रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Updated : शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (09:30 IST)

PAK vs ENG : पाकिस्तानला भारताविरुद्ध सेमीफायनल होण्यासाठी इंग्लंडला 'असं' हरवावं लागेल

भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धीमध्ये क्रिकेट विश्वचषकाची फायनल व्हावी अशी दोन्ही देशांमधील बहुतेक फॅन्सची इच्छा असते.
 
वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या 48 वर्षांच्या इतिहासात हा योग अद्याप एकदाही आलेला नाही. यापूर्वी फक्त एकदा 2011 साली या दोन देशांमध्ये विश्वचषक स्पर्धेची सेमी फायनल झाली होती.
 
2011 नंतर तब्बल 12 वर्षांनी पुन्हा एकदा तो योग येणार अशी परिस्थिती गेल्या काही दिवसांमध्ये निर्माण झाली होती. ही शक्यता सध्या अवघड झाली असली तरी पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही.
 
पॉईंट टेबलची परिस्थिती काय?
विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यातील 45 पैकी 42 सामने आता पूर्ण झालेत. या 42 सामन्यानंतर 3 संघ सेमी फायनलसाठी पात्र झालेत.
 
यजमान भारतानं आत्तापर्यंत 8 पैकी 8 सामने जिंकले असून 16 पॉईंट्सह पहिला क्रमांक पटकावून मोठ्या दिमाखात सेमी फायनलमध्ये प्रवेश केलाय.
 
दक्षिण आफ्रिकेनं 9 पैकी 7 सामने जिंकून 14 पॉईंट्ससह तर ऑस्ट्रेलियानं आत्तापर्यंत 8 पैकी 6 सामने जिंकत अंतिम चारमधील जाग निश्चित केलीय. सेमी फायनलमधील चौथ्या जागेसाठी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात चुरस आहे.
 
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक सेमी फायनल होणार हे निश्चित झालंय. पण, पहिल्या क्रमांकावर असलेल्या टीम इंडियाविरुद्ध कोण खेळणार हे नक्की झालेलं नाही.
 
न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये कोण सेमी फायनल गाठणार? त्यापेक्षाही भारत-पाकिस्तान यांच्यात सेमी फायनल होणार का? हा क्रिकेट चाहत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेचा विषय आहे.
 
पाकिस्तानला काय करावं लागेल?
न्यूझीलंडनं शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेचा 5 विकेट्सनं पराभव केला. केन विल्यमसनच्या टीमनं गुरुवारी (9 नोव्हेंबर) झालेला सामना 160 बॉल राखत जिंकल्यानं पाकिस्तानची अडचण वाढलीय.
 
पॉईंट टेबलमध्ये 5 विजय आणि 4 पराभवासह 10 पॉईंट्सची कमाई करत न्यूझीलंडचा संघ सध्या चौथ्या क्रमांकवर आहे. त्यांचा रनरेट 0.743 इतका आहे.
 
पाकिस्ताननं आत्तापर्यंत 8 सामने खेळलेत. त्यामध्ये 4 विजय आणि 4 पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. 8 पॉईंट्ससह त्यांची टीम सध्या पाचव्या क्रमांकवर आहे.
 
पाकिस्ताननं इंग्लंडविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तर त्यांचेही न्यूझीलंड इतकेच 10 पॉईंट्स होतील. त्यावेळी रनरेटच्या आधारावर सेमी फायनलमधील चौथी टीम ठरेल.
 
रनरेट ही पाकिस्तानची सर्वात मोठी अडचण आहे. पाकिस्तानचा सध्याचा रनरेट 0.036 आहे. आता शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडपेक्षा अधिक रनरेट करण्यासाठी पाकिस्तानला मोठ्या चमत्काराची गरज आहे.
 
काय चमत्कार करावा लागणार?
पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी इंग्लंडला किमान 287 धावांनी पराभूत करणे आवश्यक आहे. कोलकातामध्ये होणाऱ्या सामन्यात पाकिस्ताननं दुसऱ्यांदा फलंदाजी केल्यास इंग्लंडनं दिलेलं आव्हान त्यांना फक्त 16 बॉलमध्ये (2.4 ओव्हर्स) पूर्ण करावं लागेल.
 
इंग्लंडनं या स्पर्धेत सपशेल निराशा केलीय. तर फखर झमाननं न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या दमदार शतकामुळे आपण मोठी धावसंख्या करू शकतो, हा पाकिस्तानचा विश्वास वाढलाय.
 
पाकिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करून 400 धावा केल्या आणि नंतर त्यांच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 113 धावांच्या आत रोखलं तर पाकिस्तान सेमी फायनलमध्ये जाण्याचा चमत्कार करू शकतं.
 
मुंबईकरांची निराशा?
पाकिस्ताननं इंग्लंडविरुद्ध चमत्कार करून सेमी फायनल गाठली तर मुंबईकरांची निराशा होणार आहे.
 
सेमी फायनलच्या पूर्वनियोजीत वेळापत्रकानुसार पहिल्या आणि चौथ्या क्रमांकाच्या टीमचा सामना मुंबईत तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या टीमचा सामना कोलकातामध्ये होईल.
 
भारताचा पहिला क्रमांक नक्की आहे. पाकिस्ताननं चौथ्या क्रमांकासह सेमी फायनल गाठल्यास हा सामना मुंबईत व्हायला हवा.
 
पण, आपण मुंबईत खेळणार नसल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं अगोदरच स्पष्ट केलंय. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना मुंबईत न होता कोलकातामध्ये होईल. त्यामुळे मुंबईकरांची मोठी निराशा सहन करावी लागेल.
 
भारताचं पारडं जड
पाकिस्तानला शेवटचा सामना जिंकण्यासाठी मोठा चमत्कार म्हणजेच ‘कुदरत का निजाम’ वर अवलंबून राहावं लागेल.
 
टीम इंडियाची तशी परिस्थिती नाही. सर्वच क्षेत्रात दमदार कामगिरी करत भारतानं सेमी फायनलमध्ये प्रवेश केलाय. सेमी फायनल गाठण्यासाठी अन्य कोणत्याही निकालावर अवलंबून राहण्याची गरज भारतीय टीमला भासली नाही.
 
भारत आणि पाकिस्तान यांच्यात वन-डे विश्वचषकात आत्तापर्यंत आठ सामने झाले असून हे सर्व सामने टीम इंडियानं जिंकले आहेत. या विश्वचषकात झालेला सामना ही टीम इंडियानं 7 विकेट्स आणि 117 बॉल राखत दणदणीत जिंकला होता.
 
टीम इंडिया विश्वचषक विजेतेपदापासून आता दोन सामने दूर आहे. त्यापैकी पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यापैकी कुणाविरुद्धही असला तरी त्यामध्ये भारतीय टीमचं पारडं जड असेल.
 
भारतीय क्रिकेट टीमनं या विश्वचषक स्पर्धेतील आत्तापर्यंतच्या कामगिरीनंच हा विश्वास निर्माण केलाय.