शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दासनवमी
Written By वेबदुनिया|

एकादशी व्रत

श्रीराम हा विष्णूचा अवतार, विष्णूच्या नाभिकमळातून ब्रह्म व ब्रह्माच्या ललाटातून रुद्र उत्तपन्न झाले. ह्याच क्रमाने ब्रह्मविद्येचा संप्रदाय सुरू झाला. म्हणून 'हिरण्यागर्भा समवर्तताग्रे' असे म्हटले आहे. या हिरण्यगर्भाचे स्वरूप व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन प्रकारचे आहे. हिरण्यगर्भातूनच 'मी' पणाचे स्फुरण स्फुरले. ते व्यक्तही आहे आणि अव्यक्तही आहे. 'मी' पणाची जाणीव मुळात अव्यक्त, पण ती स्फुरण रूपाने व्यक्त झाली. तीच महत् तत्त्वाची जाणीव आहे म्हणून वेदात 'भूतस्य जाता पतिरेक आसीत' असे म्हटले आहे. अव्यक्त असलेले ज्ञान हिरण्यगर्भामुळेच मीपणाच्या जाणवेने व्यक्त झाले आणि तेथूनच गुरुसंप्रदाय सुरू झाला. ब्रह्मा-विष्णु -महेशाच्या मी पणाच्या जाणीवेला हिरण्यगर्भच कारणीभूत झाला. विष्णु म्हणजे जीवाचा रक्षणकर्ता. म्हणजेच राम त्याची उपासना म्हणजे एकादशी.

एकादशी हे व्रत असे आहे की ते विधीपूर्वक झालेच पाहिजे असे नाही. विष्णूपासून सर्व सृष्टीचा जन्म म्हणून जीवाच्या जन्मापासून हे व्रत सुरू झाले असे ते अनादी व्रत आहे. ते आमरण करणे चांगले. हे व्रत वर्स व्रताचे मूळ. ज्याला परमार्थात योग्य स्थान प्राप्त करून घ्यायचे आहे त्याने एकादशीचे व्रत करावे. प्रथम एकादशीचे व्रत केले की, इतर केलेल्या व्रतांचे फळ ताबडतोब मिळते. मु्ख्यत: सोळा सोमवार, संकष्टी, प्रदोष, शिवरात्र, अष्टमी, वटसावित्री इत्यादी व्रतांची शीघ्र फल प्राप्ती होते. पहिल्या वर्गातून दुसर्‍या वर्गात प्रवेश मिळतो किंवा मॅट्रिक नंतरच कॉलेजमध्ये जाता येते तसे हे एकादशीचे व्रत आहे. व्रतारंभ तेथूनच व्हावा असे शास्त्र सांगते.

एकादशी ह्या तिथीला सर्व प्राणिमात्रांची गती ऊर्ध्व दिशेने जात असते. चंद्रावर सोडलेली याने बहुधा याच तिथीला सोडलेली आहेत.

आपल्या देहातील चैतन्य ह्या तिथीला ऊर्ध्व दिशेला अधिक वेगाने झेपावते. अशा वेळेला पोट स्वच्‍छ ठेवावे असे म्हणतात. म्हणून साधकाने अल्पआहार घ्यावा. त्यामु‍ळे पारमार्थिक प्रगती होते. पारमार्थिक संकल्प तडीस जातात. शक्य असल्यास निर्जला एकादशी करावी. होत नसल्यास थोडी सुंठ साखर घेऊन थोडेच पाणी प्यावे. असे केल्याने पोटातील अवयवांना विश्रांती मिळते. त्यामुळे अवयव अधिक कायक्षम होतात. मनाची शकती वाढते. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी फलहार घ्यावा. पूर्वीचे लोक म्हणत एकादशी न केली तरी 'माझी एकादशी आहे, माझी एकादशी आहे,' असे सतत म्हणावे. त्यामुळे आपोआप मित आहार होतो. खाण्यात लक्षच जात नाही आणि एकादशी घडण्याल मदत होते.

शास्त्रानुसार महिन्यातील दोन एकादशी तरी कराव्यात नाहीतर निदान शुद्ध एकादशी तरी करावी. उद्यापन करावे. उद्यापनानंतरी हे व्रत चालूच ठेवावे. ह्या दिवशी आपण आपल्यावरच बंधन घालून घ्यावे. काही नियम पाळावेत उदा. खरे बोलणे, परनिंदा टाळणे, दान करणे इत्यादी. त्याचप्रमाणे विष्णुसहस्त्रनामाचा पाठ करणे, रुद्र पणण, गीता पठण इत्यादी गोष्टी कराव्यात. आदल्या दिवशी उपवास करावा. आषाढी एकादशी फार महत्त्वाची आहे. त्या दिवसापासून चार्तुमासाला सुरुवात होते. वर्षातून एकदा मनोभावे पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घ्यावे. पंढरीची यात्रा करावी. अनादी काळापासून कमरेवर हात ठेवून उभा असलेला हा अकर्ता सारेच करीत असतो. त्याचे गुह्य जाणण्याचे एकादशी हे व्रत साधन आहे. हे साधन सर्वांना सुफल संपन्न होवो!

जय जय रघुवीर समर्थ ।

सौ. कमल जोशी