मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री परशुराम माहत्म्य अध्याय ८

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीजानकीवल्लभाय नमः ॥
जय जया तीर्थपदा पुण्यरुपा नित्यानंदा निरुपाधी तूं गोविंदा भक्त कामदा नमोस्तुते ॥१॥
ऋषी विनविती सूतासी तारुनी अज्ञानाब्धीसी अपार सुखातें दाविसी तोडिशी भवभीती ॥२॥
सूतासी जालें कथा स्मरण ह्मणे ऐकावें चित्त देऊन परशुरामासी यात्रा कथान जमदग्नी करीतसे ॥३॥
ऐके यात्रा पुत्रराया नारायणा विश्‍वकाया प्रगटलासी उद्धराया जगतासी लघुत्वें ॥४॥
तुझें चरणीं सर्व तीर्थें ॥ देवही राहती तेथें तूं कृपाळु भक्तांतें माझ्या मुखें बोलविशी ॥५॥
तीर्थ सांगेन प्रथम उत्तम ॥ त्द्या सत्द्याद्री पर्वतीं गहन पंचगंगेचा उगम यात्रा असे मनोहर ॥६॥
विष्णु तनु साक्षात कृष्णा ब्रह्मदेव रुप कोयना शंकर जाले वेण्णा गायत्री सावित्री आणि ॥७॥
ऐशा होत पंचगंगा ब्रह्मतीर्थी जाल्या पूर्णा तेथें स्नान दान चतुर्वर्णा विधीयुक्त विधी करावा ॥८॥
पुढें होवोनि त्या गुप्त विष्णुतीर्थी जाल्या प्रगट तेथें स्नानार्चन केलिया नेट इच्छित फळ पाविजे ॥९॥
विष्णु तीर्थाचें महिमान वर्णन करती देवब्राह्मण अखिल पाप रोगाचें हरण स्नानदानें करुनीयां ॥१०॥
विष्णुतीर्थीं विष्णुपूजन षोडशोपचारें यथा लाभें करुन मूर्त्ती शालग्राम अर्चन ब्राह्मणांनीं करावें ॥११॥
आणीक पुढें रुद्र तीर्थ तेथें जावें स्नानार्थ स्नान केलिया दुःखादि अनर्थ नाश पावती सर्वदा ॥१२॥
पूजन करावें स्नान करुनी महाबळेश्‍वर लिंगस्थानीं अतिभक्तीनें प्रार्थुनी आणीक तीर्थीं जावें ॥१३॥
चक्रतीर्थी स्नान करावें, हंस आणि मलकार्जुनी जावे, अरण्यतीर्थ असे बरवें मग यात्रा सर्व पितृतीर्थीं ॥१४॥
एवं अष्टतीर्थेहो होत पवित्र महाबळेश्‍वर महाक्षेत्र अगाध माहात्म्य सर्वत्र सर्व क्षेत्राचें मस्तक जाणा ॥१५॥
ऐसीं येथें सत्द्यपर्वतीं पश्चिम यात्रा समुद्रतटीं महेंद्र पर्वत त्यासी ह्मणती विमळ तीर्थ आणीक असे ॥१६॥
सर्व तीर्थें तेथें असती प्रगट करावयासी तूं तीं अवतार धरिलासी जगतीं प्रश्न करितोसी मनुष्यत्वें ॥१७॥
महेंद्र पर्वत ह्मणण्याचें कारण ॥ पूर्वीं त्रिलोकपतीशची रमण बैसलासे स्वर्ग सिंहासन अखिल वंदिती तयासी ॥१८॥
अष्ट ऐश्‍वर्ये तो इंद्र पुढें नृत्य अप्सरा गंधर्व तेणें जाला किंचित गर्व ह्मणे आपण कृतकृत्य ॥१९॥
इतुकी या अवसरीं गुरु आले सभा भीतरीं न करी तेव्हां वंदन शिरीं अवलोकनही करीना ॥२०॥
इंद्रासी अभिमान देखून शाप दिधला दारुण कीं पर्वत होय ह्मणोन आपण गुप्त जाहले ॥२१॥
पर्वत जाला तेव्हां इंद्र खळबळले अत्यंत समुद्र डळमळुनि गेला चंद्र दैत्योपद्रव मातला ॥२२॥
महताचा अपमान किंचित होतां नाश जाण इंद्रासीहीं जालें शिक्षण काय पहा ॥२३॥
