1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By

गजानन महाराज निर्वाण दिन

gajanan maharaj
गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत होते. महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आले आहे. त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे वयाच्या 30 व्या वर्षी 1878 च्या फेब्रुवारी महिन्यात 23 तारखेला प्रथमच शेगावात दिसले. त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात आणि ऋषीपंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात. 
 
गजानन महाराज हे आधुनिक काळातील थोर संत असून त्यांनी भक्ती मार्गाने देवा पर्यंत पोहचण्याचा संदेश दिला. गजानन महाराजांचे चरित्र दासगणू महाराजांनी 'श्रीगजानन विजय' ग्रंथामध्ये लिहिले आहे. या ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक घटना वाचायला मिळतात. महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे सांगितले आहे. 
 
सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती. आपल्या अवतारकार्यातील 32 वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगावात व्यतीत केला. तरी कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे.
 
महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे तेव्हा ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. ऋषिपंचमीचा पुण्यदिन ठरवून समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, "आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||"
 
लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. महाराजांचे भक्त समाधीच्या मिरवणुकीत सहभागी झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून मिरवणूक काढून मंदिरात आल्यावर महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला.
 
त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला, "जय गजानना | ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||" आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली.
 
8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली.