राज यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, हॉटेल व्यवसाय सुरु करण्याची केली मागणी  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी  प्रामुख्याने सामान्यांची गरज लक्षात घेता हॉटेल व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील मागणी राज यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी ट्विटवरुन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या पत्राचे फोटो ट्विट केले आहेत.
				   
				  				   
				  
	मुंबईसारख्या शहरांमध्ये हॉटेल ही चैन राहिली नसून गरज झाली आहे. त्यामुळेच आता सरकारने हॉटेल सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेणे गरजेचे असल्याचे राज यांनी म्हटलं आहे. “ गेले ३५ दिवस महाराष्ट्रातील उपहारगृह आणि रेस्टोरंटस पूर्णपणे ठप्प आहेत. याचा फटका जसा हॉटेल व्यवसायिकांना आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना बसला आहे, तसा सामान्यांना देखील बसला आहे. आज मुंबई आणि इतर शहरामध्ये ‘हॉटेल’ ही काही चैनीची गोष्ट राहिली नाही, तर गरज बनली आहे. अनेक छोटी हॉटेल्स आहेत, ‘पोळी-भाजी’ केंद्र आहेत, जिथे अगदी माफक दरात ‘राईसप्लेट’ मिळते. अशा हॉटलेस्ची, खानावळींची किचन्स सुरु होणं गरजेचे आहे. ह्या छोट्या खानावळींची आणि हॉटेल्सची संख्या प्रचंड आहे. कारण ह्या माफकत दरात मिळणाऱ्या ‘राईसप्लेट्स’वर राज्यातील मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. अनेकांच्या घरात जेवण बनवणारी व्यक्ती नसेल किंवा पुरेशी साधनसामुग्री पण नसेल, त्यांचा विचार आता सरकारने केला पाहिजे. हे वास्तव सरकारने स्वीकारलंच पाहिजे. करोनाचा संसर्ग रोखला जावा ह्यासाठी शारीरिक अंतर राखणं गरजेचं आहे हे मान्य आहे, पण ह्या हॉटेल्समधील पार्सल सेवा सुरु करायला काय हरकत आहे? अर्थात पार्सल सेवेची सौय करताना ग्राहकांमध्ये पुरेसं शारीरिक अंतर राखलं जातंय आणि योग्य स्वच्छता राखली जात आहे हे बघणं हे हॉटेल मालकांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते बजावलंच पाहिजे. यातून पार मृत झालेल्या राज्याच्या अर्थव्यवस्शेत काही प्रमाणात धुगधुगी तरी निर्माण होईल,” अशी अपेक्षा राज यांनी या पत्रामध्ये व्यक्त केली आहे.
				  																								
									  
	 
	हॉटेल व्यवसायाबरोबर राज यांनी वाईन शॉप्स सुरु करुन राज्याला महसुलाचा ओघ सुरु करता येईल का असा सवाल उपस्थित केला आहे. पार खडखडात झालेल्या राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची काही प्रमाणात आवक सुरु व्हावीच लागेल. किमान वाईन शॉप्स सुरु करुन राज्याला महुसलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे?” असं राज यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.