1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 15 डिसेंबर 2021 (22:29 IST)

ओमिक्रॉन कोरोना व्हेरिएंट अभूतपूर्व वेगाने पसरतोय-WHO प्रमुख

The Omicron Corona variant is expanding at an unprecedented pace - WHO chiefओमिक्रॉन कोरोना व्हेरिएंट अभूतपूर्व वेगाने पसरतोय-WHO प्रमुख Marathi Coronavirus News In Webdunia Marathi
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने कोरोनाचा व्हेरिएंट ओमिक्रॉन जगातील बहुतांश देशांमध्ये आधीच पोहोचल्याची शक्यता असून तो आता अभूतपूर्व वेगाने पसरत आहे असा इशारा दिला आहे.
 
जगभरातील 77 देशात हा व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अडनॉम गेब्रियेसस म्हणाले, "हा व्हेरिएंट कदाचित आधीपासूनच लोकांमध्ये असेल पण त्याची माहिती नसावी. तसेच हा अभूतपूर्व वेगाने पसरत आहे."
 
ओमिक्रॉनच्या प्रभावाला कमी लेखलं जात आहे हे पाहून चिंता वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले, "या व्हेरिएंटच्या धोक्याला आपण कमी लेखत असल्याचं नक्कीच दिसत आहे. ओमिक्रॉनमुळे आजार गंभीर होत नसला तरी त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्यास आपल्या आरोग्यसेवेवर परिणाम होऊ शकतो."
डॉ. टेड्रोस म्हणाले, "आधीच्या कोणत्याही व्हेरिएंटपेक्षा ओमिक्रॉन वेगाने पसरत आहे. कोरोना रोखण्यासाठी बूस्टर महत्त्वाची भूमिका पार पाडू शकेल. पण हा प्राथमिकतेचा प्रश्न आहे.
ज्या मृत्यू होत नाही किंवा गंभीर आजाराचा धोका कमी आहे अशा व्हेरिएंटसाठी बूस्टर देणं हे ज्यांना पहिलाच डोस मिळालेला नाही अशा लोकांचं आयुष्य धोक्यात आणेल. कारण लसपुरवठा कमी असल्यामुळे त्यांना अजूनही पहिला डोस मिळालेला नाही."
 
ओमिक्रॉनचा धोका परतवायला भारत सज्ज आहे का?
सध्या बहुतांश देशांत आणि भारतही बहुतांश ठिकाणी प्रवेशासाठी लशीचे दोन्ही डोस होणं आवश्यक आहे. तर काही ठिकाणी निगेटिव्ह आरटीपीसीआर सर्टिफिकेटही बंधनकारक आहे.
पण तरीही अनेकांनी अजून लस घेतलेली नाही. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ऑक्सफर्ड मार्टिन स्कूलनं जमा केलेली माहिती सांगते, की जगभरात जवळपास 55 टक्के लोकांना लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. पण जगभरातील देशांमध्ये लसीकरणाचं प्रमाण वेगवेगळं आहे.
 
भारतातही 30 नोव्हेंबरपर्यंत लशीचे एक अब्ज 23 कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. पण त्यात लशीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या जवळपास 44.8 कोटींच्या पुढे आहे. म्हणजे देशात सुमारे 36.2 टक्के लोकांचंच लसीकरण पूर्ण झालं आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य विभाग आणि कोविन वेबसाईटवरून घेतली आहे.
 
सिंगापूर, स्पेन, जपान, इटली, जर्मनी, युके, यूएसए, अशा देशांच्या तुलनेत हे प्रमाण बरंच कमी आहे. (ऑक्सफर्ड मार्टिन स्कूल, ऑक्सफर्ड विद्यापीठाची आकडेवारी)
 
महाराष्ट्राचा विचार केला, तर राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 80 टक्के लोकांनी कोरोनाविरोधी लशीचा पहिला डोस घेतलाय. तर, लशीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या मात्र, फक्त 40 टक्क्यांच्या आसपास आहे.
भारतात लसीकरणाचं प्रमाण कमी का आहे, यामागे अनेक कारणं आहेत, ज्याविषयी इथं वाचू शकता.
पण थोडक्यात सांगायचं, तर भारतात पुरेसं लसीकरण अजून झालेलं नाही, त्यामुळे नव्या व्हेरिटयंटमुळे पुन्हा साथ पसरण्याची भीती अजूनही कायम आहे. त्यामुळेच लसीकरणाचा वेग वाढवायला हवा असं तज्ज्ञांना वाटतं.
 
Omicron आणि इतर व्हेरियंटची लक्षणं वेगळी आहेत?
कोव्हिड-19 चा नवीन व्हेरियंट 'ओमिक्रॉन' हा घातक असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दक्षिण अफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरियंटचा शोध घेणारे तज्ज्ञ म्हणतात याची लक्षणं डेल्टा किंवा कोरोनाच्या इतर प्रकारापेक्षा वेगळी आहेत.
दक्षिण अफ्रिकेतील डॅा. ऐजेलीक कोईट्झी यांनी सर्वप्रथम ओमिक्रॉन व्हेरियंटचा शोध लावला. बीबीसीशी बोलताना त्या सांगतात, "या व्हेरियंटमुळे होणाऱ्या संसर्गाची लक्षणं अत्यंत सौम्य स्वरुपाची आढळून आली आहेत."
 
हा नवीन विषाणूचा प्रकार सर्वांत पहिल्यांदा 18 नोव्हेंबरला आढळून आला होता. त्या पुढे म्हणतात, "एक रुग्ण माझ्याकडे अत्यंत वेगळी लक्षणं घेऊन आला. त्याला खूप दमल्यासारखं वाटत होतं. ही लक्षणं जगभरात पसरलेल्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा खूप वेगळी होती. त्याचं शरीर दुखत होतं, स्नायू दुखत होते आणि थोडी डोकेदुखी होती. या रुग्णाचा घसा दुखत नव्हता फक्त खवखवत होता."
 
कोरोनाच्या इतर व्हेरियंटमध्ये लोकांच्या तोंडाची चव जाणे हे कोरोना संसर्गाचं लक्षण आहे. पण ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्यांमध्ये असं काहीच दिसून आलं नाही.
 
दक्षिण अफ्रिकेतील इतर तज्ज्ञांनीदेखील ओमिक्रोन व्हेरियंटची लागण झाल्याची हीच लक्षणं दिसत असल्याची माहिती दिलीये.
 
दक्षिण अफ्रिकेतील तज्ज्ञांच्या मते ओमिक्रोनचा संसर्ग झालेल्या काही रुग्णांना कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत.
 
तज्ज्ञांच्या मते कोरोनाची साथ पसरल्यापासून याची लक्षणं बदलली आहेत. ताप, सर्दी, खोकला, कफ, अंगदुखी, श्वास घेण्यात अडथळा, उलटी यासोबत डायरियासारखी लक्षणंही दिसून आली आहेत.