1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 27 एप्रिल 2020 (09:29 IST)

राज्यात कोरोना बाधित ११८८ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात आज ४४० नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ८०६८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे
आज राज्यात कोरोनाबाधीत ४४० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८०६८ झाली आहे. आज ११२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६५३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख १६ हजार ३४५ नमुन्यांपैकी १ लाख ७ हजार ५१९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८०६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ९२६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ९१६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
आज राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३४२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई येथील १२, पुणे महानगरपालिका येथे ३, जळगाव येथे २, सोलापूर शहरात १, तर लातूर येथे १ मृत्यू झाला आहे.
 
आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७ रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर २ रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. या १९ मृत्यूंपैकी ४ रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. उर्वरित १५ रुग्णांपैकी ११ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.