शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Updated : शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019 (12:24 IST)

!! श्री हरीतालिका संपूर्ण पूजन विधी !!

भाद्रपद शुध्द तृतीयेचे हरीतालिका हे व्रत कूमारीकांनी मनासारखा पती मिळावा म्हणून व सौभाग्यवतींनी पतीराज दिर्घायूषी , आरोग्यवान व्हावे म्हणून आवर्जुन करावे असा प्रघात आहे...
हरितालिका हे श्री पार्वती मातोश्रींचेच एक नाव , त्यांनी आपल्या प्रबळ इच्छेने खडतर तपश्चर्या करून श्री महादेवांना प्राप्त केले.,याचीच आठवण म्हणून या व्रताचे आचरण केले जाते..
 
● या व्रताचे दिवशी सूर्योदयाआधी उठून आवळ्याचे तेल व उटण्याने स्नान करावे...
● शूभ्र वस्त्र परीधान करावे...
● उगवत्या सूर्यनारायणांना अर्घ्य देऊन " ॐ असवादित्य ब्रह्म " म्हणत स्वतः भोवती 3 प्रदक्षिणा घालाव्या..
● आपल्या घरातील देवपूजा व नित्यसेवा पूर्ण करावी..
 
पूजेची मांडणी
 
■ पूजेची जागा झाडून व गोमूत्राने स्वच्छ पूसून घ्यावी., सर्वत्र गोमूत्र शिंपडावे...
■ स्वच्छ केलेल्या जागेवर बेलपत्राची रांगोळी काढून त्यावर चौरंग कींवा पाट ठेवावा त्यावर पांढरे सूती/रेशमी वस्त्र अंथरुन मधोमध नदीच्या वाळूची श्री महादेवांची पिंड करावी..,
■ त्या पिंडीच्या पूर्वेला एक दूसरी छोटी पिंड (श्री हरितालिका/श्री पार्वती मातोश्रींची) करावी..
■ छोट्या पिंडीच्या समोर दोनही बाजूंना 2 शाळूंका (श्री जया व श्री विजया) कराव्यात..
■ श्री महादेवांच्या पिंडीसमोर विड्याच्या जोड पानांवर श्री गणेशांची मूर्ती/सूपारी ठेवावी.,श्री गणपतींसमोर एका छोट्या वाटीत गूळखोबरे ठेवावे...
■ श्री गणेशांच्या उजव्या बाजूला घंटी व डाव्या बाजूला शंख ठेवावा.
■ मांडलेल्या पूजेसमोर एका छोट्या पाटावर पांढरे कापड अंथरून त्यावर श्री हरितालिका व्रत कथेची पोथी ठेवावी.,पूजेभोवती रांगोळी काढावी...
■ अष्टगंध , अक्षता , भस्म , हळदी-कुंकु , पूजनाची फूले , पत्री , दूर्वा , निवडलेले बेलपत्र - 130 , धूप , शूध्द तूपाचे निरांजन , खडीसाखर , तांब्याचा तांब्या , ताम्हण , पळी , पेला , विड्याची पाने , खारीक , बदाम , सूपारी , सूटी नाणी , यथाशक्ती दक्षिणा , खण ,गळेसरी , बांगड्या इ. साहित्य पूजेच्या ठिकाणी जमवून ठेवावे..
 
पूजनाचा क्रम  
■ श्री स्वामी स्तवन वाचन
■ मंगलतिलक
" ॐ भद्रं कर्णेभि:..." शांतीमंत्र म्हणत कपाळाला हळदी-कुंकू लावावे...
■ आचमन :---
प्रथम 3 नावांनी उजव्या तळहातावर पाणी घेऊन प्राशन करावे.. 
1) ॐ केशवाय नमः !
2) ॐ नारायणाय नमः !
3) ॐ माधवाय नमः !
 
पूढील 2 नावांना पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडावे...
4) ॐ गोविंदाय नमः !
5) ॐ विष्णवे नमः !
 
