शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 6 जून 2020 (14:41 IST)

गर्भवती हत्तीणीचा मृत्यू: आरोपींच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अनननस खाल्ल्यांनतर मृत्यू झाल्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. पण या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अननसात नाही तर नारळामध्ये फटाके भरण्यात आल्याचं आरोपींनी म्हटलं आहे. 
 
या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्याकडून हा खुलासा केला गेला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रबरच्या शेतीमध्ये काम करतो. हे लोक आपल्या शेताचं रक्षण करण्यासाठी फळांमध्ये फटाके भरून ठेवतात, त्याने जंगली जनावर घाबरतात आणि शेताचे नुकसान होत नाही. 
 
चौकशीत आणखी दोघांनी आरोपीची मदत केल्याचे कळत आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हत्तीणीने हे फटाक्यांनी भरलेलं नारळ स्वत: खाल्लं की तिला ते खाण्यासाठी देण्यात आलं? 
 
काय आहे प्रकार
25 मे रोजी अंदाजे 14-15 वर्षांची हत्तीणी अन्नाच्या शोधात भटकत होती. तेव्हा गावातील मुलांनी फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिले. अननस खाताना अचानक फटाक्यांचा स्फोट झाला. ज्यामुळे हत्तीणीचा जबडा कापला गेला आणि दातही तुटले. स्फोटकांमुळे या हत्तीणीला इतक्या वेदना झाल्या की ती तीन दिवस वेलियार नदीत उभी होती आणि मदतीसाठी आलेलं पथक तिच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या हत्तीणीने सोंड आणि तोंड पूर्णवेळ पाण्यात बुडवून ठेवलं होतं.
 
पशुवैद्यांना हत्तीणीला उपचार करता यावेत म्हणून आम्ही तिला नदीतल्या त्या जागेतून बाहेर काढण्यासाठी अधिकारी आणि दोन प्रशिक्षित हत्ती बोलावले. पण ती जागची हलली नाही. ऑपरेशनची तयारी करण्याआधीच तिचा मृत्यू झाला. पाण्यात उभ्या या हत्तीणीचा 27 मेला मृत्यू झाला. तिचा मृतदेह जवळच्याच एका ठिकाणी नेऊन पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. ही हत्तीण गर्भार असल्याचं त्यावेळी अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं.