शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

दापोली : ऐतिहासिक ठेवा

दापोली दाभोळ रस्त्यावर १५ किलोमीटर अंतरावर नानटे गाव आहे. गावाच्या अलिकडे डाव्या बाजूला सुप्रसिद्ध पन्हाळेकाजी लेण्यांकडे जाण्यासाठी रस्ता आहे. साधारण २० किलोमीटर अंतर डोंगराळ भागातून प्रवास केल्यावर कोटजाई आणि धाकटी नद्यांच्या संगमावर या लेण्यांच्या रुपात शिल्पकलेचा अद्भूत नमुना पहायला मिळतो. गाणपत्य आणि नाथ संप्रदायातील लेणी आणि शिल्प असलेल्या २९ गुंफा येथे आहेत. गणपतीची सुंदर मुर्ती पर्यटकांचे लक्ष आकर्षुन घेते. लेण्यात असलेल्या स्तंभावरील कोरीव कामही कलाकुसरीचा उत्तम नमुना आहे. नाथपंथीय साधकांची शिल्पेदेखील या ठिकाणी पाहायला मिळतात. परतीच्या प्रवासात केळीलमार्गे मळे गावात मुख्य मार्गाला आपण लागतो. 

मळेपासून दापोलीकडे चार किलोमीटर अंतरावर चिखलगाव हे लोकमान्य टिळकांचे मुळ गाव आहे. चिखलगावला टिळकांच्या वाड्याचेच नुतनीकरण करून त्याठिकाणी लोकमान्य टिळकांचे मंदिर उभारण्यात आले आहे. लागूनच असलेल्या जागेत त्यांच्याच स्मृतीत प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली आहे. चिखलगावचा परिचय आणखी एका कारणाने करून दिला जातो. राजा आणि रेणु दांडेकर या दाम्पत्याने ग्रामीण भागातील गरजूंसाठी मोठा शैक्षणिक प्रकल्प येथे उभा केला आहे. एखादे मोठे कार्य अडथळ्याची शर्यत पार करून कसे उभे राहते याचे उत्तम उदाहरण या शैक्षणिक परिसरात अनुभवता येते. 

दापोलीहून गुहागरकडे जाताना साधारण ३० किलोमीटर अंतरावर देवी चंडीकेचे जागृत देवस्थान आहे. हिरव्यागार परिसरात डोंगरातील दगडांमध्ये कोरीव काम करून मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराच्या दारातच भव्य प्रवेशद्वार आणि दिपमाळ आहे. नंदादिपाच्या प्रकाशात गुहेत जाऊन देवीचे दर्शन घ्यावे लागते. मंद प्रकाशात दिसणारी देवीची मुर्ती नजरेत साठवून घ्यावीशी वाटते. नंदादिपांनी प्रकाशीत गुहेतील वाटही तेवढीच सुंदर दिसते. गुहेत प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे.मंदिराशेजारी असलेल्या आणखी एका गुहेतून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर आलेला दिसतो. भाविक या ठिकाणी स्नानदेखील करतात. हा प्रवाहकुंड पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते.

श्री चंडिकेचे दर्शन घेतल्यावर दाभोळच्या खाडीला लागून असलेल्या अंडा मशिदीचे सौंदर्य न्याहाळता येते. अप्रतिम कोरीव काम आणि कलाकुसरीचा नमुना या मशिदीच्या प्रत्येक भागात पाहायला मिळतो. विजापूरच्या शाही जामा मशिदीची प्रतिकृती असलेल्या या भव्य वास्तूत स्थापत्य कलावैभवाची झलक पहायला मिळते. विजापूरची राजकन्या मॉसाहेब आयेशाबिबी हीने १६५९ मध्ये खराब हवामानामुळे मक्का प्रवास न करता आल्याने धार्मिक कार्य करण्याच्या हेतून चार वर्षात या मशिदीचे काम करून घेतले.त्याकाळात ही वास्तू उभारण्यासाठी १५ लाख रुपये खर्च आल्याची माहिती याठिकाणी मिळते.

दाभोळच्या खाडीतून गुहागरकडे जाण्यासाठी फेरीबोटीची व्यवस्था आहे. पाच मिनिटातच वाहनासह गुहागर तालुक्यात प्रवेश करता येतो. खाडीच्या पलिकडे धोपावे गावातून वेलदूरमार्गे गुहागरला जाताना अंजनवेल येथील गोपाळगडला भेट देता येते. अजूनही या गडाची तटबंदी मजबूत आहे. सात एकर परिसरात किल्ला पसरला आहे. वेलदूरहून बोटीने जाऊनही किल्ला बघता येतो. किल्ल्यापासून एक किलोमीटर अंतरावर अंजनवेलचे दिपगृहेदेखील आहे. परतीच्या प्रवासात विस्तीर्ण परिसरात असलेला प्रसिद्ध रत्नागिरी गॅस ऊर्जा प्रकल्प दिसतो. गुहागरला परतल्यावर नारळाची दाट रांग आपल्या स्वागतासाठी तयार असते. निसर्ग सौंदर्याचे आगर असलेल्या या गावातील मुक्काम खरोखर आनंददायी असतो. खरं तर निसर्गाचे सान्निध्यच मुळात आनंद देणारे असते. व्यवहाराचा विचारही मनात न आणता हृदयाचे कप्पे उघडून मोकळा श्वास घेण्याची तयारी आपली असेल तरच हं!

डॉ.किरण मोघे