1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 13 एप्रिल 2020 (08:07 IST)

वीजबिलातील स्थिर आकार/मागणी

fixed charge electricity
लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार/मागणी आकार पुढील ३ महिन्यांसाठी स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाउननंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड न आकारता तो समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर येथे दिली.
 
लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिलातील स्थिर आकार/मागणी आकार माफ करण्यात यावा, अशी मागणी अनेक औद्योगिक तसेच वाणिज्यिक ग्राहकांनी केली होती, ही मागणी ग्राह्य धरून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या ग्राहकांना मोठा दिलासा दिला. एएमआरमार्फत ज्या ग्राहकांचे मीटर वाचन उपलब्ध असल्यास अशा ग्राहकांना त्यांच्या मीटरवरील नोंदीनुसार वास्तविक बील देण्यात येईल. जर ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध नसल्यास त्या ग्राहकांना सरासरी वीजबिल आकारण्यात येईल. मे २०२० मध्ये एएमआरमार्फत बिलाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर वास्तविक मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारण्यात येईल.
 
लॉकडाऊनच्या कालावधीत कुठल्याही प्रकारचा वीज वापर झाला नसल्याचे समजून लॉकडाऊनच्या कालावधीतील शून्य वापराचे वीजबिल देण्यात येणार असल्याचे सांगून राऊत म्हणाले, अशा ग्राहकांचे मीटर रीडिंग मिळाल्यानंतर या ग्राहकांना लॉकडाऊनच्या कालावधीत नोंदविलेल्या वास्तविक वापराचे वीजबिल देण्यात येईल. तसेच लोड फॅक्टर/पीएफ सारखे सर्व प्रोत्साहन/सवलती उपलब्ध असतील. मार्च महिन्याच्या वीज वापराच्या बिलाचे देयक १५ मे असणार आहे. तर एप्रिल महिन्याच्या वीजवापराच्या बिलाचे देयक दिनांक ३१ मे राहील. या दोन्ही महिन्यांच्या बिलावर नियमाप्रमाणे अनुदान लागू असेल, असेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.