सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2019-20
Written By
Last Modified: लातूर-मुंबई , बुधवार, 19 जून 2019 (10:03 IST)

घोषणा करण्याच्या नादात या सरकारने अर्थसंकल्पही अगोदरच फोडला - अमित देशमुख

राज्य विधिमंडळात सादर झालेला सन २०१९-२० चा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे बोलघेवडेपणा पलिकडे काहीही नाही, विद्यमान महाराष्ट्र सरकारने ०५ वर्षात फक्त घोषणा करण्याचे काम केले आहे, घोषणा करण्याच्या नादात या सरकारने अर्थसंकल्पही अगोदरच फोडला आहे. त्यामुळे त्याची पूर्तता होणार नाही हे निश्चित आहे.

सरकारकडून झालेल्या या फसवणुकीला जनता मतपेटीतून उत्तर देईल अशी प्रतिक्रिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते.
 
गेल्या पाच वर्षातील युती सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. सरकारच्या या धोरणांबद्दल जनतेत मोठा असंतोष असून येत्या विधानसभा निवडणूकीत मतपेटीतून तो दिसून येईल असे सांगून अमित देशमुख पुढे म्हणाले की, राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी समाज हालाखीच्या परिस्थितीत असून विद्यमान सरकारच्या धोरणामुळे सर्व समाजातील जनतेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. धनगर आणि मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने या समाजाच्या विकासासाठी मोठे आमीष दाखविले असले तरी प्रत्यक्षात यासाठी आर्थिक तरतूद होते की नाही याबद्दल साशंकता आहे. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पैसा नसल्याने गोसीखुर्द प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून राबविण्याची आणि यासाठी केंद्राकडून निधी मागण्याची वेळ युती सरकारवर आली आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.