पूढील नावे ध्यानपूर्वक म्हणावी..
6) ॐ मधूसूदनाय नमः !
7) ॐ त्रिविक्रमाय नमः !
8) ॐ वामनाय नमः !
9) ॐ श्री धराय नमः !
10) ॐ ऋषीकेषाय नमः !
11) ॐ पद्मनाभाय नमः !
12) ॐ दामोदराय नमः !
13) ॐ संकर्षणाय नमः !
14) ॐ वासूदेवाय नमः !
15) ॐ प्रद्यूम्नाय नमः !
16) ॐ अनिरुद्धाय नमः !
17) ॐ पूरूषोत्तमाय नमः !
18) ॐ अधोक्षजाय नमः !
19) ॐ नारसिंहाय नमः !
20) ॐ अच्यूताय नमः !
21) ॐ जनार्दनाय नमः !
22) ॐ उपेन्द्राय नमः !
23) ॐ हरये नमः !
24) ॐ श्रीकृष्ण परमात्मने नमः !
 
■ प्राणायाम :---
गायत्री मंत्र म्हणत 1 प्राणायाम करावा..
 
■ विधीवत् संकल्प :---
उजव्या तळहातावर पाणी , अक्षता व बेलपत्र घेऊन पूढील संकल्प म्हणावा...
 
सौभाग्यवतींसाठी :---" मी ( अमूक ) गोत्रात उत्पन्न ( अमूक ) नावाची मला जन्मोजन्मी अखंडीत सौभाग्य प्राप्त व्हावे, धन-धान्य-पूत्र-पौत्रादिंची अभिवृध्दी व्हावी, दिर्घायूष्यादि सकल कार्यसिध्दीसाठी...
 
कूमारीकांसाठी :-- " मी ( अमूक ) गोत्रात उत्पन्न ( अमूक ) नावाची मला मनेप्सित निर्व्यसनी, सच्चारीत्र्यवान, धार्मिक असा शोभन गूणमंडीत पती प्राप्त होण्यासाठी.....
 
प्रतिवार्षिक विहीत श्री हरितालिका व्रत अंगभूत यथाशक्ती यथाज्ञानाने यथामिलीत उपचारांनी श्री उमा महेश्वर प्रीत्यर्थे श्री वालूका शिवलिंगांचे पूजन करीत आहे ! निर्विघ्नता सिद्धीसाठी श्री रिध्दी सिद्धी सहीत श्री महागणपती पूजन तसेच कलश , शंख , घंटी , दिप पूजन  करीत आहे ! "
 
गणपतींचे पूजन :--
श्री गणेशांना " ॐ गं गणपतये नमः ! " या मंत्राचा जप करत गंध-अक्षता-हळदीकुंकु लावावे, लालफूल व दूर्वा वहाव्यात, धूप-दिप ओवाळून खडीसाखर किंवा गूळ-खोबर्याचा नैवेद्य दाखवावा...
हात जोडून नमस्कार करावा...
 
शुध्दीकरण :--
( शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करत खालील कृती कराव्यात...)
 
• आपल्या आसनाला नमस्कार करावा.
• दाही दिशांना नमस्कार करावा.
• पूजेच्या कलशात गंध-अक्षता-फूल-बेलपत्र-हळदीकुंकु वाहून नमस्कार करावा.
• शंख धूवून पूसून पाणी भरुन जागेवर ठेवावे, त्यांना गंध-फूल व बेलपत्र वाहून नमस्कार करावा.
• घंटी धूवून पूसून जागेवर ठेवावी, त्यांना गंध-अक्षता-फूल-हळदीकुंकु व बेलपत्र वाहून नमस्कार करावा,घंटी वाजवावी..
• प्रज्वलित निरांजनाला गंध-अक्षता-फूल-हळदीकुंकु व बेलपत्र वाहून नमस्कार करावा.
• शंखातील थोडे पाणी कलशात टाकावे व कलशातील पाणी हातात घेऊन सर्व पूजा साहित्यावर व स्वतःच्या अंगावर शिंपडावे..
 
श्री वालूका शिवलिंगांचे पूजन
प्राणप्रतिष्ठा :---
एक बेलपत्र तूपात बूडवून शिवलिंगावर ठेवावे..
डोळे मिटून एकाग्रचित्ताने 15 वेळा "ॐ" म्हणावा..
 
ध्यान :---
( हात जोडून खालील ध्यान म्हणावे..)
 
"ॐ पीतकौशेय वसनां हेमाभां कमलासनाम् !
भक्तानां वरदां नित्यं पार्वतीं चिंतयाम्यहम् !!"
 
"विधाय वालूकालिंगम् अर्चयंतीम् महेश्वरम् !
"पूर्णेन्दुवदनां ध्यायेध्दरितालीं वरप्रदाम् !!"
 
"मंदारमाला कुलितालकायै कपालमालांकित शेखराय !"
"दिव्यांबरायै च दिगंबराय नमः शिवायै च नमः शिवाय !!
 
" ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! " ध्यायामी नमस्काराणि समर्पयामी !!
 
आवाहन :--
( खालील नाममंत्राने दोनही वालूकालिंगांना बेलपत्र वहावेत...)
" ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! "
आवाहनार्थे बिल्वपत्राणि समर्पयामी !!
 
आसन :---
 
( खालील नाममंत्राने चौरंगावर बेलपत्र वहावे...)
 
" ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! "
आसनार्थे बिल्वपत्राणि समर्पयामी !!
 
अभिषेक :---
( खालील नाममंत्राने दोनही वालूकालिंगांना गंधाक्षता फूल वाहून नमस्कार करावा... )
 
" ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! "
अभिषेकार्थे गंधाक्षता पूष्पाणि समर्पयामी !!
 
( खालील स्तोत्र मंत्र म्हणत
फूलाने पाणी शिंपडत अभिषेक करावा...)
 
श्री गणपती अथर्वशिर्ष - 1 वेळा
श्री रात्री सूक्त - 1 वेळा
श्री रूद्राध्याय - 1 वेळा
 
" ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! "
अभिषेकं समर्पयामि !
 
यज्ञोपवित :---
अभिषेकानंतर खालील मंत्र म्हणत दोनही वालूकालिंगांना जानवे वहावे...
 
" ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! "
यज्ञोपवितं समर्पयामि !
 
वस्त्र :---
खालील मंत्र म्हणत दोनही वालूकालिंगांना यथाशक्ती वस्त्र किंवा अक्षता वहाव्यात...
 
" ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! "
वस्त्रं/वस्त्रार्थे अक्षतां समर्पयामि !
दोनही वालूकालिंगांचे खालीलप्रमाणे पंचोपचार पूजन करावे...
1) दोनही वालूका लिंगास गंध-भस्म-अक्षता-हळदीकुंकु वहावेत..
 
"ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! "
विलेपनार्थे चंदनम्, भस्मं ! अलंकारार्थे अक्षतान् ! हरिद्रां-कुंकूमम् सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि !!
 
श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीला गळेसरी, बांगड्या इतर सौभाग्य द्रव्य व अलंकार खालील मंत्राने अर्पण करावे..
 
" ॐ श्री उमायै नमः !
" कंठसूत्रं, कंकणादि नानाविध सौभाग्य द्रव्याणि अलंकाराणि समर्पयामि ! "
 
2) दोनही वालूका लिंगांना सूगंधी फूले वाहावीत... 
"ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! "
ऋतू कालोद्भव पूष्पाणि समर्पयामि !
 
मुख्य विशेष पूजा 
अथ अंगपूजनम् :---
 
श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर प्रत्येक नाममंत्राने त्या-त्या अवयवांची भावना करत अक्षता वहाव्यात...
• ॐ श्री उमायै नमः ! पादौ पूजयामि ! (पाय)
• ॐ श्री गौर्यै नमः ! गुल्फौ पूजयामि ! (पोटर्या)
• ॐ श्री पार्वत्यै नमः ! जानुनी पूजयामि ! (गूडघे)
• ॐ श्री जगध्दात्र्यै नमः ! जंघे पूजयामि ! (मांड्या)
• ॐ श्री जगत्प्रतिष्ठायै नमः ! ऊरू पूजयामि ! (ऊर)
• ॐ श्री शांतिरूपिण्यै नमः ! कटी पूजयामि ! (कंबर)
• ॐ श्री हरायै नमः ! गुह्यं पूजयामि ! (गुह्य भाग)
• ॐ श्री माहेश्वर्यै नमः ! नाभिं पूजयामि ! (नाभि)
• ॐ श्री शांभव्यै नमः ! ह्रदयं पूजयामि ! (ह्रदय)
• ॐ श्री शूलपाणये नमः ! कंठं पूजयामि ! (कंठ)
• ॐ श्री पिनाकधृषे नमः ! बाहूं पूजयामि ! (बाहू)
• ॐ श्री शिवायै नमः ! मुखं पूजयामि ! (मुख)
• ॐ श्री पशुपतिप्रियायै नमः ! नेत्रे पूजयामि ! (नेत्र)
• ॐ श्री गंगायै नमः ! ललाटं पूजयामि ! (कपाळ)
• ॐ श्री महालावण्यायै नमः ! शिरः पूजयामि ! (डोके)
• ॐ श्री सच्चिदानंदरूपिण्यै नमः ! सर्वांगं पूजयामि ! (सर्व अंग)
 
