शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 2 सप्टेंबर 2015 (11:19 IST)

कुंभमेळा म्हणजे ज्ञानोत्सव

नाशिक येथे दर बारा वर्षानी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. यंदा ऑगस्ट-सप्टेंबर 15 या कालावधीत हा कुंभमेळा होत आहे. कुंभमेळा म्हणजे ज्ञान, अनुभव, अध्यात्म, साधू, मुनी, संत यांच्या प्रवचनाचा, सर्मपणाचा जणू सोहळा आहे. कुंभमेळ्यात हिमालय, गिरनार, विंध्य सह्याद्रीच्या गुहांमध्ये एकांतात जप, साधना, धन करणारे सिद्ध पुरुष, संन्यासी, धर्म संरक्षणासाठी शस्त्र धारण करणारे नागा संन्यासी, देशातील विविध ठिकाणाचे जगद्गुरू, संत येतात. हिंदू धर्माची विविधता, एकता, सहिष्णुता येथे आपण पाहतो. त्यामुळे असा सुयोग आपण चुकविता कामा नये. एक हजार अश्वमेध, शंभर वाजपेय य ज्ञ, एक लाख वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करून जे पुण्य मिळते ते तेथील एका स्नानाने मिळते. कुंभमेळा म्हणजे प्रवचन, कीर्तन, कथा, सत्संग, सुविचारांचा महोत्सव आहे. कुंभमेळा म्हणजे करोडो रूपयांची उलाढाल, अनेक साधुसंतांना भेटण्याचे त्यांचे, आशीर्वाद घेण्याचे उत्तम ठिकाण.
 
देव आणि दानवांनी मिळून क्षीरसागर मंथन केले. त्यातून चौदा रत्ने बाहेर पडली. अमृतकुंभ मिळविण्यासाठी इंद्रपुत्र जयंताचा पाठलाग शुक्राचार्यांच्या आदेशानुसार दैत्यांनी केला. देव आणि दानव यांच्या भांडणात अमृतकुंभ थोडासा हरिद्वार, प्रयाग, नाशिक, उज्जैन येथे सांडला. कुंभमेळ्याच्या आणखी कथा आहेत. नाशिक आणि उज्जैनचा कुंभमेळा सिंहस्थ पर्वणी म्हणून ओळखला जातो. सूर्य आणि गुरुचा सिंह राशीत प्रवेश झाल्यावर गोदावरी किनारी नाशिक येथे कुंभाचा योग येतो. म्हणून नाशिक-त्र्यंबकेश्वर, कुशावर्त ठिकाणी लाखो भाविक जमतात. सूर्याचा मेष राशीत व गुरुचा सिंह राशीत प्रवेश झाल्यावर उज्जैन येथे सदा मुक्तिदायी कुंभमेळा होतो. हरिद्वारचा कुंभमेळा चैत्र-वैशाख महिन्यात येतो. 29 ऑगस्ट 2015 (रक्षाबंधन), 13 सप्टेंबर 2015 (श्रवण वद्य अमावस्या), 18 सप्टेंबर 2015 (ऋषिपंचमी) हे सिंहस्थ पर्वणीतील स्नानाचे दिवस आहेत. सूर्य, चंद्र, गुरू यांच्या शुभयोगातून शक्तिशाली किरण येथील नदीवर पडतात. स्नान केल्याने   आधत्मिक प्रगती होते. 
 
गोदावरी नदीच्या किनारी गौतम ऋषींचा होता. त्याकाळी दुष्काळ पडला तेव्हा गौतम ऋषींनी वरुण देवाची प्रार्थना केली आणि त्यांच्या   सल्ल्यानुसार कुशावर्त येथे खड्डा खणला. त्या ठिकाणी अमृत पाऊस पडला, अशी गोदावरीच्या अवतरणाची कथा आहे. आंध्र प्रदेशातही सिंहस्थ पर्वणी निमित्त राजमुंद्री येथे गोदावरी पुष्कर मेला होतो. मी हरिद्वार, प्रयाग, उज्जैन, नाशिक येथील कुंभमेळ्यात काही दिवस सहभागी झालो. सर्व शंकराचार्य, संत, महात्मे, आखाडाचे महंत, नागा साधू यांचे दर्शन मिळाले, आशिर्वाद मिळाले. त्यांची प्रवचने ऐकली. पण हरिद्वार, प्रयाग, उज्जैन येथील कुंभमेळा मला भव्य दिव्य विशाल दिसला. नाशिक, कुशावर्त, त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यासाठी जागा अपुरी पडते. 
 
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र ङ्खडणवीस या कुंभमेळ्याचे योग्य नियोजन करीत आहेत. सोयी, सवलती साधूंना मिळत आहेत. कुंभमेळ्यात विविध ग्रंथ, रूद्राक्ष, काही ग्रहांच्या अंगठय़ा, धार्मिक वस्तू, मोती, पोवळे इत्यादी विक्रीसाठी आपणास पाहावयास मिळते. बरेच उद्योगपती, भाविक, संस्था येथे अन्नदान, विविध प्रकारचे दान करतात. 
 
जगदीशचंद्र कुलकर्णी