शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मे 2020 (16:32 IST)

'ऑक्सफर्ड'च्या लस चाचणीतून समाधानकारक निष्कर्ष

experts
करोना व्हायरसला रोखण्यासाठी ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटने लस विकसित केली आहे. आतापर्यंत या लस चाचणीतून समाधानकारक निष्कर्ष समोर आले आहेत. ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनी एक महत्वाचा अडथळा पार केला आहे. माणसांप्रमाणे प्राण्यांवर करण्यात आलेल्या लस चाचणीचा निष्कर्ष आश्वासक आहे. 
 
कुठल्याही नव्या आजाराशिवाय फुफ्फुसाचे नुकसान रोखण्यात “ChAdOx1 nCoV-19” लस परिणामकारक ठरली आहे. सहा माकडांना SARS-CoV-2 विषाणूचा डोस देण्यात आला. याच विषाणूमुळे जगभरात Covid-19 चा फैलाव झाला. या लसीच्या मानवी चाचणी कार्यक्रमात १ हजार स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
 
तज्ज्ञांनी ऑक्सफर्डच्या लस चाचणीच्या निष्कर्षांचे कौतुक केले आहे. ज्या माकडांना करोनावरील ही लस देण्यात आली. त्यांना न्युमोनियाची बाधा झाली नाही असे डॉ. पेन्नी वॉर्ड यांनी सांगितले.
 
भारतातील पुण्याची सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही संस्था ऑक्सफर्डच्या लस संशोधन प्रकल्पात भागीदार आहे. सिरमने ऑक्सफर्ड विद्यापीठासह एकूण सात जागतिक संस्थांशी लस उत्पादनासाठी भागीदारी केली आहे. पहिल्या सहा महिन्यात ५० लाख डोस तयार केले जातील.  साधारण सप्टेंबर-ऑक्टोबपर्यंत ही लस बाजारात येईल पण त्यासाठी मानवी वैद्यकीय चाचण्या यशस्वी होणे गरजेचे आहे.