अथ पत्री पूजनम् :---
श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर खालीलप्रमाणे समंत्रक पाने / पत्री वहावीत...
 
• ॐ अशोकाय नमः ! अशोक पत्रं समर्पयामि ! (अशोकाचे पान)
• ॐ जगध्दात्र्यै नमः ! धात्री पत्रं समर्पयामि ! (आवळीचे पान)
• ॐ माहेश्वर्यै नमः ! दूर्वांकूरान् समर्पयामि ! (दूर्वा)
• ॐ कपर्दिन्यै नमः ! करवीर पत्रं समर्पयामि ! (कन्हेराचे पान)
• ॐ कपालधारीण्यै नमः ! कदंबपत्रं समर्पयामि ! (कदंबाचे पान)
• ॐ पार्वत्यै नमः ! ब्राह्मी पत्रं समर्पयामि ! (ब्राह्मीचे पान)
• ॐ धूर्जटायै नमः ! धत्तूर पत्रं समर्पयामि ! (धोत्र्याचे पान)
• ॐ त्रिपूरांतकायै नमः ! अपामार्ग पत्रं समर्पयामि ! (आघाड्याचे पान)
• ॐ सर्वेश्वर्यै नमः ! नानाविध पत्राणि समर्पयामि ! (पंचपल्लव)
 
● अथ पूष्प पूजनम् :---
श्री पार्वती मातोश्रींच्या पिंडीवर खालीलप्रमाणे समंत्रक फूले वहावीत...
 
• ॐ चतुर्वर्गप्रदायै नमः ! चंपक पुष्पं समर्पयामि ! (चाफ्याचे फूल)
• ॐ बुध्दिप्रियायै नमः ! केतकी पुष्पं समर्पयामि ! (केवडा)
• ॐ कौमार्यै नमः ! करवीर पुष्पं समर्पयामि ! (कण्हेराचे फूल)
• ॐ कुमार्यै नमः ! बकुल पुष्पं समर्पयामि ! (बकुळीचे फूल)
• ॐ धनदायै नमः ! धत्तूर पुष्पं समर्पयामि ! (धोतर्याचे फूल)
• ॐ शांभव्यै नमः ! शतपत्र पुष्पं समर्पयामि ! (सूर्यफुल)
• ॐ चामुण्डायै नमः ! पद्मं समर्पयामि ! (कमळाचे फूल)
• ॐ जगध्दात्र्यै नमः ! जपाकुसुमं समर्पयामि ! (जास्वंदाचे फूल)
• ॐ माहेश्वर्यै नमः ! मल्लिका पुष्पं समर्पयामि ! (मोगर्याचे फूल)
• ॐ मेरूमंदारवासिन्यै नमः ! मांदार पुष्पं समर्पयामि ! (पांढर्या रूईचे फूल)
 
● श्री महादेवांच्या पिंडीवर श्री शिव अष्टोत्तरशत नामावली म्हणत 108 बेलपत्र अर्पण करावेत...
 
3) दोनही वालूका लिंगांना खालील मंत्र म्हणत धूप ओवाळावा... 
"ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! "
 
धूपं आघ्रापयामि !
4) दोनही वालूका लिंगांना खालील मंत्र म्हणत शूध्द तूपाच्या निरांजनाने ओवाळावे...
"ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! "
 
दिपं दर्शयामि !
 