पर्वत पडला समुद्रतटीं देवही आले तेतीस कोटी आराधना करिती संकटीं दयाशीळा क्षमा करी ॥२४॥
देवदेवा नारायणा भक्त वत्सला संकर्षणा प्रक्रृतीशा प्रकृती रमणा सर्वापराध क्षमा करी ॥२५॥
गोविंदा विष्णू माधवा त्रिविक्रम वामन केशवा श्रीधर त्दृषी केशवा वासुदेवा अपराध क्षमा करी ॥२६॥
पद्मनाभा मधूसूदना दामोदरा उपेंद्रा जनार्दना अनिरुद्धा पुरुषोत्तमा प्रद्युम्ना अपराध क्षमा करी ॥२७॥
रामा विरामा अधोक्षजा अप्रमेया नृसिंहा अजा मायातीता अच्युता अनंततेजा अपराध क्षमा करी ॥२८॥
विश्‍वोत्पादका वि‍श्‍वहरा हरी श्रीकृष्णा ईश्‍वरा शिवा शिवेशा शिवकरा अपराध क्षमा करी ॥२९॥
आदि मध्य अंतहीना सच्चिदानंदा क्षीराब्धि शयना सर्वव्यापी वैकुंठसदना अपराध क्षमा करी ॥३०॥
अभिमान छेदका दैत्यारी इंद्र रक्षका विबुध कैवारी सर्वोत्तमा श्रीहरी अपराध क्षमा करी ॥३१॥
भक्त कैवारी शिवेंद्र नमिता मोक्षदा तूं विरींचिनुता तत्वेशाअव्यग्रागदा भृता अपराध क्षमा करी ॥३२॥
रमाकांता चतुर्भुजा मेघश्यामा भक्तकाजा अनंतमूर्ती बल ओजा क्षमा शीळा नमो नमो ॥३३॥
एवं देवकृत अष्टक पठणें वैकुंठ नायक पापें जळोनी अनेक इच्छित देईल सर्वदा ॥३४॥
स्तवन करितां श्रीधर उभा ठेला समोर प्रसन्न होवोनी क्षमा कर वर मागा ह्मणतसे ॥३५॥
कोटी सूर्याच्या तेजा अष्ट असती बृहद्भुजा श्रीभूदुर्गा सहजा विधी सनकादी सेविती ॥३६॥
शंख गदा पद्म चक्र जेणें उद्धरिला गज **** वरदहस्त केला एक धनुष्यादिक शोभती ॥३७॥
गरुडासनीं देखूनी पूजा करती देवमुनी प्राथुनी बोलती अंजुळी जोडुनी इंद्रोद्धार करी तूं ॥३८॥
हांसोनी पर्वतीं हस्त ठेविला मग आपण गुप्त जाहला तत्काळ इंद्र तेथें उद्धरीला त्रिलोकीं हर्ष अत्यंत ॥३९॥
देवांनीं दिधले वर पर्वतांमाजीं हा महेंद्र येथें गुप्त असोत श्रीधर ॥ क्षमेविषयीं भक्तांच्या ॥४०॥
ऐसा असे अपार महिमा महेंद्र पर्वताचा उत्तमोत्तमा सांगीतलें परशुरामा आणीक यात्रा ऐक पां ॥४१॥
विमळ क्षेत्र महेंद्र क्षेत्र रजत पीठ क्षेत्र पवित्र ऐसी त्रिस्थळी विचित्र परशुरामक्षेत्रीं असे ॥४२॥
पूर्वेकडे शेष पर्वत तेथें व्यंकटेश साक्षांत ते स्थान होय अद्भुत अपार महिमा तयाचा ॥४३॥
पृथ्वींत क्षेत्रतीर्थें फार त्यांमध्यें पांडुरंगपुर तत्र श्रीविठ्ठल ईश्‍वर पुढें चंद्रभागा वाहतसे ॥४४॥
प्रभास तीर्थ पृथुदक तीर्थ बिंदुसरत्रित कुप तीर्थ सुदर्शन आणि विशाळ तीर्थ ब्रह्मचक्रतीर्थ असे ॥४५॥
गंगा यमुना महान आणिक नैमिषारण्य तेथें होय महापुण्य ऋषी तेथें तप करिती ॥४६॥
महान शरयू कौशिकी पुल हा श्रम गोमती गंडकी तीचें महात्म्य ब्रह्मयासिकीं वर्णनान पुरती चतुर्मुखें ॥४७॥
शालग्राम नाम तयासी पूजितां होय वैकुंठवासी इच्छीत प्राप्त त्यासी ह्मणोनी द्विजांसी पूज्यतो ॥४८॥
शालग्रामासी अर्पित सेवन करिती जे नित्य ते होती जीवन्मुक्त भक्तिज्ञान होय त्यांसी ॥४९॥
