बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (08:47 IST)

राज्यात गेल्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त – आरोग्यमंत्री

4 lakh 42 thousand patients
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आज ७१ हजार ७३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
 
राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज किमान ६० हजारांच्या आसपास नवीन रुग्णांची नोंद होत आहे. आठवडाभरापूर्वी १८ एप्रिलला आतापर्यंतची सर्वाधिक ६८ हजार ६३१ इतके रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. आठवडाभरानंतर मात्र रुग्णसंख्येत जास्तीची वाढ झालेली आढळून आली नाही मात्र दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. त्याप्रमाणात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, ही दिलासा देणारी बाब ठरली आहे.
 
आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्स यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी बळ मिळत आहे. दैनंदिन नवीन रुग्णांच्या संख्येइतकेच बरे होणाऱ्यांची संख्या असल्याने नागरिकांच्या मनावरील ताण काहीसा कमी होताना दिसून येत आहे. गेल्या सहा दिवसातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या पाहिल्यास त्याची प्रचिती येते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
 
दि. २० एप्रिलला ५४ हजार २२४ रुग्ण घरी सोडण्यात आले. त्यानंतर २१ एप्रिलला ५४ हजार ९८५, २२ एप्रिलला ६२ हजार २९८, २३ एप्रिलला ७४ हजार ४५, २४ एप्रिलला ६३ हजार ८१८, २५ एप्रिलला ६१ हजार ४५० आणि आज २६ एप्रिल रोजी ७१ हजार ७३६ असे एकूण ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.