शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2016 (17:22 IST)

आत्मसंस्थं मन: कृत्वा

या जगात दोनच वस्तू आहेत. एक प्राप्त असलेला परमात्मा आहे आणि दुसरे सर्व जिवाला मात्र संसाराचीच प्रतीती येते. याचं प्रमुख कारण जिवाला अनादिकाळापासून संसाराचेच संस्कार अंत:करणात घट्ट रुतून बसले असलने नित्य-सत्य परमात्मकडे ते अनादी-अनात्म-असार संस्कार जाऊ देत नाहीत. प्राप्त आणि प्रतीती यामधील फरक असा की, प्राप्त असणारा परमात्मा दिसत नाही आणि संसार, भूत भौतिक सर्व मायेचे कार्य असलेल्या प्रपंचाची प्रतीती होते पण ती राहात नाही, विनाशी आहे. क्षणभंगुर आहे. ‘क्षणभंगुर नाही भरवसा। व्हारे सावध तोडा मा आशा। काही न चले पडेल मग गळा फासा। पुढे हुशार थोर आहे ओळसा गा।। (तु.महा.) भगवंतानी जिवाला जे आयुष्य दिले आहे ते बिनभरवशाचे आहे. हा देह केव्हा निघून जाईल याचा भरवसा नाही. म्हणजेच ते क्षणभंगुर म्हणजे क्षणात संपणारे आहे. याकरिता जिवाने बेसावध न राहाता आशेचे आणि मायेचे पाश तोडून टाकावेत. नाहीतर शेवटी यमाने पाश आवळला म्हणजे त्या ठिकाणी जिवाचे काहीएक चालणार नाही. हा श्री तुकोबारायांचा अनुभव असून जिवाच्या हिताकरिता कळवळल्याने सावध होण्यास सांगतात. शरीर तथा संसार जे दिसत आहे, संसाराची प्रतीती होत आहे परंतु वास्तवात ते नाही. कारण जे प्रतीत होते ते कल्पित असते. स्वप्नपदार्थाप्रमाणे ते मिथ्या-खोटे असते. जे दिसते ते असत नाही आणि जे असते ते दिसत नाही. हा वेदांत शास्त्राचा नियम आहे. 
 
ज्याप्रमाणे आपली सत्ता ‘मी आहे’ ही जी माझी सत्ता आहे हे नित्यप्राप्त आहे. याठिकाणी ‘मी’ आत्म्याला संबोधण्यात आलेले आहे. कारण जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि मूर्च्छा या सर्व अवस्थेत माझ्या सत्तेचा केव्हाही अभाव नाही. ‘मी’ सदैव भावरूप आहे. परंतु ही आत्मसत्ता-परमात्मसत्ता इंद्रियगोचर नाही म्हणून ही सत्ता दिसत नाही. इकडे शरीर तथा संसार जे दिसत आहे, याची प्रतीती होऊ लागली आहे. परंतु वास्तविक सत्यस्वरूपात ते नाही. कारण शरीर किंवा संसार हे काही स्थायी स्वरूपात राहाणारे नाही. याचा नाश निश्चित एक दिवस ठरलेला आहे. परंतु जे प्राप्त आहे त्या प्राप्ताचं म्हणजेच आत्म्याच्या केव्हाही नाश होऊ शकत नाही. ते सदैव आहेच आहे. ते सदासर्वदाकरिता प्राप्त आहे. परंतु प्राप्त असणार्‍या आत्म्याची-परमात्म्याची प्रतीती होत नाही. या प्राप्त असणार्‍याचं ज्ञान ‘इदं’ मुळे म्हणजे हा, ही, हे मुळे होत नाही. ज्याप्रमाणे डोळ्याने संसार पाहातो म्हणजे संसार दिसतो परंतु डोळ्याने डोळा दिसत नाही. ज्याच्यामुळे पाहाण्याची क्रिया घडते ते डोळे आहेत. अशाचप्रकारे ज्याच्या सत्ता स्फूर्तीमुळे, ज्याच्या प्रभावाने संसाराची प्रतीती होत आहे, ज्याच्या आधारावर संसार टिकून आहे तोच सर्वाचा प्रकाशक आहे आणि तोच सर्वाचा आधारवड आहे. सर्व प्रकाशित वस्तू प्रकाशाच्या अंतर्गत प्रतीत होत आहेत. परंतु जो प्रकाशक परमात्मा आहे तो दिसत नाही. जो सर्वाना जाणणारा, प्रकाशणारा आहे त्याला कोणीही जाणू शकत नाही. त्याला कोणीही प्रकाशित करू शकत नाही. 
 
डोळे पाहातात पण डोळ्याला कशाने पाहावे? तो सर्वाना जाणणारा जाणणत येऊ शकत नाही. पण तो नित्य प्राप्त आहे. जी प्रतीती आहे म्हणजे जे इंद्रिाला प्रतीत होत आहे त्याचा संबंध केव्हाही नव्हता. म्हणजे हे शरीर जन्मण्याआधी नव्हते, नंतरही हे राहाणार नाही. याचा नाश होणार आहे आणि वर्तमानकाळात जे दिसते आहे ते वियोगाच्या वाटेला लागले आहे. जे दिसत आहे यात प्रतिक्षण बदल होत चालला आहे. ही सर्वांच्या अनुभवाला येणारी गोष्ट आहे. हा देह चिरंजीवी स्वरूपात राहाणार आहे, या घमेंडीत आपण वागत असतो. या प्रतीत असणार्‍याला ‘आहे’ समजून बसलो आणि ज्या ‘आहे’ (परमात्म्याच्या)च्या आधारावर हे दिसत आहे, त्या ‘आहे’ला प्राप्त करण्यास आम्ही कठीण समजून बसलो आहोत. ‘आत्मसंस्थं मन: कृत्वा न किंचिदपि चिन्तेत्।’ (गीता 6.25) परमात्मा सर्व देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थितीत, घटनेत आणि माझ्यात नित्य परिपूर्ण आहे. अशाप्रकारे दृढ मानणे अर्थात या वास्तविकतेला स्वीकार करणे म्हणजेच ‘आत्मं संस्थं मन: कृत्वा’ आहे. परमात्म्याच्या ठिकाणीच मनाला स्थापित करून त्याच्याशिवाय दुसर्‍या कशाचेही चिंतन करू नये. कारण एक परमात्माच नित्य प्राप्त आहे. हा निश्चय अंतरी दृढ असू द्या असा गीतेचा उपदेश आहे. 
 
काशीनाथ सर्जे