कोंबड्याने घेतला मालकाचा प्राण
कोंबडा प्राणघातक मानला जात नाहीत. असे असूनही त्याच्या हल्ल्यामुळे एकाला आपले प्राण गमवावे लागले आहे. आयर्लंडमधील एका व्यक्तीवर अमेरिकन जातीच्या कोंबड्याने अशा प्रकारे हल्ला केला की त्या व्यक्तीचे संपूर्ण शरीर रक्ताने भिजले आणि शेवटी अतिरक्तस्त्राव होऊन हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा वेदनादायक मृत्यू झाला. ही घटना गेल्या वर्षी घडली होती मात्र आता या प्रकरणाचा सविस्तर अहवाल समोर आला आहे.
माहितीनुसार आयर्लंडमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचे नाव जॅस्पर क्रॉस असे सांगण्यात येत आहे. या व्यक्तीवर ब्राहमा चिकन जातीच्या अमेरिकन कोंबड्याने हल्ला केला होता. याबाबत गेल्या वर्षी एक समिती स्थापन करण्यात आली होती, ज्यामध्ये आता काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या व्यक्तीला वाचवण्यासाठी सुमारे 25 ते 30 मिनिटे पीसीआर देण्यात आला होता, मात्र तो वाचू शकला नाही, असेही समोर आले आहे.
या प्रकरणात, द आयरिश एक्झामिनरने आता न्यायालयीन चौकशीच्या आधारे आपला अहवाल प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की कोंबड्याच्या हल्ल्यानंतर त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. रिपोर्टनुसार जॅस्पर क्रॉसच्या मृत्यूचा साक्षीदार आणि जॅस्परचा शेजारी कोरी ओ कीफ यांनी म्हटले की ते ओरडत होते आणि मला त्यांचा पाय रक्ताने माखलेला दिसला. त्यांच्या पायाला सतत रक्तस्त्राव होत होता, त्याला मलमपट्टी करण्यात आली होती, CPR देण्यात आला होता पण 25 मिनिटांनी अॅम्ब्युलन्स आली आणि जॅस्परचा मृत्यू झाला.
या प्रकरणात अधिकार्यांनी सांगितले की जॅस्पर क्रॉस किचनच्या फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांच्या पायाच्या मागच्या बाजूला मोठी जखम झाली होती. तपासादरम्यान डॉक्टर रमजान शतवान यांनी दावा केला की जॅस्परचा मृत्यू हृदयाच्या अनियमित ठोक्यामुळे झाला. मात्र यापूर्वीही अमेरिकन जातीच्या कोंबड्याने लोकांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.