मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: पंढरपूर , सोमवार, 30 मार्च 2015 (07:47 IST)

पंढरीची वारी प्रथमच राहुटय़ाविना भरली

वर्षातील चारही यात्रांमध्ये राहुटय़ांनी गजबजणारे चंद्रभागेचे वाळवंट यंदा उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे प्रथमच मोकळ पटांगणाप्रमाणे व स्वच्छ दिसत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असले तरी भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे. दरम्यान, उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी शनिवारी पंढरीत दाखल झाले.
 
पंढरीत भरणार्‍या चार प्रमुख यात्रांपैकी चैत्री यात्रा 31 मार्च रोजी असून यासाठी दशमीदिवशी हजारो भाविक शहरात दाखल झाले आहेत. दरवर्षी हे भाविक ळवंटातच तंबू उभारून मुक्काम ठोकतात. पण यंदा यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. पंढरीची यात्रा व चंद्रभागेचे वाळवंट याचे अतुट नाते आहे. जवळपास एक लाख भाविक या वाळवंटात मुक्कामास असतात. यातूनच मग अस्वच्छता, मानवी मैला असे प्रकार होऊ लागले. याची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत वाळवंटात तंबू उभारणे, चार चाकी वाहने, जनावरे, कपडे धुणे यस पूर्णपणे बंदीचे आदेश दिले. तसेच प्रशासनास तात्पुरती शौचालये देखील उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या माघी यात्रेत हा आदेश देण्यात आला. तेव्हा वारकरी संप्रदयात  एकच खळबळ उडाली होती. माघीच तोंडावरच हा आदेश दिल्यामुळे त्यावेळी याची अंमलबजावणी झाली नाही. पण चैत्री वारीत प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
 
यात्रा दोन दिवसांवर आली तरी सध्या वाळवंटात एक देखील तंबू तसेच चारचाकी वाहन उभे नाही. यामुळे स्वच्छता दिसून येत आहे. या पारंपरिक फडांची चंद्रभागेच्या पैलतिरावरील 65 एकरात सोय करण्यात आली आहे. 
 
दरम्यान, न्यायालयाने वाळवंटात भजन कीर्तनास परवानगी दिली आहे. मात्र, कडक उन्हाळ्यात बिन तंबू व राहुटय़ाचे भजन कसे करायचे असा प्रश्न महाराज मंडळींनी उपस्थित केला आहे. तसेच चार चाकी वाहनास बंदी केल्यामुळे वृध्द, स्त्रिा व लहान मुलांना रखरखत उन्हात वाळवंटातून जावे लागत आहे. याबाबत प्रशासनाने कोणतीच उपायोजना केली नाही. तसेच न्यायालयाच्यासमोर देखील हा मुद्दा मांडण्यात आला नाही.