गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 5 मार्च 2024 (13:25 IST)

दक्षिण मुंबई लोकसभाः ‘कोळीवाडे ते सोबो’ मुंबईचं संपूर्ण चित्र दाखवणारा मतदारसंघ

election
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मुंबईच्या सहा मतदारसंघापेक्षाच वेगळा मतदारसंघ नाही तर संपूर्ण राज्याचा विचार केल्यास या मतदारसंघाचं वेगळेपण दिसून येतं.
 
मुंबईच्या दक्षिण टोकाचा मतदारसंघ हे याच्या नावातून कळत असलं तरी या मतदारसंघावर संपूर्ण मुंबईचं नव्हे देशाच्या आर्थिक राजधानीचं भवितव्य अवलंबून आहे.
 
सर्व प्रशासक, शासक, राजकीय नेते, उद्योजक, व्यापारी, धनाढ्यांची वसतीस्थानं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या, बँकांची मुख्यालयं, महत्त्वाच्या शाखा, ऐतिहासिक इमारती या भागात आहे आणि या कंपन्या आपला करही इथूनच भरतात. इथं मुंबईचे आद्य निवासी कोळ्यांची घरंही आहेत आणि नौदलाचं केंद्र आणि बंदरही आहे.
 
या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे दररोज दिवसाच्या काळात या मतदारसंघाची लोकसंख्या काही लाखांनी वाढते आणि रात्री तितकीच कमीही होते. थोडक्यात मुंबई शहर, उपनगर आणि सर्व मुंबई महानगर क्षेत्रातून इथं दररोज लाखो लोक कामाला येतात.
 
या भागात सुरू असणारी विकासकामं, नवे रस्ते, पूल, पावसाळ्यातील प्रश्न, बीडीडी वसाहतींचा प्रश्न, कोळीवाड्यांच्या समस्या अशा महत्त्वाच्या विषयांवर इथल्या प्रतिनिधींकडून कार्याची अपेक्षा असते.
 
या सर्व प्रदेशातील लोकांचं रोजगाराचं केंद्र या भागात आहे. इथल्या उच्चभ्रूंमुळे तयार झालेल्या संस्कृतीला आणि या परिसराला 'सोबो' (साऊथ बॉम्बेचे लघुरूप) म्हटलं जातं.
 
इतिहास- भूगोल
आता भूगोलाचा विचार केला तर तसा हा मतदारसंघ चिंचोळा म्हणावा लागेल. मुंबईच्या दक्षिणेस समुद्रात घुसलेला निमुळता भाग या मतदारसंघात येतो.
 
इतिहासाचा विचार केला तर मुंबईच्या मूळ बेटांपैंकी कुलाबा, लिटल कुलाबा, बॉम्बे, माझगाव, वरळी या बेटांवर आणि मतदारसंघ आहे. तसेच परळमधला शिवडी हा भाग या मतदारसंघात येतो.
 
गेली तीनशे ते साडेतीनशे वर्षं इथं व्यापारी स्थिरावले. ब्रिटिश, युरोपियन, पारशी, गुजराती, पाठारे प्रभू, ज्यू लोकांनी या भागामध्ये आपली व्यापाराची दुकानं काढली. इथंच कापसाचा व्यापार वाढला, निर्यात इथूनच झाली. मुंबई बंदरामुळे देशातील सगळा माल इथूनच परदेशात पाठवला जात असे.
 
रिझर्व्ह बँक, मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारखी मोठी रेल्वे स्टेशन्सही इथंच आहेत. महाराष्ट्राचं राज्यशकट हाकणारं विधिमंडळ, मंत्रालय, मुंबईची महानगरपालिका याच मतदारसंघात आहे.
 
विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मलबार हिल, मुंबादेवी, भायखळा, शिवडी, वरळी, कुलाबा हे मतदारसंघ इथं येतात. मलबार हिल मतदारसंघातून भाजपाचे मंगलप्रभात लोढा विजयी झाले आहेत.
 
कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपाचेच राहुल नार्वेकर करतात, ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. भायखळा मतदारसंघात शिवसेनेच्या यामिनी जाधव विजयी झाल्या त्या आता शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत.
मुंबादेवी इथून काँग्रेसचे अमिन पटेल विधानसभेत आमदार म्हणून गेले आहेत. शिवडी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अजय चौधरी तर वरळीतून आदित्य ठाकरे आमदार झाले आहेत.
 
आजवरचे प्रतिनिधी
 
1952 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे स. का पाटील या मतदारसंघाचे पहिले प्रतिनिधी झाले, त्यानंतर 1957, 1962 सालीही ते जिंकून गेले.
 
1967 साली संयुक्त सोशालिस्ट पार्टीचे जॉर्ज फर्नांडिस, त्यानंतर 1971 साली कैलाश नारायण शिवनारायण हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले.
 
1977 साली आणीबाणीनंतर आलेल्या जनता पार्टीच्या युगामध्ये जनता पार्टीचे रतनसिंह राजदा विजयी झाले. त्यानंतर दक्षिण मुंबईत मुरली देवरा यांचं युग सुरू झालं.
 
1984,1989,1991 असे सलग तीनदा ते काँग्रेसचे खासदार झाले. 1996 साली भाजपाच्या जयवंतीबेन मेहता विजयी झाल्या.
 
1998 साली पुन्हा मुरली देवरा विजयी झाले. तर 1999च्या निवडणुकीत जयवंतीबेन मेहता पुन्हा एकदा लोकसभेत गेल्या.
 
त्यानंतर 2004 आणि 2009 या दोन लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा विजयी झाले. 2014 आणि 2019 या दोन निवडणुकांत शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले आहेत.
 
मिलिंद देवरा यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा एक उद्योगस्नेही राजकारणी म्हणून ओळखले जात. मुंबई दक्षिण मतदारसंघाचं त्यांनी अनेक वेळा प्रतिनिधित्व केलं होतं.
 
स. का. पाटील: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा विचार करताना स. का पाटील यांचा उल्लेख महत्त्वाचा आहे. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखला गेलेला हा नेता काँग्रेस, मुंबईत स्वतःचा दबदबा निर्माण करणारा होता.
 
मुंबई शहर, मुंबई महानगरपालिका, बॉम्बे प्रदेश काँग्रेस कमिटी, मुंबईतील उद्योगपती. या सर्व गोष्टींवर स. का. पाटील या नेत्याचा अफाट दबदबा होता.
 
1935 साली स. का. पाटील मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले, तर 1952 सालापर्यंत ते कायम राहिले.
 
1952 साली भारतात पहिल्या निवडणुका पार पडल्या, त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी म्हणून त्यांनी महापालिकेतून बाहेर पाऊल टाकलं. मात्र, तोपर्यंत मुंबई शहर आणि महापालिकेवर त्यांचं एकहाती वर्चस्व होतं.
 
1949 ते 1952 या काळात तीनवेळा स. का. पाटील मुंबई महापालिकेचे महापौरही होते. महापौरपदाच्या कार्यकाळात त्यांनी मुंबईसाठी बरीच कामं केली. झाडं लावणं आणि उद्यानं बांधणं हे तर त्यांच्या अजेंड्यावरच असे. मुंबई सुंदर दिसावी असं त्यांना वाटत असे.
 
आज मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील 'क्वीन्स नेकलेस' दिसतो, तो स. का. पाटील यांनीच त्यांच्या महापौरपदाच्या कार्यकाळात बांधला.
 
जॉर्ज फर्नांडिसः कामगार नेता ते जायंट किलर
सलग तीनवेळा जिंकून येणाऱ्या स. का. पाटलांच्या सत्तेला सुरुंग लावला ते कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी. जॉर्ज फर्नांडिस यांना कामगारबहुल मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सूचना त्यांच्या नेत्यांनी केली होती. मात्र जॉर्ज यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघाची निवड केली.
 
त्यांनी या मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास केला. इथले लोक, मतदार, समस्या, त्यांची आर्थिक परिस्थिती याचा विचार केला आणि जोरदार प्रचार केला.
 
तुम्ही स. का. पाटील यांना हरवू शकता', अशी पोस्टर्स सर्व मतदारसंघात लावली गेली आणि त्याचा मोठा प्रभाव मतदारांवर पडला.
 
या निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांना 1 लाख 47 हजार 841 मतं, तर स. का. पाटलांना 1 लाख 18 हजार 407 मतं पडली. स. का. पाटील पराभूत झाले आणि त्यांच्या राजकीय घसरणीचा काळही सुरू झाला.
 
जयवंतीबेन मेहताः भाजपाच्या जुन्या पिढीच्या प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीमध्ये मुंबईतील एक प्रमुख महिला नेत्या म्हणून जयवंतीबेन मेहता यांचं नाव घेतलं जायचं. 1962 पासून त्या मुंबईच्या राजकीय क्षेत्रात कार्यरत होत्या.
 
मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका त्यानंतर ऑपेरा हाऊस मतदारसंघातून दोनवेळा आमदारही त्या होत्या. त्यानंतर ईशान्य मुंबईतून त्या खासदारही झाल्या होत्या.
 
त्यांना या दक्षिण मुंबई मतदारसंघाचं दोनवेळा प्रतिनिधित्व करायला मिळालं. त्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीही होत्या.
 
मुरली देवराः उद्योगस्नेही ते मुंबईप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष
काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक तसेच गांधी घराण्याचे नीकटवर्तीय त्याहून उद्योगस्नेही व्यक्ती अशी ओळख मुरली देवरा यांची होती.
 
1968 साली ते मुंबई पालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर 1977 साली ते मुंबईचे महापौरही झाले. संपुआच्या दोन्ही सरकारांमध्ये 29 नोव्हेंबर 2006 ते 18 नोव्हेंबर 2011 या कालावधीमध्ये मुरली देवरा पेट्रोलियम मंत्री होते. दोन दशकांहून अधिक काळ ते मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते.
 
1980 साली त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, तेव्हा त्यांचे 'निवडणूक प्रतिनिधी' म्हणून धीरूभाई अंबानी यांनी काम केले होते. देवरा यांचे आणि अनेक उद्योगपतींचे चांगले संबंध होते. तसंच मुकेश आणि अनिल यांच्याशीही घरोब्याचे संबंध होते.
 
मिलिंद देवराः तरुण तुर्क आणि आता बंडखोर
मुरली देवरा यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र मिलिंद यांच्याकडेही आला. ते या मतदारसंघातून दोनवेळा विजयी झाले.
 
काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली तसेच त्यांना केंद्रात मंत्रीही होण्याची संधी मिळाली. मात्र 2014 सालच्या मोदी लाटेमध्ये त्यांचा शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी पराभव केला. हाच कल पुढच्या 2019च्या निवडणुकीतही कायम राहिला.
 
आता 2024 साली मिलिंद यांनी काँग्रेसशी आपल्या कुटुंबाचे असणारे 55 वर्षांचे संबंध तोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
 
ते आता राज्यसभेत निवडून जात आहेत. तर त्यांना पराभूत करणारे अरविंद सावंत शिवसेना उबाठा गटामध्ये आहेत.
 
अरविंद सावंतः कामगार नेता ते उद्धव ठाकरेंचे विश्वासू
शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत अनेकदा त्यांच्या भाषणांमुळे चर्चेत असतात. गेल्या सलग दोन टर्म्स ते खासदार आहेत, त्यांची मूळ ओळख कामगार नेते अशीच आहे.
 
महानगर टेलिफोन कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षं जबाबदारी पार पाडली आहे. 2019 साली शिवसेना भाजपा यांची युती असताना केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद मिळाले होते. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा यांचे मार्ग वेगळे झाले.
 
महाराष्ट्रात शिवसेनेने महाविकास आघाडीत प्रवेश केला तेव्हा शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडली आणि सावंत यांनी राजीनामा दिला. सध्या सावंत शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत.
 
येत्या निवडणुकीत काय होणार?
2024 साली होत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आपल्याकडेच राखतो की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे ही जागा जाते हे पाहाणं आवश्यक आहे. महायुतीमध्येही शिंदे गट किंवा भाजपा यांच्यापैकी ही जागा कोण लढवेल हे जागावाटपातून सिद्ध होईल.
 
राहुल नार्वेकर भाजपातर्फे या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता काही माध्यमांनी बातम्यांमध्ये सांगितली होती.
 
Published By- Priya Dixit