5) दोनही वालूकालिंगांना फळे व खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा तसेच
विडा, दक्षिणाही अर्पण करावी...
"ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! "
 
नानाविध फलानी शर्करा खंड खाद्यानी नैवेद्यं समर्पयामि !
पूगीफलं स तांबूलं तथाच दक्षिणां समर्पयामि !
 
■ श्री हरीतालिका व्रताची कथा वाचावी...
■ कथा वाचल्यानंतर श्री गणपतींची, श्री हरितालिकेची व श्री शंकरांची अशा क्रमाने आरती करावी...
■ आरतीनंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा करून नमस्कार करावा व मंत्रपूष्पांजली म्हणून फूले-बेलपत्र दोनही वालूकालिंगांवर अर्पण करावी...
 
■ विशेष अर्घ्य :--- पळीत पाणी घेऊन त्यात गंध-अक्षता-फूल-सूटे नाणे व सूपारी ठेवावी...
पूढील प्रत्येक मंत्राला वरीलप्रमाणे अर्घ्य आपल्या उजव्या हाताने ताम्हणात सोडावे..
 
1) ॐ शिवरूपे शिवे देवि शंकर प्राणवल्लभे !
उमे सर्वार्थदे देवी गृहाणार्घ्यं नमोsस्तुते !!
 
"ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! "
इदमर्घ्यं समर्पयामि !
 
2) ॐ नमस्तेsस्तु मृडानीश अपर्णा प्राणवल्लभ !
भक्त्याssनीतं मया हीदं गृहाणार्घ्यं नमोsस्तुते !!
 
"ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! "
इदमर्घ्यं समर्पयामि !
 
3) ॐ व्रतसंपूर्ति सिद्धयर्थं यथाशक्ती मयाssह्रतम् !
आलिभि:सहिते देवी गृहाणार्घ्यं नमोsस्तुते !!
 
"ॐ श्री उमा महेश्वराभ्यां नमः ! "
इदमर्घ्यं समर्पयामि !
 
हात जोडून मनोभावे पूजेत झालेल्या चूकांबद्दल क्षमा मागावी...
खालील प्रार्थना म्हणावी...
 
हरितालिके नमस्तेsस्तु सशिवे भक्तवत्सले !
संसारभय भीताsहम् त्वमेव शरणं मम !
जन्मजन्मनि सौभाग्य मक्षय्यं देहि मेsव्ययम् !!
 
शेवटी हातात पाणी घेऊन " मी माझ्या ज्ञानानूसार व मिळालेल्या उपचारद्रव्यांनी श्री हरीतालिका व्रतानिमित्त केलेले श्री वालूकालिंगार्चन श्री उमा महेश्वरांना प्रिय होवो... " असे म्हणून पाणी ताम्हणात सोडावे.
 
● या दिवशी व्रतस्थ महीलांनी अन्नग्रहण करू नये केवळ फलाहार करावा...
● सायंकाळी पूजेस धूप दिप ओवाळून दूध-साखरेचा नैवेद्य दाखवावा...
● मध्यरात्री पर्यंत शिव शक्तींचे नामस्मरण करत जागरण करावे...
● मध्यरात्री पून्हा श्री गणेश , श्री हरितालिकेची व श्री महादेवांची आरती करून रूईच्या स्वच्छ पानावर थोडे दही घालून ते पान चाटावे...
● दूसर्या दिवशी पूजेवरील सर्व निर्माल्य काढून दोनही वालूकालिंगांना गंध, भस्म, अक्षता, हळदी-कुंकु, फूले व बेलपत्र वहावेत ;
धूप, दिप ओवाळून दही भाताचा नैवेद्य दाखवावा...
● श्री गणपतींची, श्री हरितालिकेची व श्री शंकरांची अशा क्रमाने आरती करावी...
आरतीनंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा करून नमस्कार करावा व मंत्रपूष्पांजली म्हणून फूले-बेलपत्र दोनही वालूकालिंगांवर अर्पण करावी...
● विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षता वाहून दही-भाताच्या नैवेद्यासह सर्व पूजा प्रवाहात विसर्जीत करावी...
● पतीराजांचे पाद्यपूजन करून उपवास सोडावा...