आणीक असे भूवैकुंठ जेथें दशाश्‍व मेध तीर्थ श्रेष्ठ लक्ष्मी केशवाची भेट ब्रह्मयासी तेथें जाहली ॥५०॥
नाम तयाचें अनुपम लक्ष्मी केशवें विहार काम आनंदें निर्मिलें महावन ह्मणूनि आनंद वन बोलती ॥५१॥
सूत सांगती शौनकासी जेथें शिव पावले मुक्ततेसी मग तेचि राहतां महा स्मशान काशी नाम जाण पडियेलें ॥५२॥
त्या यात्रेसी न मिळे उपमा अपार असे तयाचा महिमा सर्व वर्णासी यात्रा परमा ती अवश्‍य असे ॥५३॥
गया प्रयाग असे महान तयाच्या वर्णनीं सहस्त्रवदन तोही थकला जाण यात्रा तयाची विशेष ॥५४॥
गंगा सागर संगम सप्त गोदावरी महान पंपा भीमरथी स्कंद नमन श्रीशैल दर्शन करावें ॥५५॥
काम कोष्ठीकांची पुरी सरि द्वाराकोवेरी श्रीरंगाख्य पुण्यभारी हरी यत्र संन्निहीत ॥५६॥
ऋषभाद्री दक्षिण मथुरा सेतु बंध पापहरा ताम्रपर्णी कृतमाला मलपर्वत अद्भुत ॥५७॥
अगस्ती ऋषी नमोनी कन्या दुर्गा दक्षिणी पंचाप्सरा फाल्गुन दर्शनी तेथें विष्णु संनिध ॥५८॥
गोकर्णाख्य शिवक्षेत्र तपासी तें अतिपवित्र राहिले साक्षांत शंकर तत्र राममंत्र जपितसे ॥५९॥
द्वैपायन तेथें नमुनी शूर्पाकार यात्रा करोनी मग जावें तापी निर्विघ्या पयोष्णी दंडकारण्यीं यावें ॥६०॥
माहिष्मती रेवातीरी यात्रा असे कोल्हापुरीं स्नान करुनी रंभा लयसरी महालक्ष्मीसी नमावें ॥६१॥
आणीक कुशस्थली नाम नगरी असे ती समुद्रा भीतरी प्रगटेल पुढें जगतीवरी द्वारका ह्मणूनी ॥६२॥
मुक्तीचे हेची द्वारका ह्मणूनी नामें जाहली द्वारका सकळ साधू सनकादिका मुक्तिपुरी असेती ॥६३॥
बहुत तीर्थ क्षेत्रें भूमीवर अनेक असती सरित्सर त्यांमध्यें मुख्य पुण्यनि कर सांगीतलीं पुत्रराया ॥६४॥
असें या क्षेत्रासीं करितां स्नान दानासीं संध्या जप अनुष्ठानासीं अपार पुण्य होतसे ॥६५॥
तीर्थविधीचें विधान यथाशक्ती सुवर्णदान अन्नदान विशेषेण ब्राह्मणांसीं करावें ॥६६॥
एवं यात्रा जो करित तोचि होय जीवन्मुक्त तयासी गती वैकुंठांत कोटि वरुषें वासकरी ॥६७॥
ऐसें ऐकतां परशुराम प्रश्न करी अनुपम स्वयें तोचि पूर्णकाम लोकोपकारी वर्ततसे ॥६८॥
सांगीतल्या यात्रा अपूर्व अल्प नरासी न होती सर्व तया यात्राफळ कैंचें प्राप्त जाणिव निरोपावें अंह्मासीं ॥६९॥
प्रश्न ऐकतां जमदग्नी ज्ञान व्हावया भक्तजनीं पुत्रत्वें विचारी विश्‍वमणी ते हांसोनी पुनः सांगे ॥७०॥
यात्रा सर्व तुलसी मूळासीं करावी निःसंशयासी सर्वांनीं केली पाहिजे विशेषीं अनंत पुण्य तीयेचें ॥७१॥
आणीक ज्या कुलस्त्रिया गृहा बाहेर न पडतील ज्जया त्या मनोरथ पावती सेवे या श्रीतुलसीचेनी ॥७२॥
सर्व यात्रा यज्ञाचीं फळें पदोपदीं होती सकळें प्रदक्षिणा करितां निर्मळें पूजन करोनी ॥७३॥
कुल स्त्रिया आणि अशक्त सशक्त ब्राह्मणादि सर्व वर्णांत पूजन केलें पाहिजे सतत इच्छित फळासाठीं ॥७४॥
