मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 13 एप्रिल 2023 (19:29 IST)

कोव्हिड पुन्हा फोफावतोय का? तुमच्या 6 प्रश्नांची उत्तरं

corona
सलमान रवी, जान्हवी मुळे
 देशात कोव्हिडच्या रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्यानं वाढते आहे.
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं 13 एप्रिल रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागच्या 24 तासांत 10 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले तर देशातल्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 45 हजारांवर पोहोचली आहे.
 
त्यातच काही तज्ज्ञांनी भारतात कोव्हिड आता एंडेमिक झाला असल्याचा अंदाज मांडला आहे. पण म्हणजे नेमकं काय?
 
कोव्हिडच्या रुग्णसंख्येत झालेली वाढ ही किती चिंतेची बाब आहे, त्यावर सरकार काय करतंय आणि तुम्ही आम्ही सर्वांनी काय काळजी घ्यायला हवी? तुमच्या मनातल्या सहा प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.
 
1. कोव्हिडचे आकडे अचानक का वाढले आहेत?
2020मध्ये कोव्हिडच्या पहिल्या लाटेनंतर आणि 2021मध्ये दुसऱ्या लाटेनंतर आता हा रोग येत-जात राहणार असं तज्ज्ञ सांगत होतेच.
 
पण सध्या पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जातेय.
 
WHO च्या माहितीनुसार भारतात कोव्हिडची रुग्णसंख्या अचानक वाढण्यामागचं मुख्य कारण आहे कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा XBB.1.16 हा एक नवा उपप्रकार.
 
WHOच्या तांत्रिक प्रमुख मारिया वॉन करखोव्ह यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं की, “हा सबव्हेरियंट काही महिन्यांपासून भारतात अस्तित्वात आहे. पण कुणा व्यक्तीमध्ये किंवा लोकांच्या समूहात या विषाणूची घातकता वाढलेली दिसत नाही.”
 
तरीही जागतिक आरोग्य संघटना भारतात या विषाणूच्या प्रसारावर बारकाईनं लक्ष ठेवून आहे.
 
2. नवा व्हेरियंट किती धोकादायक आहे?
भारतात वेगवेगळ्या शहरांमध्ये कोव्हिडच्या रुग्णसंख्येत गेल्या काही आठवड्यांत मोठी वाढ झाली आहे आहे, पण अजून रुग्णालयात दाखल करावं लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत तुलनेनं वाढ दिसत नाहीये.
 
भारतातले नावाजलेले साथरोगतज्ज्ञ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियॉलॉजीचे वैज्ञानिक सल्लागार जयप्रकाश मुलियिल यांच्यामते हा व्हेरियंट तेवढा धोकादायक नाही.
 
ते सांगतात की “कोव्हिडचा पहिला व्हेरियंट आला होता, तेव्हा जग त्याचा सामना करण्यासाठी अजिबात तयार नव्हतं. मग डेल्टा व्हेरियंट आला तेव्हा परिस्थिती आणखी बिघडली, कारण नेमकं काय चाललं आहे हे अनेकांना लक्षातही येत नव्हतं.
 
“आता नव्या व्हेरियंटमुळे आजारी पडणारे 95 टक्क्याहून जास्त रुग्ण ठीक होतायत.”
 
इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजे IMAचे अध्यक्ष शरद कुमार अग्रवाल सांगतात की ज्या लोकांमध्ये सौम्य लक्षणं आहेत ते टेस्ट करून घेत नाहीयेत.
 
त्यामुळे प्रत्यक्षात रुग्णसंख्या बरीच मोठी असण्याची शक्यता ते वर्तवतात.
 
3. लशींचा काही फायदा होत आहे का?
आता नवा व्हेरियंट अजूनही पसरतोय, म्हणजे आपण घेतलेल्या लशीचा काही उपयोग झाला आहे की नाही?
 
IMAचं म्हणणं आहे की लशीचे तीन डोस घेतल्यावर लोकांचा असा समज झाला आहे की आता त्यांना कोव्हिडपासून कायमचं संरक्षण मिळालं आहे.
 
पण मुळात हे लक्षात घ्यायला हवं, की लशीने संसर्ग होणं थांबत नाही तर आजाराचा परिणाम, त्याची तीव्रता कमी होते.
 
डॉ. जयप्रकाश मुलियाल स्पष्ट करतात की, “लशींमुळे संसर्गाचा प्रभाव कमी होत गेला. पण दरम्यान कोरोना विषाणूचे हजारो व्हेरियंट्स पसरत राहिले.
 
“ओमिक्रॉनचेही 900 हून अधिक व्हेरियंट्स आहेत, कारण व्हायरसच्या स्वरूपात बदल होत राहतात. ओमिक्रॉनचा प्रसार वेगानं होतो आहे आणि तो रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतो. पण लोक त्यातून बरेही होतात.”
 
लसीकरण आणि बहुतांश लोकांना आजार होऊन गेल्यानं हर्ड इम्युनिटीचा परिणाम जाणवत असल्याचंही मुलियाल नमूद करतात.
 
4. कोव्हिड एंडेमिक झाला आहे का?
भारतात कोव्हिड आता एंडेमिक झाल्याचं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
एंडेमिक म्हणजे काय, तर हे आजाराचं स्थानिक स्वरूप आहे. एखादा आजार एखाद्या समाजात कायमस्वरुपी वास्तव्य करून राहतो, तेव्हा तो आजार एंडेमिक झाला असं म्हटलं जातं. असे आजार ऋतू बदलतो तेव्हा डोकं वर काढतात.
 
भारतात कोव्हिडनं एंडेमिक झालाय, असं तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलं असेल. पण सरकारनं अधिकृतरीत्या तसं काही जाहीर केलेलं नाही.
 
5. सरकार काय करत आहे?
कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता देशातल्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर दाखल होणाऱ्या प्रवाशांची रँडम कोव्हिड टेस्ट केली जाते आहे.
 
कोरोनाचे ताजे आकडे पाहता केंद्र सरकारने 10 आणि 11 एप्रिल रोजी देशभरात मॉक ड्रिल घेतली होती, ज्यात रुग्णालयांच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला.
 
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की देशात जिथे श्वसनाचे आजार वाढले आहेत, अशा जागा म्हणजे इमर्जन्सी हॉटस्पॉट्स शोधून काढा आणि तिथे कोव्हिड चाचण्या आणि लसीकरण वाढवा.
 
दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलचे संचालक आणि कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉक्टर जुगल किशोर सांगतात की, “भारत सरकारच्या सूचनेनुसार कोव्हिड चाचण्यांचे ठराविक नमुने विशेष प्रयोगशाळांमध्ये जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवले जात आहेत, जेणेकरून कोरोनाच्या नेमक्या व्हेरियंट्सची ओळख पटू शकेल.”
 
6. लोकांनी काय काळजी घ्यायला हवी?
आता आकडे वाढलेत, म्हटल्यावर आपण सामान्य नागरिकांनी काय करायचं?
 
अनेक राज्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही शहरांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती पुन्हा आणली आहे तर काहींनी रुग्णालयांसारख्या ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक केलं आहे.
 
अर्थात बाकी आपल्याला माहिती आहेच - अनावश्यक गर्दी करू नका, गर्दीत जावं लागणार असेल तर मास्कचा वापरा. तुम्हाला कुठली लक्षणं जाणवत असतील तर मास्क जरूर घाला, स्वतःची चाचणी करून घ्या आणि शक्यतो स्वतःला विलगीकरणात ठेवा. पण हो, घाबरू नका. भीती नाही, माहिती बाळगा.
Published By -Smita Joshi