शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By वेबदुनिया|
Last Updated : बुधवार, 27 ऑगस्ट 2014 (11:40 IST)

हरितालिका निसर्गाशी हातमिळवणी

आषाढमेघ बरसतानाच सणांचा राजा श्रावण येतो. क्षणात क्षणात पाऊस अशा आल्हाददायक वातावरणात विविध सणांचे आगमन होते. दीपपूजा ते पोळा अशी सणांची श्रृंखला हातात हात कुंफून पावित्र्याचे शिंपण करता करता श्रावण संपतो आणि मागोमाग भाद्रपद येतो. सार्‍यांनात गौरीगणपतीचे वेध लागतात. लेकीसुनांना नटण्यामुरडण्याचे दिवस घेऊन येणारा फुलपंखी भादवा घेऊन येतो 'हरितालिका'. भाद्रपद शुद्ध तृतीयेचा हा सट स्त्रीच्या सौभाग्याचे, आशांचे स्वप्नांचे मांगल्याचे प्रतिक आहे. शंकरासारखा पती मिळविण्यासाठी सावित्रीने 'हरितालिका'हे व्रत केले होते. म्हणून कुमारिकांनी हे व्रत करण्याची प्रथा रुढ झाली. पतीपरमेश्वराला सुखी समाधानी ठेवण्याची स्त्रीची जन्मोजन्मीची आस पूर्ण करण्यासाठी सुवासिनीदेखील हे व्रत करतात. या व्रतासाठी ओल्या गव्हाला परडीतीत शेणमातीत पेरून 'गौर' उगवली जाते. हरितालिकेच्या दिवशी पाच सुवासिनी शुचिर्भूत होऊन गावाजवळील जलस्त्रोतात किंवा शहरात घरीच विहिरीतील पाणी मोठ्या पात्रात घेऊन गौरीमातेला स्नान घालतात. नंतर चौरंगावर व सभोवती पानाफुलांची आरास करून गव्हावर किंवा तांब्याच्या कलशावर गौरीची स्थापना केली जाते. शेजारीच तांब्याच्या कलशावर आंब्याच्या पानांमध्ये श्रीफळ आणि फळे ठेवून पूजा केली जाते. आरोग्यात पोषक असलेल्या फळांचे महत्त्व या पुजेद्वारे लक्षात येते.

पेरलेल्या 'गौरी'च्या मध्यभागी वाळूचे व ओल्या हळदीचे 'शिवलिंग' ठेवून धूप-उदबत्तीच्या सुगंधी वातावरणात गौरीची मन:पूर्वक पूजा बांधली जाते. माझ्या संसारात आनंदाचा सुंगध असाच दरवळू दे असे स्त्रीमन हरितालिकेकडे साकडे घालत असते. यानंतर पिवळे वस्त्र, बांगडी, कुंकू आरसा अशा सौभाग्याचे प्रतिक असलेल्या वस्तूंनी हरितालिकेची ओटी भरी जाते. श्रावणातील पर्णसंभाराने लदलदलेल्या विविध पानांच्या प्रत्येकी सोळा अशा सोळा जातीच्या पानांनी हरितालिकेला सुशोभित केले जाते. या हिरव्या पत्र्यांच्या रुपाने माझा संसार वेलींप्रमाणे बहरू दे अशी आराधना करून देवीची आरती केली जाते. या दिवशी पूर्ण उपवास करून रात्री जागरण केले जाते.