गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 18 फेब्रुवारी 2017 (14:19 IST)

संत शिरोमणी जय गजानन बाबा

माया ब्रहायेंचे विवरणा
करिता चुके जन्ममरण 
संतांस गेलिया शरणा
मोक्ष लागे !!
(दास ६.५.२५)

"ब्रह्म निर्गुण निराकार तर माया सगुण साकारा! ब्रह्म अनंत तर माया परिमित, ब्रह्मनिर्मंळ, निश्चळ तर माया चंचळ, चपळ आहे! ब्रह्म भासत नाही, तर माया भासते! ब्रह्म निव्वळ अमर्यादित तर माया मर्यादारूपच आहे. ब्रह्म दिसत नाही, तर माया दिसते, म्हणूनच जीवात्मा संत चरणी गुंतवून, माया तोडून ब्रहागाठ बांधावी आणि मोक्ष मिळवावा असं समर्थाना म्हणावयाचे आहे.

श्री समर्थ म्हणतात की, संत केवळ ब्रह्म आहेत. कारण स्वस्वरूपाशी ते समरस आहेत. या कारणाने दृश्य पदार्थांने त्यांचे मन आकर्षित होत नाही! तो सदासर्वकाळ अगदी अनासक्त असतो. स्वरूपाशी एकरूप होण्याची अवस्था पचनी पडली म्हणजे मग साधूला देहाचे भानच उरत नाही. असेच स्वस्वरुपाशी समरस झालेले संत म्हणजेच श्री शेगावीचे समर्थ गजानन महाराजा! हे कोठून आले, यांचे मूंलनाळ काय? त्यांचे मूळ कोणते, याचा अद्याप तरी शोघ गजानन भक्तांना लागलेला नाही!

असंख्य जीवात्म्यांच्या जीवनाचे गणित मांडले तरी, त्या सर्वात एक ब्रह्म विराजमान आहे, त्याबाबतीत बाष्कळ (बोते) बडबड करू नये." हा अद्वैत ब्रह्माचा सत्य सिद्धांत अखिल विश्वासमोर मांडणार्‍या 'गणी गण गणांत बोते' या भजनामुळे श्री गजानन महाराज हे नाव प्राप्त झालेल्या अजानुबाहु श्री गजानन बाबांचे "माघ वद्य ।।७।।, शके १८०० म्हणजेच २३फेब्रुवारी १८७८ ला माध्यान्ह सप्तमी विदर्भातील शेगाव (शिवगाव), (जि अकोला, ता खामगाव) येथे देविदास महाराज पातुरकरांच्या  मठात मुलाच्या ऋतुशांतीच्या वेळी श्री बंकटालाल व त्यांचे मित्र दामोदरपंत कुलकर्णी यांना मठाच्या बाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावळीवरील कण वेचून खाताना प्रथम दर्शन झाले.
'अन्न हे पूर्व ब्रह्म' याचे उत्तम सोदाहरण श्री गजानन माउलीनी प्रथम प्रकटदिनीच भक्तांना दिले. जडरुपी शरीरात राहणारा आत्मा, अन्नाने शांत, तृप्त होतो म्हणजेच आत्म्याला शांत होण्यासाठी ब्रह्म समजावण्याची गरज आहे. म्हणजेच आत्मा, ब्रह्मा (अन्ना)चे सेवन करताच तृप्त म्हणजेच मुक्त होईल. असे सूचक लीलावर्तन महाराजांनी केले. त्यांच्या लीला कार्यकाळात अशा अनेक सूचक लीला केल्या.

जात, पंथ व धर्मभेद न मानणारे बाबा वेद व वैदिक धर्माचा अत्यंत आदर करीत! एकदा शेगावात श्री वासुदेवानंद टेंबे स्वामी येणार म्हणून त्यांनी सारा गाव स्वच्छ केला व स्वत: सोवळे नेसले. श्री समर्थ रामदास स्वामींचा अवतार म्हणून महाराजांकडे पाहिले जाते. त्यांचे शरीर मारुती, राम, भक्ती किंवा स्थाने त्यांचे तत्त्वज्ञान श्रीसमर्थ रामदास स्वामींशी मिळणारे आहे आणि एकादा बाळापूरचे श्रीसमर्थ रामदासांचे भक्त बालकृष्ण रामदासी व पुतळाबाई यांना समर्थ रामदास स्वामींचया रूपात त्यांनी दर्शन दिले.

सिद्धपुरुषांची सर्व लक्षणे त्यावेळी श्री गजानन महाराजांच्या ठिकाणी दिसत होती. शेगाव येथे यांच्या आज्ञेवरून एक  भव्य राममंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराचे बांधकाम सात वर्ष (१९०७ ने १९१४) चालू होते. यांचे संतत्त्व सर्वांनाच अचंबित करणारे होते. यांनी दर्शविलेल्या स्थानी उत्खनन केले असता राम, सीता व लक्ष्मण यांच्या ज्या मूर्ती मिळाल्या, त्यांची स्थापना प्रस्तुत मंदिरात केली आहे. म्हणूनच हे संत पदाला पोहोचले. नव्हे ते  स्वयं ब्रहाच होते
भक्त महाराज भूपती । र्निदा द्वेषांने न गणिती।  
परमामृते तृप्त असती । मायाभ्रांती त्या नसे ।।
म्हणूनच
समर्थ अशा संतांस शरण जावे म्हणतात.  

विट्ठल जोशी