शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणुकांचा संपूर्ण इतिहास
Written By
Last Modified: सोमवार, 12 मे 2014 (15:37 IST)

1977 मधील जनता लाट

आणीबाणीमुळे इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात जबरदस्त वातावरण तयार झाले होते. याचा प्रत्यय 1977 च्या लोकसभा निवडणुकीत आला. केवळ जनता पक्षाच्या नावावर अनेक उमेदवार निवडून आले. त्यावेळच्या जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी यांना 1977 मध्ये ठाणे मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली. पुण्यातून समाजवादी पक्षाचे मोहन धारिया यांना जनता पक्षाची उमेदवारी मिळाली. रामभाऊ म्हाळगी हे पुण्याचे. 1971 मध्ये त्यांनी पुण्यातूनच लोकसभेची निवडणूक लढवली होती. म्हाळगी यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे, असा आग्रह त्यावेळच्या जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्षाच्या नेतृत्त्वाकडे धरला. त्यामुळे म्हाळगी यांना ठाण्यातून उमेदवारी दिली गेली.

त्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या विरोधात एवढी प्रखर लाट होती की स्थानिक आणि उपरा उमेदवार अशी तुलना करण्याचेही मतदारांच्या मनात आले नव्हते. रामभाऊ म्हाळगी हे ठाणेकरांना अपरिचित होते; तरीही त्या निवडणुकीत ते प्रचंड मतांनी लोकसभेवर निवडून गेले. याच निवडणुकीत जॉर्ज फर्नाडिस हे बिहारमधील समस्तीपूर मतदारसंघातून निवडून आले. विशेष म्हणजे जॉर्ज फर्नाडिस हे निवडणुकीवेळी तुरुंगात होते. त्याआधीच्या 67 आणि 71 अशा दोन लोकसभा निवडणुका जॉर्ज फर्नाडिस यांनी मुंबईतून लढवल्या होत्या. बिहारशी तसा फर्नाडिसांचा काहीच संबंध नव्हता. मात्र आणीबाणीविरोधी लाटेत फर्नाडिस हे संपूर्ण देशातून विक्रमी मतांनी लोकसभेवर निवडून आले.

- आशिष जोशी