श्रीसखी तुळशीचें महिमान वर्णनीं तटस्थ सहस्त्रवदन विधि शंकर आश्चर्यमान रामासी ह्मणे जमदग्नी ॥७५॥
वैष्णवांचें मुख्य दैवत तुळशी असे प्रख्यात जीची कथा वेदपुराणांत अपार असे ॥७६॥
श्रीतुळसी विष्णु पत्‍नी देव वंदिती अतियत्‍नी नित्यवास कौस्तुभ रत्‍नीं लक्ष्मी अंशती असे ॥७७॥
विष्णु प्रत्यक्ष असती मुळीं काष्ठा मध्यें समुद्र बाळी शाखा पल्लवीं देव सकळी सर्ववेद नामामाजीं ॥७८॥
तुळसीची घ्यावी मंजरी । किंवा दल प्रियहरी संतुष्ट होती पत्र पूजेवरी ****गलित उत्तमोत्तम ॥७९॥
तुळसी वांचूनी पूजितां शालग्रामाचें पूजन तत्वतां सांग न होय निश्चिता काष्ठाचें गंध तरी घ्यावें ॥८०॥
तुलसी काष्ठाचें चंदन केशरादिकाहूनी अधिक जाण नित्य अर्पावें भक्ती करुन सौभाग्य फल पाविजे ॥८१॥
भौम भार्गव भानु दिवसीं व्यतिपात वैधृती क्षयासी अमापूर्णा द्वादशीसीं तोडितां दग्ध सप्तकुळासी अशुचीनें भोजन जाल्यासी दोष होय ॥८२॥
नमो नमो हे तुळसी नमो तुज पाप जाळिसी नमो दाखवी विष्णूसी कृपा करी नमोस्तुते ॥८३॥
नमितों मी आभीष्टदेसी जाज्वलित करी गे भक्तीसी पुरवी तूं मनोरथासी वास दे सदां विष्णु चरणीं ॥८४॥
प्रार्थोनि पूजिती जे तुळसीसी नित्य भक्तीनें बहुवसी प्रत्यक्ष होय विष्णु तयासी सत्य वाक्य परशुरामा ॥८५॥
स्त्रीसी तुळसी मुख्य दैवत नैवेद्य अर्पिती तुळसी मिश्रित तेंचि प्रत्यक्ष होय अमृत अन्यथा नैवेद्य न करावा ॥८६॥
विष्णू अर्पित तुळसीसी स्त्रिया पुरुषांनीं भक्षणासी घ्यावी नित्य आदरेंसी मुखदोष दग्ध होती ॥८७॥
जया अंगीं तुलसी काष्ट माला भूषण रुप सर्वांगाला धारणासी मुख्य ब्राह्मणाला ॥ जपिता पुण्य अनंत ॥८८॥
आणीक माला पद्माक्ष जपितां विष्णु प्रत्यक्ष होऊनी अपराध नित्य लक्ष क्षमा करीत श्रीहरी ॥८९॥
श्लोक ॥ तुलसी मणिमालां तु ये बिभ्रंतिगले मुदा ॥ पद्माक्ष मालां धात्रीं वानतेयांतियमालयं ॥९०॥
वायौ ब्रह्मवाक्ये तुलसी माहात्म्यपूर्वी शंकर स्कंदा सिकवी तेणें तो षण्मुख महाजवी वधिता जाला तारकासी ॥९१॥
तुळसी नसे जया स्थाना आणीक असेल गंगा युमना तरी त्यजावें त्या सदना निश्चयेंसीं ॥९२॥
तुलसी नसे जयाचे गृहा तेंचि असे स्मशान महा तेथेंचि येई यम हा नाश करी तयाचा ॥९३॥
जयाचे निग्रहीं तुळसी तेथें जागा न मिळे पापासी असेचि पुण्य अपारेंसी पुत्रादि संपत्ती होय बहुत ॥९४॥
जें विचारिलें परशुरामा प्रश्न केलासी अनुपमा, ऐकतां होय निरुपमा, श्रीविष्णुपद पाविजे ॥९५॥
परशुराम ऐसें ऐकतां बंदू नि जननी आणि पिता संवत्सरयात्रा करोनि तत्वतां आश्रमाप्रती तें आले ॥९६॥
पुढें कथा वर्तली कैसी अपूर्व अमृता परियेसी ऐकावी विचारें मानसीं ऋषीसी ह्मणे तो सूत ॥९७॥
स्वस्ती श्रीपरशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु अष्टमोध्याय गोड हा ॥८॥