सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

गुरुप्रतिपदा, श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज शैल्य यात्रा गमन दिवस

माघ वद्य प्रतिपदा म्हणजेच श्रीगुरुप्रतिपदा दिवस श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज शैल्य यात्रा गमन दिवस म्हणून ओळखला जातो. गुरु प्रतिपदा या दिवशी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या 'निर्गुण पादुका' स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या.
 
माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला "श्रीगुरुप्रतिपदा" असे संबोधले जाते. श्रीदत्तावतार भगवान श्री नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. आजच्या तिथीला भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून शैल्यगमन केले होते. 
 
अशी ही तिथी पुण्य असल्यामुळे या दिवशी गाणगापुरात भव्य दिव्य स्वरूपात उत्सव साजरा होतो. या दिवशी देशभरातील भक्त मोठ्या प्रमाणात येथे येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. 
 
भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र औदुंबर येथे आपल्या 'विमल पादुका' स्थापन करून वाडीला गमन केले होते. स्वामी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. येथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशीला आपल्या 'मनोहर पादुका' स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले. नंतर गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून माघ वद्य प्रतिपदेच्या पावन तिथीला आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून त्यांनी शैल्यगमन केले होते. ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. दुर्मिळ योग म्हणजे त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत.
 
भगवान श्रीगुरु नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराजांच्या तिन्ही पादुकांचे विशेष नावे आणि त्यांच्या अर्थ असा आहे की विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या आहे तसेच निर्गुण पादुकांबद्दल फारसं माहीत नाही. 

मनोहर पादुका आणि निर्गुण पादुकांच्या नावांचे संदर्भ श्रीगुरुचरित्रात पाहायला मिळतात. मनोहर पादुकांची दर्शन व पूजन केल्याने मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते. 
 
अत्यंत अद्भुत व विलक्षण निर्गुण पादुकांना विशिष्ट आकार नाही म्हणूनच या पादुकांना निर्गुण पादुका म्हणत असावे. या पादुकांना पाण्याचा स्पर्श नसून केशर व अत्तराचे लेपण केले जाते. या पादुका कशापासून निर्मित आहे याबद्दल फारशी माहिती नाही.