शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By वेबदुनिया|

मकर संक्रातीमधील पतंगोत्सव

हा सण जसा धार्मिक आहे तसा तो आरोग्य रक्षणासाठीही आहे. शरीर स्वास्थ्याचे रक्षण करण्याकरिता आपल्या पूर्वजांनी या सणाची मोठय़ा मार्मिकतेने योजना केली आहे. आपले मन तिळाप्रमाणे स्नेहपूर्ण व वाणी तिळाप्रमाणे मधुर असावी. तीळ तीळ सरावे लागते. तेव्हा कुठे प्रतिष्ठा प्राप्त होते. हा सण स्त्रियांचा आहे. या दिवशी सुहासिनी स्त्रिया मातीच्या कुंभात तीळ, सुपारी, भुईमुगाच्या शेंगा, गाजराचे तुकडे, ऊस, कापूस घालतात. हे कुंभ दुसर्‍या स्त्रियांना देतात. त्याने पुण्य पदरी पडते अशी श्रद्धा आहे. रथ सप्तमीपर्यंत तिळगुळाचा हा सण स्त्रिया साजरा करतात. या दिवशी नदीवर किंवा समुद्रावर जाऊन स्नान करण्याची पद्धत आहे. 

या सणाला पतंगोत्सव म्हणूनसुद्धा ओळखतात. विशेषत: गुजरातमध्ये हा उत्सव जागतिक पातळीवर साजरा केला जातो. पतंगोत्सव म्हटला म्हणजे, डोळ्यासमोर गुजराती समाज उभा राहतो. हा समाज व्यापारामुळे सार्‍या देशभर पसरलेला आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात आकाशात डोलणारे रंगी बेरंगी पतंग मकरसंक्रांतीच्या दिवशी दिसतात. गुजराती समाजात नवरात्री नंतर लोकप्रिय असणारा उत्सव म्हणजे पतंगोत्सव. आता हा उत्सव त्या समाजापुरता र्मयादित न राहता याचा आनंद भारत वर्षातील सर्व लोक लुटतात. या दिवशी तर गुजरातमध्ये घराला कुलूप लावून सारे कुटुंबच कौलारू घराच्या छपरावर, गच्चीवर पतंग उडवण्यासाठी जाते. नाष्टा पाणी जेवण गच्चीवरच होते. तरुण-तरुणी आबालवृद्ध सर्वजण या उत्सवात भाग घेताना दिसतात. अशा या पतंगाच्या उत्पत्तीविषयीची माहिती उद्बोधक ठरेल. 'पतंग' हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ उडणारा असा होतो. मकरसंक्रांतीनिमित्ताने शहरातील बाजारपेठा विविध प्रकारच्या चित्ताकर्षक पतंगांनी सजल्या आहेत. देशात, राज्यात घडणार्‍या घटनांचे प्रतिबिंब पतंगावर चित्ररूपाने उमटत असते. यंदा पतंगांवर नरेंद्र मोदींच्या प्रतिमा मोठय़ा प्रमाणात रेखाटण्यात आल्या आहेत. गुजरातमध्ये, पतंगावर मोदींचे चित्र असलेले विविध आकाराचे पतंग बाजारात विक्रीस आले आहेत. त्याला मागणी देशभर आहे. तसेच लोकप्रिय सिनेनट-नट्या, क्रिकेटर यांचीही चित्रे आहेत. गेल्या वर्षी पाच फुटांचा फोल्ड करता येणारा चायना पतंग आकर्षण ठरला. पतंग बनविण्याचा गुजरातमध्ये एक मोठा धंदा असून हंगामाच्या आधी तीन-चार महिने पतंगाचा धंदा कार्यरत असतो. बाबूंच्या कामट्या तयार करून ठरावीक मापात त्या कापणे, कागद व्यवस्थित कापणे वगैरे पतंग निर्मितीची तयारी झाली की, पतंग चिकटविण्यासाठी कणिक, मैद्यापासून 'लई' नावाचे चिकट द्रावण तयार करून पतंग बनविले जातात. काचेच्या पावडरीपासून मांजा बनवला जातो. त्यालासुद्धा खूप मागणी आहे. अशा या पतंगाचा शोध ख्रिस्तपूर्व काळात चौथ्या शतकात लागला असावा, असे जाणकार म्हणतात. या शोधाचे जनकत्व ग्रीक शास्त्रज्ञ 'अँरोकाईट्स' यांच्याकडे जाते. मात्र पतंग मोठय़ा प्रमाणात उडविण्याचे श्रेय चीनकडे जाते.

