शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: सोमवार, 10 एप्रिल 2023 (07:59 IST)

शिखर धवन 99, पंजाब 143, हैदराबादची विजयी बोहनी

ipl 2023
दरवर्षीप्रमाणेच नवा कर्णधार, नवा प्रशिक्षक, नवा फलंदाजीक्रम, नवे प्रयोग आणि पराभव ही पंजाब किंग्ज संघाची ओळख रविवारच्या लढतीत पाहायला मिळाली.
 
पंजाबने हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 143 धावांची मजल मारली. या पैकी 99 धावा कर्णधार शिखर धवनने केल्या होत्या. धवनचं धावसंख्येतलं योगदान होतं जवळपास 70 टक्के.
 
पंजाबने दिलेलं हे लक्ष्य हैदराबादने 8 विकेट्स गमावून गाठलं.
 
पंजाबने या सामन्यासाठी मॅथ्यू शॉर्ट आणि मोहित राठी यांना संघात समाविष्ट केलं तर सनरायझर्स हैदराबादने हेनरिच लासेन, मार्को यान्सन आणि मयांक मार्कंडेय यांना संधी दिली.
 
पहिल्याच चेंडूवर भुवनेश्वर कुमारने प्रभसिमरन सिंगला बाद केलं. प्रभसिमरनने पहिल्या दोन लढतीत चांगल्या खेळी केल्या होत्या. दुसऱ्या षटकात उंचपुऱ्या मार्को यान्सनने आयपीएल पदार्पण करणाऱ्या मॅथ्यू शॉर्टला बाद केलं.
 
विदर्भवीर जितेश शर्मा 4 धावा करुन तंबूत परतला. अष्टपैलू सॅम करनला फलंदाजीत बढती देण्याचा निर्णयही फसला. मयांक मार्कंडेयने हैदराबादसाठीच्या पदार्पणात करनला बाद केलं.
 
पंजाबने प्रभसिमरनला वगळत इम्पॅक्ट प्लेयर म्हणून सिकंदर रझाला समाविष्ट केलं. मात्र वेगवान गोलंदाज उमरान मलिकने सिकंदरला फार काळ टिकू दिलं नाही. तो केवळ 5 धावा करु शकला.
 
तडाखेबंद फटकेबाजीची ताकद असलेला शाहरुख खानही 4 धावा करुन माघारी परतला.
 
हरप्रीत ब्रारही शिखरला साथ देऊ शकला नाही. राहुल चहर मार्कंडेयचीच शिकार ठरला. एकीकडे साथीदार बाद होत असतानाही शिखरने एकाकी झुंज दिली.
 
नॅथन एलिस बाद झाल्यानंतर शिखरला मोहित राठीची साथ मिळाली. या दोघांनी दहाव्या विकेटसाठी 30 चेंडूत 55 धावांची भागीदारी केली. यात मोहितचं योगदान होतं एका धावेचं.
 
सहकारी बाद होत असतानाही शिखरने कमाल एकाग्रतेने खेळ करत 66 चेंडूत 12 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 99 धावांची खेळी केली.
 
शेवटच्या षटकात शिखरचं शतक होण्याची शक्यता होती पण शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे ते शक्य होऊ शकलं नाही.
 
आयपीएल स्पर्धेत संघातील सर्व सहकाऱ्यांबरोबर भागीदारी करण्याचा दुर्मीळ विक्रमही शिखरने नावावर केला. शिखरच्या नावावर दोन आयपीएल शतकं आहेत.
 
पण रविवारी मात्र शतकापासून अवघी एक धाव वंचित राहिला. हैदराबादतर्फे मार्कंडेयने 15 धावांत 4 विकेट्स घेतल्या. उमरान मलिक आणि मार्को यान्सन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
 
छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने सलामीची जोडी बदलली. मयांक अगरवालच्या बरोबरीने हॅरी ब्रूकला सलामीला पाठवलं. 13 धावा करुन ब्रूक बाद झाला. पाठोपाठ मयांकही तंबूत परतला. त्याने 21 धावा केल्या.
 
राहुल त्रिपाठीने सूत्रधाराची भूमिका निभावत हैदराबादला यंदाच्या स्पर्धेतला पहिलावहिला विजय मिळवून दिला. त्रिपाठीने 48 चेंडूत नाबाद 74 धावांची शानदार खेळी केली. 10 चौकार आणि 3 षटकारांसह त्याने ही खेळी सजवली. कर्णधार मारक्रमने 37 धावा करत त्याला चांगली साथ दिली.
Published By -Smita Joshi