मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 9 डिसेंबर 2019 (15:51 IST)

मुंबईचा डॉन अरूण गवळीची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम, हे आहे प्रकरण

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या  हत्या केल्या  प्रकरणी अंडरवर्ल्डचा  डॉन अरुण गवळीसह इतर आरोपींना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई हायकोर्टाने  कायम ठेवली असून, या प्रकरणी शिक्षा भोगत असलेला  गवळी 2008 पासून तुरुंगात आहे. तर  मार्च 2007 मध्ये असल्फा व्हिलेज येथे जामसंडेकर यांची घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
 
काय आहे नगरसेवक हत्या  प्रकरण ? 
कमलाकर जामसंडेकर यांचा त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नावाच्या इसमासोबत प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. त्यानंतर सदाशिवने अरुण गवळीच्या गँगमधील 2 व्यक्तींना जामसांडेकर यांची हत्या करण्यास सांगितले. दोघांनी सदाशिवची अरुण गवळींशी भेट घालून दिली. गवळीने हे करण्यासाठी 30 लाखांची सुपारी मागितली. गवळीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून प्रताप गोडसेला जामसांडेकर हत्येसाठी नवे शूटर शोधण्यास सांगितले. श्रीकृष्ण गुरवमार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची यासाठी निवड केली. विजयकुमार गिरीने अशोककुमार जयस्वालसोबत जवळपास 15 दिवस जामसंडेकरवर पाळत ठेवली. अखेरीस 2 मार्च 2007 रोजी संधी मिळताच जामसंडेकरच्या राहत्या घरी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
 
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणी हत्या, हत्येचा कट रचणे या आरोपांखाली मोक्का अंतर्गत 2008 मध्ये अरुण गवळीला अटक केली होती. 2012 मध्ये मुंबईतील विशेष कोर्टाने अरुण गवळीला 14 लाख रुपयांचा दंड आकारत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर अन्य दहा आरोपींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गवळीसह इतर आरोपींनी जन्मठेपेच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र न्यायालयाने ते फेटाळून लावलं.