गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2016 (13:11 IST)

‘गोड बोलणे’ संक्रमण ते मधुर..!

प्रत्येक सणाची एक मजा असते. यातही संक्रांतीचा गोड बोलण्याचा संस्कार महत्त्वाचा वाटतो. जीवनाचे संक्रमण नेहमी योग्य दिशेने होण्यासाठी ‘सर्वांशी गोड बोलणे’ हा सर्वात महत्त्वाचा संस्कार आहे. कोणताही बदल सकारात्मक नजरेने स्वीकारत पुढे जाण्याची सवय संस्कार करतात. यातील भाषिक संवाद नीट होण्यासाठी ‘गोड बोलणे’ ही व्यवहाराची गरज असतेच असते, परंतु मन व्यवहारापलीकडे जाण्यासाठीसुद्धा गोड बोलणे महत्त्वाचे असते.
 
कोणत्याही व्यवहारात काहीतरी देवाण-घेवाणीच्या गरजेपोटी माणसामध्ये भीती किंवा धाडस या भावना निर्माण होतात. कोणताही व्यवहार  आला की त्याचबरोबर बोलणे-अबोलणे आलेच. व्यवहारिक गरजेपोटी आपण कुणाला तरी कळत-नकळत दुखावत असतो, किंवा कुणाच्या   तरी बोलण्याने आपण सुखावत तरी असतो. कोणाचे वाईट बोलणे सोसणे आणि आपण मात्र गोड बोलत राहाणे, ही साधी गोष्ट आहे का? असो, गोड बोलणे केवळ स्वार्थापोटी असू नये, तसेच ते केवळ भीतीपोटीही असू नये. समोरचा माणूस कसाही वागला, कसाही बोलला तरी आपल्या अंत:करणामध्ये त्याच्याविषयी सद्भावनाच असायला हवी. तरच आपले गोड बोलणे हे हृदयापासून येईल, नाही का..? त्यासाठी अंत:करण क्षमाशील आणि दयेने भरलेले असावे लागते, तरच आपल्या हृदयात साखरेची गोडी निर्माण होईल. हृदयामध्ये असा प्रेमभाव निर्माण होण्यासाठी हृदय प्रेमाने काठोकाठ भरलेले असले पाहिजे. एकदा का हृदय प्रेमभावाने काठोकाठ भरले तर तेथे कटुतेला जागा कोठून आणणार? हृदयाचे असे संक्रमण होत राहिले तरच माणूस गोड बोलून स्वत:बरोबर इतरांना सुखावू शकतो. ही गोष्ट एवढी सहजासहजी सोपी आहे का? नक्कीच नाही. इतरांचे कडवट बोलणे, वागणे सोसण्यासाठी आपल्यामध्ये सुविचारातून आलेली निर्भयता आणि सात्त्विक त्यागातून आलेले धाडस असावे लागते. इतरांचे दुर्गुण पोटात घेण्याची मनाची वृत्ती हेच मनाचे श्रेष्ठ धाडस आहे. हे धाडस निर्माण झाल्याशिवाय आपण सर्वत्र गोड बोलूच शकणार नाही. 
 
मधुर बोलण्याने इतरांना सुख मिळते. चार गोड शब्द बोलायला पैसे पडत नाहीत, तरीही माणूस एकमेकांशी बोलताना गोड बोलत नाही. हृदयात जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, माया, ममता, जपत नाही. वाणी म्हणजेच बोलणे, ही दृश्य व्यवहाराची जननी होय. बोलण्यातून व्यवहार निर्माण होतात आणि व्यवहारातून बोलणे निर्माण होते. बोलल्याशिवाय आपल्याला सहजासहजी जगता येणार नाही. असे बोलणे तिळागुळासारखे गोड असावे, हे महत्त्वाचे. इतरांना समाधान देण्याचे सामर्थ्य करोडो रुपयांच्या आर्थिक ताकदीतही नाही. ती ताकद चार गोड शब्दात मात्र खचाखच भरलेली असते.
 
‘बोलतो गोड, त्याचे जीवन गोड..’ हा संक्रांतीचा संस्कार, सुखाच्या दिशेने जाण्यासाठी रक्ताच्या पेशीपेशीत रूजविला पाहिजे. शिशिरातील पानगळीसारखे एकेक सणांचे महत्त्व कमी होत आहे आणि रोजचा दिवस सणासारखा साजरा करीत माणूस जगू लागला आहे. या दीड दशकात मानवी जीवनरथाने हे महत्त्वाचे संक्रमण सहज पार केले आहे. या संक्रमणात केवळ ऑनलाइनवर आणि स्क्रीनवर दिसणार्‍या   तीळगुळाच्या लाडवाच्या ताटांनी जीवननौका पार होणार नाही. गोड बोलणे अभासी जीवनात नेहमीच सोपे असते..! व्यक्ती आणि तिच्यामुळे निर्माण होणार्‍या समस्या आपल्यासमोर आल्यावरही आपल्या मुखातून गोड शब्द बाहेर येणे हा संस्कार रक्तात भिनवणे तशी साधी गोष्ट नाही. यासाठी जिभेला वळण लावण्याचीही एक तपश्चर्याच करायला हवी. हे तप करायला प्रवृत्त करणारा, तिळाचा स्निग्धपणा आणि गुळाची गोडी जिभेवर आणून ठेवण्याची शिकवण देणारा सणसुद्धा नव युगातील माणसांनी दररोज साजरा कराला हवा.
 
दीपक कलढोणे