रविवार, 7 सप्टेंबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Divine Cow गायीची उत्पत्ती कशी झाली

Krishna created a cow called Surabhi
हिंदू धर्मग्रंथानुसार गायींमध्ये 33 कोटी देवी-देवता वास करतात. गायीला आपल्या धर्मात खूप महत्त्वाचं स्थान आहे.
 
शतपथ ब्राह्मण ग्रंथात गाईच्या उत्पत्तीची कथा या प्रकारे सांगितली आहे. दक्ष प्रजापतीने प्राणी सृष्टी निर्माण केल्यानंतर थोडे अमृत प्राशन केले. त्या अमृताने ते संतुष्ट झाले. त्यावेळी त्यांच्या नाकातून बाहेर पडत असलेल्या श्‍वासाचा सुगंध सर्वत्र दरवळला. त्या श्‍वासातून एक गाय जन्मास आली. दक्ष प्रजापतीने सुंगधातून जन्मल्यामुळे तिचे नाव सुरभी असे ठेवले. सुरभीपासून अनेक गायी जन्मास आल्या. त्यामुळे सुरभी ही संपूर्ण गोवंशाची माता अर्थात जननी ठरली.
 
सुरभीने एकदा तप आरंभ केला आणि ब्रह्मदेव त्या तपाने प्रसन्न झाला. त्याने सुरभीला अमरत्व प्रदान केले तसेच त्रैलोक्याच्या वर असलेला एक स्वर्गही बहाल केले जे स्वर्ग गोलोक या नावाने ओळखला जातं. सुरभी या गोलोकात नित्य निवास करते आणि त्यांच्या कन्या भूलोकात पृथ्वीवर राहतात. 
 
या गोलोकाचे अधिपती गोविंद अर्थात भगवान श्रीकृष्ण आहे. सूरभी एकदा इंद्रदेवाच्या दारावर भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला गेली असता पशुराज्याच्या विषयांची श्रीकृष्णाची सदिच्छा पाहून त्यांना आपल्या गोलोकाचा इंद्र म्हणून निवडले. भगवान श्रीकृष्णाचे गौ प्रेम सर्वत्र प्रसिद्ध आहे.
 
तर काही मतांप्रमाणे सुरभींना गोलोकात श्रीकृष्णाने आपल्या शरीराच्या डाव्या भागाने उत्पन्न केले. नंतर सुरभीच्या छिद्रातून करोडो गायी आणि वासरे जन्माला आली.
 
एका इतर कथेप्रमाणे ब्रह्मा एका मुखाने दूध पित असताना दुसर्‍या मुखातून फेन निघाले आणि त्याने सुरभीची उत्पत्ती झाली.
 
तर पौराणिक कथेनुसार कामधेनू गाय ही 14 रत्नांपैकी एक होती जी देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथनातून बाहेर पडली होती.