सातपुडा पर्वतरांगेत एक हजार मीटर उंचीवर असलेले चिखलदरा विदर्भातील एकमेव थंड हवे ठिकाण आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि गुगामल नॅशनल पार्क याच भागात आहे. गाविलगड व नर्नाळा किल्ला परिसरात आहेत. 
				  													
						
																							
									  विविध प्राणी, जैविक वनस्पती व वनांनी हा प्रदेश समृद्ध आहे. हिरवळीचा गालिचा पांघरलेला हा प्रदेश मन मोहून घेतो. त्याचवेळी दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा, खोल दर्या श्वास रोखून धरायला लावतात. 				  
 
				  
उंचावरून कोसळणारे धबधबे रौद्रभीषण सौंदर्याची अनुभूती देतात. विस्तीर्ण पसरलेली नैसर्गिक तळी मनाला शांतावतात. आल्हाददायक वातावरणामुळे चित्तवृत्ती प्रफुल्लीत होते. खाली उतरलेल्या ढगांमुळे तर प्रत्यक्ष स्वर्गाचाच अनुभव येतो. 
				  				  ऑक्टोबरपासून जूनपर्यंतचा कालावधी येथे भेट देण्यासाठी उत्तम समजला जातो. चिखलदर्यास पौराणिक पार्श्भूमी आहे. अज्ञातवासात असताना भीमाने किचकास येथेच ठार केल्याचे सांगितले जाते. 				  											 
						
	 
						
	
							 
							
 
							
						
						 
																	
									  त्यावरून या ठिकाणास किचकदरा आणि त्याचा अपभ्रंश होऊन चिखलदरा असे नाव पडल्याचे मानले जाते. या कथेला पुष्टी देणारी भीमकुंड व किचकदरी ही ठिकाणे येथे पाहायला मिळतात. चिखलदरा व धारणी या अमरावती जिल्ह्यातल्या तालुक्यात मेळघाट अभयारण्य वसले आहे. 				  
 
				  
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांसोबतच जंगली अस्वल, बिबटे, सांबर आणि जंगली कुत्रेही पहायला मिळतात. मेळघाटच्या जंगलात वाघांच दर्शन होण्यातल थ्रिल अनूभवण्यासारखं असत. 
				  																								
											
									  साहसी पर्यटक ग्रुप यासाठी कोअर एरियात जाण्याचा हट्ट धरतात, परंतू प्रतिबंधित भागात जाण्यास परवाणगी मिळणं कठीण असत. रात्रीचा किट्ट अंधार, जंगलातून येणारे पशू-पक्षांचे आवाज, व अचानक होणारी सळसळ कानी पडताच श्र्वास रोखून आवाजाच्या दिशेने नजरा रोखल्या जातात. 
				  																	
									  वाघाच दर्शन झाल्यास इछ्चापूर्तीचा आनंद अवर्णणियच असतो. रात्री मचाणावर बसून या प्राण्यांना पाहण्याची संधी येथे मिळते. अर्थात त्यासाठी सहनशीलता व अचूक मार्गदर्शन पाहिजे. 
				  																	
									  व्याघ्रप्रकल्पाच्या सुरवातीला सेमाडोह येथे महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे गेस्ट हाऊस व माहिती क्रेंद्र आहे. तसेच वनविभागाचे कार्यालही आहे. जंगलात जाण्याआधी येथून परवानगी घ्यावी लागते. 
				  																	
									  चिखलदरा येथे गेस्ट हाऊसशिवाय खाजगी तारांकित हॉटेलमध्ये राहण्या व जेवणाची उत्तम व्यवस्था आहे. गिर्योराहकांसाठी गाविलगड व नर्नाळा किल्ला उत्तम आहे. 
				  																	
									  भटकंतीसाठी देवी पॉईट, पंचबोल पॉईट. वॉटर बोटींग व दुचाकीवरून मस्त फिरण्यासाठी भीम कुंड, वन उद्यान, या परिसरातील लोकांनी तयार केलेल्या वस्तूंचे संग्रहालय ही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. येथील कॉफिचे मळेही पहाण्यासारखे आहेत. 				  																	
									  
जाण्याचा मार्ग :  विदर्भातील अमरावती जिल्ह्यात असणारे चिखलदरा, नागपूर, अकोला व अमरावती येथून बस, रेल्वे व हवाई मार्गाने जोडलेले आहे. अकोला येथील विमानतळापासून हे ठिकाण दीडशे किलोमीटर आहे. अमरावती येथून शंभर किलोमीटर, मुंबईहून सव्वासातशे किलोमीटर अंतर आहे. मध्य रेल्वेवरील बडनेरा रेल्वे स्थानकापासून 115 किलोमीटरवर चिखलदरा आहे.