शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

देवा, माणसाचा जन्म घेऊन बघ!

माझ्या मनात कल्पना आली की, देवाने एकदा तरी माणसाचा जन्म घेऊन बघावे. आजच्या जगात दु:ख इतकं आहे की, ते सहन करण्याची ताकद फक्त माणसातच आहे. हे तू अनुभवून बघ देवा! कलियुगात सर्वत्र दु:ख आहे. माणूस किती सहन करत आहे. पैशाची अडचण, आरोग्याचा अभाव, राजकारणार्‍यांची अरेरावी, माणूस माणसापासून दूर झाला आहे. मी म्हणत नाही की, तू फक्त दु:खच दूर कर. पण त्याला सहन करण्याची ताकद दे, आज अश्रूंची किंमत नाही राहिली, जगाला पैसा कमी पडत आहे. रोगराई, संकटे, इतर सर्व बघ, त्या माणसाकडे बघ, जो कष्ट करतो पण एक-एक रुपयासाठी त्याला तासन्तास घाम गाळावा लागतो. मरणारा शेतकरी किती कळवळतो ते बघ, त्याचे कुटुंब काय करेल, कसे जगेल हे तू बघ. 
 
व्यक्ती प्रौढ झाली की, तिचा संघर्ष सुरू होतो. जीवनात चढ-उतार, सुख-दु:ख हे चालूच असणार आहे. माणूस माणसापासून दूर झाला आहे, हे तू बघ, अनुभव. 
 
प्रत्येकजण आज दडपणाखाली आहे, गरजा वाढल्यामुळे आणि स्पर्धेमुळे माणूस भरडत चालला आहे. पुढे यशाकडे जातानाही माणसाची माणुसकी मागे राहून जाते. 
 
शंभर किलोचे पोते श्रीमंताला खरेदी करता येते पण उचलता येत नाही आणि ज्याला उचलता येते त्याला ते खरेदी करता येत नाही, हे पाहिलेस का? आयुष्य फुलापाखरासारखे आहे, हात उघडला की उडते आणि बंद केला तर मरते. आयुष्यात संघर्षाशिवाय विजय मिळत नाही हे मलाही माहिती आहे पण अपार दु:ख हे माणसाच्याच नशिबी आले आहे हे तुला माणसाचा जन्म घेतल्याशिवाय कळणार कसे? फक्त  माणूसच आहे जो हे सहन करत आहे, तू हे अनुभव, इतका कठोर होऊ नकोस की माणसाचा तुझ्यावरचा विश्वास उडेल. आज प्रेमाची गरज आहे. माणसाला, प्राणीमात्राला आणि निसर्गालासुद्धा. विव्हळणार्‍या या माणसाला तू आधार दे. माणसाला सर्व काही मिळत नाही. तो जे मागतो ते सर्वच मिळते असे नाही. हे मलाही माहीत आहे. 
 
माणूस सर्वच दु:खाने त्रस्त आहे. तो स्वत:ला हतबल समजाला लागला आहे. देवा, आजच्या परिस्थितीत तू माणसाच्या जीवनाचा अनुभव घे आणि तूच ठरव, कसं सहन करणार एवढे दु:ख? कळवळणार्‍या जीवाला फक्त तुझाच आधार आहे, हे विसरू नको. 
 
ऋत्विक चव्हाण