मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By वेबदुनिया|

तुळशी विवाहामागील गर्भितार्थ!

कार्तिक शुक्ल एकादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो. तुळशीचे जीवनचक्र वैष्णवजनांच्या श्रद्धेशी व समर्पणाशी
जोडले गेले आहे. विष्णूचे भक्त नियमित तुळशीची पूजा करतात. तुळशीशिवाय आपले घर व अंगण अगदी ओकेबोके, संस्कारहीन वाटते. तुळस घरादारातील वातावरण पवित्र करते.

तुळशीचे एक पान देवाच्या समकक्ष बसण्याचे सामर्थ्य ठेवते. तुळशी म्हणजेच 'तुलां सादृश्यंस्यति नाशयती इति तुलसी ।' देवाला पूर्णपणे वरण्याची क्षमता राधा, सत्यभामा, रूक्मणी व सोळा हजार पट्टराण्यांमध्येही नाही. देवाला वरण्यासाठी जो पवित्र गंध व श्रध्दा, सात्विक एकांत हवा तो तुळशीत आहे.

तुळशी विवाहाचा अर्थ विश्वव्यापी सत्तेला वृक्षातील चेतनेची करूण हाक असा होतो. या विवाहामागचा गर्भितार्थ लक्षात घेतला पाहिजे. हा विवाह पृथ्वीचे सुख-समृध्दी भरपूर पाऊस व चांगले पीक या सोबतच लोककल्याणाची आस या गोष्टींचे प्रतीक आहे.

आषाढीला झोपलेले देव जेव्हा जागे होतात, त्यावेळी हरीवल्लभा तुळशी त्यांची प्रार्थना ऐकते. तुळशी विवाह देव जागे होण्याच्या काळातील पवित्र सोहळा मानला जातो. तुळशी विवाह संपूर्ण वैष्णवी चेतनेद्वारा पाहिलेले एक महास्वप्न आहे, ज्यात देव स्वत: खाली उतरतात व या पृथ्वीतलावर अणूरेणूंना तेजाने प्रकाशमय करतात.

तुळशी विवाहाचा सरळ अर्थ तुळशीच्या माध्यमातून देवांना आवाहन करणे असा होतो. तुळशीला केलेली प्रार्थना देवांपर्यंत पोहोचते. यामुळे तुळशीला सामान्यांचा कल्पवृक्ष संबोधतात. आपल्यात देवांपर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य नसते. तुळशी आपले दु:ख ऐकून ते देवांपर्यंत पोहचवते, असे मानले जाते. म्हणूनच तुळशी व‍िवाह करविला जातो.

म्हणूनच या भूतलावर असलेले दु:ख-दारिद्र्य, रोग-राई, भय, द्वेष, नैसर्गिक आपत्ती यापासून मुक्ती मिळविण्यासाठी सर्वजण मिळून तुळशीला साकडे घालू या!