाचे नाव ‘भरारी’ असे आहे. ‘भरारी’ या कवितासंग्रहाच्या माध्यमातून राजकीय, कौटुंबिक, सामाजिक व्यक्तींच्या जीवनातील प्रसंग, नातेसंबंध इ. विषय हळूवारपणे त्यांनी कवितेच्या माध्यमातून मांडले आहेत. आज मुलींचा जन्मदर कमी झाला आहे. तो वाढावा यासाठी शासनही प्रयत्नशील आहे ह्या आशयावर देखील त्यांनी कविता लिहिली आहे.
          ‘मुलगी जरी झाली तुला
        नको म्हणू तू ‘नकोशी’
        काय सांगावे तुझी कन्या 
        घेईल भरारी अवकाशी’
राजकारण व शासन कर्त्याविषयी भावप्रगट करणा-या कवितेतून आजच्या कलियुगात सत्तेसाठी वाटेल ते करणारे लोक आहेत. त्यांचे वर्णन ‘मतलबी हे ध्यान’ ह्या कवितेत केले आहे.  तसेच ‘घाई’ ह्या कवितेत निवडणूका आल्यावर कोणाला कशाची घाई होते याचे वर्णन केले आहे.
 
‘साखरपुडा’ ह्या कवितेतून पाहुणे, गाडी, सनई-चौघडा, वरमायीची लगबग इ. चे वर्णन आहे. ‘सुखाचा मंत्र’ ह्या कवितेतून कौटुंबिक वातावरण चांगले कसे असेल ते मौन, सामंजस्य, हास्य, समाधान, प्रेम ह्यातून कळते. ‘सौभाग्याचे लेणं’ ही कविता स्त्रीविषयक काही अनुभव प्रकट करणारी आहे. ज्यात अलंकाराचे काव्यात्मक वर्णन केले आहे.
 
‘वधुपिता झालो म्हणजे काय अपराध केला, हट्ट पुरविता पुरविता जीव मेटाकुटीस आला’ अशी वधुपित्याची अवस्था ‘वधुपित्याची खंत’ या कवितेतून मांडली आहे. ‘दिल्लीला पाठवा’ या कवितेतून राजकीय वलय कसे असते, निवडून आल्यावर काय काय करेल ह्या कल्पना मार्मिकतेने रंगवल्या  आहेत.  आजच्या युवा पिढीला  उद्देशून ‘चला मुलांनो’ देशासाठी काहीतरी करा असे सुचीत केले आहे.
           आपण सारे एक होऊ
           शपथेवर निर्धार करु 
           बांधण्यास मुसक्या अतिरेक्यांच्या 
           सरकारला मदत करु.
          ‘शिकवण वारीची’ ह्या कवितेतून एकात्मतेचे दर्शन घडते.
  
           पंढरीच्या वारीत भेटे 
           माणुसकीचा सागर 
           मन आनंदून जाई 
           ऐकून ‘विठ्ठल’ नामाचा गजर 
‘दुष्काळ’’ या कवितेतून दुष्काळामुळे ओढवलेल्या परिस्थितीचे विदारक सत्य समोर आले आहे. ‘फटका आरोग्याचा’ या कवितेतून निरोगी आयुष्य कसे जगावे याचा संदेश मिळतो. ‘अपेक्षाभंग’ हया कवितेतून त्यांनी दोन पिढ्यांमधील वैचारिक संघर्ष सासू-सुनांच्या माध्यमातून विषद केला आहे.  यावरुन त्यांचे सुक्ष्म निरीक्षण व संवेदनशिलता कळून येते.
 
ह्या कवितासंग्रहातील कविता वाचताना कवितांमध्ये लपलेले कविमन सतत जाणवत रहाते. सदर कवितांमधुन कवीची संवेदनशिलता, मानवतावादी वृत्ती, आजूबाजूचे वातावरण, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय घटनांचे तीव्र पडसाद प्रतीत होतात. ‘भरारी’ हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह आहे. त्यांच्या लिखाणात उत्तरोत्तर प्रगती होत जावो ही शुभेच्छा.
- प्रा. नानासाहेब कि. धारासूरकर