आता तर चीन देश म्हणजे पतंगाचे माहेरघर समजले जाते. पतंग जास्तीत जास्त आकर्षक कसे दिसतील, याकडे लक्ष असते. पतंग उडवणे हे करमणुकीचे साधन समजतात. पण जपानमध्ये मात्र पतंग उडविण्याच्या खेळाला धार्मिकतेचे वलय आहे. तेथे मंदिरामार्फत पतंग उडविण्यास उत्तेजन दिले जाते. इमारतीवर पतंग उडत राहिल्यास संकट येत नाही, अशी तेथील लोकांची भावना आहे.

१९३६ साली जपानमध्ये मोठय़ातला मोठा पतंग बनवण्यात आला होता. त्याला कागदाचे साडेतीन हजाराहून अधिक तुकडे लागले होते. वजन नऊ टनापर्यंत होते. इतिहासात पतंगाचे जन्मगाव म्हणून नोंद झालेल्या 'विफांग' या गावी चीनने १९८७ साली एक 'आंतरराष्ट्रीय पतंगोत्सव' साजरा केला. त्या वेळी जगातील सार्‍या देशांना आमंत्रित केले गेले होते. चीनमध्ये पतंगाची पूजा करून तो उडविण्यात येतो. अशुभ दूर करण्याचा त्यामागचा उद्देश आहे. जगाच्या पाठीवरील सर्व देशात पतंग उडवले जात असले तरी त्यामागील उद्देश, कारणे मात्र वेगवेगळी आहेत.
 
 
WD
रोपियन राष्ट्रेसुद्धा पतंग उडविण्यात मागे नाहीत. त्यांच्या मते पतंग बनविणारा पहिला पुरुष युनानी होता, तर काहीच्या मते पतंग उडविण्याचे पहिले श्रेय चीन, जपान या देशांकडे जाते. चीनने तसा दावाच केला आहे. पतंगावरून बलूनचा शोध लागला. जपानमध्ये पतंग उडवून नववर्षाचे स्वागत केले जाते. याला हे लोक 'ऑक्टोपस' म्हणतात. कोरियामध्ये वर्षाच्या पहिल्या महिन्यात पतंग उडवितात. पतंगावर आपल्या इच्छा लिहून तो उडविला जातो. त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात अशी त्यांची समजूत आहे. तेथे मुलांची आई मुलाची प्रकृती चांगली राहण्यासाठी आकाशात पतंग सोडते. पतंगाद्वारा पहिला वैज्ञानिक प्रयोग इ.स. १७४९ मध्ये अलेक्झांडर विल्सन नावाच्या वैज्ञानिकाने केला. त्याने पतंगाबरोबर थर्मामीटर बांधून वादळाचे तापमान पाहण्याचा प्रय▪केला. पुढे १७५२ मध्ये फ्रँकलिन फिलाडेल्फिया यांनी असाच प्रयोग यशस्वी करून दाखवला. इ.स. १८८५ मध्ये आर्चिवाल्ड नावाच्या वैज्ञानिकाने १५00 फूट उंच पतंग उडवून हवेतील निरनिराळ्य़ा थराचे तापमान काढले. पुढे निरनिराळे प्रयोग करण्यात आले. त्यातूनच आकाशात चमकणार्‍या विजेवर बल्ब पेटविण्यात आला. र्जमनीमध्ये पतंगाच्या आकाराचा फुगा बनवून त्यात तापमानाची स्वयंचलित यंत्रे ठेवून दररोज तापमान पाहिले जात होते. अशा प्रयोगातूनच प्रगती होत होत मानव विमानाद्वारे आकाशात तरंगू लागला. भानुशहा नावाच्या एका गुजराती गृहस्थांना निरनिराळय़ा आकाराचे, डिझाइनचे पतंग जमविण्याचा छंद होता. अमेरिकेतील फ्रेंकलीन संस्थेने एक प्रदर्शन भरविले होते. त्यात भारतातर्फे भानुशहा यांना आमंत्रित केले. आता भानुशहांच्या पतंगाचे संग्रहालय अहमदाबादची महापालिका सांभाळत आहे. आपल्या स्वातंत्र्ययुद्धात पतंगानेसुद्धा भाग घेतला होता. सायमन जेव्हा भारतात आले तेव्हा काळ्या रंगाच्या पतंगाने त्यांचा निषेध केला होता.